मुलांची पचनसंस्था का बिघडते? | पुढारी

मुलांची पचनसंस्था का बिघडते?

डॉ. मनोज शिंगाडे

मुलांची पचनसंस्था अत्यंत संवेदनशील आणि कमजोर असते. त्यांच्या पचनसंस्थेची वाढ होत असल्याने संसर्ग आणि आजाराप्रती संवेदनशील असते. मुलांच्या आहारातील लहानसा बदलही किंवा अतिशय कमी प्रमाणतही पोटात जाणारे चुकीचे घटकही मुलांचे पचनतंत्र बिघडवून टाकू शकतात. त्यामुळेच आया आपल्या मुलांच्या पचन, आरोग्य यांच्यासाठी खूप चिंतीत असतात.

बाळ इतके लहान असते की त्याला सतत प्रत्येक त्रासासाठी औषध देता येत नाही. नैसर्गिक उपचार हे बाळासाठी नक्‍कीच अधिक फायदेशीर असतात. कारण, त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. बाळासाठी कोणते नैसर्गिक उपाय करता येतील पाहूया.

स्तनपान करताना चुकीच्या स्थितीत बाळाला पाजले तरीही पचन समस्या निर्माण होतात. त्यामुळे दूध उलटणे, घशाशी येणे हे त्रास होतात. बाळांना खाऊ घालताना बाळाचे डोके पोटापेक्षा अधिक उंच असले पाहिजे. त्यामुळे दूध बाळाच्या पोटात जाते आणि पोटातील हवा बाहेर पडण्यास वाव मिळतो. बाळाला जेव्हा आपण कुशीत घेतो तेव्हाही बाळाचे डोके थोडे उंचीवर असेल अशा प्रकारे घ्या. किंवा मानेला आधार देण्यासाठी मऊ उशीचाही वापर करू शकतो.

संबंधित बातम्या

बाळाच्या पोटाला मालिश केल्यासही पचन संबंधी समस्या कमी होऊ शकतात. बाळाच्या बेंबीच्या आजूबाजूला हळूहळू मालिश करावी. जोर जास्त लावू नये. एका सर्वसाधारण वेगाने बाळाच्या पोटाला मालिश करावी. पोटाला मालिश करताना क्रीम किंवा बेबी ऑईलचा वापरही करू शकता.

दूध प्यायल्यानंतर बाळाने ढेकर द्यायला हवी. त्यामुळे पचन समस्या रोखण्यास मदत मिळते. हवा बाहेर पडल्याने गॅस थांबवता येतो तसेच बाळाला दूध बाहेर काढण्यापासून रोखते. काही मिनिटे वाट पाहिल्यानंतर बाळा खाऊ घालावे. मग बाळाला खांद्यावर घ्यावे आणि हळूहळू त्याच्या पाठीवर थाप मारल्यासारखे करावे. जेणेकरून त्याला ढेकर येतो.

बाळाला खाल्ल्यानंतर पचन समस्या भेडसावत असतील तर मुलांना अतिरिक्‍त खाद्यपदार्थ किंवा पेय देऊ नये. डॉक्टरच्या सल्ल्याने स्तनपान करत रहावे. बाळालाही काहीही खाऊ घालण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. आपल्या बाळाला त्याचा काही त्रास होतो का हे पाहावे त्रास होत असल्यास ते बंद करावे. त्याशिवाय बाळाच्या आहारातून स्तनपान एकदमच बंद करू नये. जेव्हा बाळाची वाढ योग्य असेल आणि इतर जेवणाचे पदार्थ खाण्यास सक्षम असतील तेव्हाच बाळाचे स्तनपान कमी करावे.

बाळाला पोटाशी निगडीत काही समस्या जाणवत असतील तर त्याला वैद्यांच्या सल्ल्याने द्राक्षाचा रस, ग्राईप वॉटर, कार्मिसाईडस्सारखे औषध द्यावे. पाच मिनिटात याचा परिणाम दिसून येतो. या उपायाने बाळ काही काळ शांत होते.

मुलांची पचनक्रिया बिघडल्याची लक्षणे :

बद्धकोष्ठता, पोट फुगणे, डायरिया, सतत उलटी होणे, ताप आणि संसर्ग, चिडचिड आणि जास्त झोपणे.

Back to top button