मान दुखण्यामागची कारणे व त्यावरील उपाय | पुढारी

मान दुखण्यामागची कारणे व त्यावरील उपाय

डॉ. संतोष काळे

मानेच्या दुखण्यामागे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस हे देखील महत्त्वाचे कारण आहे. मानेची नस दबली गेल्याने अशा वेदना होतात. खूप जास्त वेळ मान वाकवून काम करणे किंवा झोपताना जाड उशी घेतल्याने नसांवर दबाव येतो. त्यामुळे मानेमध्ये वेदना सुरू होतात. त्याला रूट पेन असेही म्हणतात.

सध्याची जीवनशैली धावपळीची आहेच; पण सतत बसून कॉम्प्युटरवर काम करण्याचीही आहे. सतत मोबाईल आणि कॉम्प्युटरसमोर बसून काम करताना मानेची दुखणी आता सामान्य झाली आहेत. काही वेळा मानेचे हे दुखणे खांद्यांपासून थेट हातापर्यंत येऊन पोहोचते. काही वेळा मान थोडी-थोडी दुखत असते तर काही वेळा अचानकच मान दुखू लागते.

झोपेतून उठताना लक्षात येते की मान आखडली आहे आणि ती कोणत्याच बाजूला फिरवता येत नाही. खूप जास्त वेदना होत असतातच शिवाय मानेजवळचे स्नायू कडक लागतात. सर्व्हायकल किंवा स्पॉन्डिलायटिस या समस्या चाळीशीनंतर भेडसावतात. उठण्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे तरुणांमध्येही हे त्रास दिसून येत आहेत. या वेदनांना मेकॅनिकल वेदनाही म्हटले जाते.

वातावरणात दमटपणा वाढला की बॅरोमेट्रिक दाब कमी होतो. त्यामुळे सांध्यातील पातळ घटकांवर त्याचा परिणाम होतो. शरीर थोडे जरी तणावग्रस्त झाले तरीही सांधे आखडणे आणि स्नायूंच्या वेदना यामुळे शरीर अधिक संवेदनशील होते. रक्त घट्ट झाल्यामुळे स्नायूंवर त्याचा दाब पडतो त्यामुळेही वेदना वाढतात. ज्या व्यक्तींना मानदुखीची समस्या पूर्वीपासून सतावत असेल त्यांनी कूलर, एसी यांपासून सांध्यांचे रक्षण करणे आवश्यक असते.

मानेच्या दुखण्यामागे सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस हे देखील महत्त्वाचे कारण आहे. मानेची नस दबली गेल्याने अशा वेदना होतात. खूप जास्त वेळ मान वाकवून काम करणे किंवा झोपताना जाड उशी घेतल्याने नसांवर दबाव येतो. त्यामुळे मानेमध्ये वेदना सुरू होतात. त्याला रूट पेन असेही म्हणतात. गळा सुजणे किंवा मार लागणे यामुळेही वेदना वाढतात. काही वेळा रूमेटाईड आथ्रारायटिस या संधीवाताच्या प्रकाराची सुरुवातीच्या लक्षणांमध्ये मान आणि खांदे प्रचंड दुखतात. ऑस्टियोपोरोसिसची समस्या उद्भवू शकते. त्यात हाडे कमजोर होऊ शकतात.

क्षयरोग किंवा इतर संसर्गजन्य रोग किंवा मेटेस्टिक कर्करोगामध्ये मणक्याच्या हाडावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानेमध्ये तीव्र वेदना जाणवतात. यावर उपचार करण्यासाठी रेडिओथेरेपी आणि इंजेक्शनचा वापर केला जातो. काहींच्या बाबतीत शस्त्रक्रियाही करावी लागते. मणक्याला इजा झाल्यास किंवा डोकेदुखी, दातदुखी झाल्यास मान दुखू शकते.

तणाव, बैचेनी, अतिकाम, नैराश्य आणि डोकेदुखी यामुळे मानदुखी होऊ शकते. याला सोमेटोफॉर्म डिसऑर्डर म्हणतात. अशा परिस्थितीत रोग्याने पुरेसा आराम तसेच अस्वस्थता आणि तणाव कमी करण्यासाठी मेडिटेशनसारखे उपाय करावेत.

मानदुखी ही नस दबल्याने होणारी समस्या असल्याने त्यासाठी न्यूरोलॉजिस्टशी संपर्क करणे आवश्यक असते. वेदना मानेपासून हातापर्यंत पोहोचून पुढे पायापर्यंत जात असतील, डोके दुखत असेल, सुन्न होत असेल, मान चमकणे आदी त्रास होत असतील आणि सतत अशक्तपणा जाणवत असेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क करावा. तसेच आवश्यक त्या चाचण्या करून वेदनांचे योग्य कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

मानदुखीमध्ये फिजिओथेरेपीचा विशेष फायदा होऊ शकतो. वेदना खूप जास्त प्रमाणात होत असताना घरच्या घरी व्यायाम करू नये. अतिवेदना होत असतील तर स्नायू आणि नसा यांना आराम मिळण्याची गरज असते.

सुरुवातीला डॉक्टर टेंस, अल्ट्रासॉनिक आणि सामान्य स्ट्रेचिंगचा वापर करून रुग्णाला आराम कसा मिळेल ते पाहतात. आहारातही कॅल्शियमयुक्त पदार्थ म्हणजे दूध, अंडी, दही आदी समाविष्ट केले पाहिजेत.

झोपताना मान आणि मणका सरळ राहातील अशी काळजी घ्यावी. खूप उंच उशी घेऊ नये. खूप वेदना होत असतील तर सर्व्हायकल उशीचा वापर करा. झोपताना हाताखाली उशी ठेवल्यास फरक पडतो. काहींना नेक कॉलर घालावी लागते.
मानदुखीमध्ये घरगुती उपचारांमध्ये बर्फाने शेकणे हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे सूज आणि वेदना यात आराम मिळतो. काही प्रकरणात मालिश करणे आणि गरम शेक घेण्याचाही फायदा होतो.

तीळ, मोहरी किंवा ऑलिव्ह तेल ही तेले कोमट करून त्याने मालिश करावी. मालिश करताना खालून वर म्हणजे हातांकडून मानेकडे मालिश करावी. मालिश केल्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकावे. त्यानंतर एखाद्या कपड्याने मानेचा भाग झाकून ठेवावा. गरम पाण्याने शेक घेतल्यानंतर गार पदार्थांचे सेवन कमी करावे.

Back to top button