वारंवार उचकी येतेय? | पुढारी

वारंवार उचकी येतेय?

वैद्य विनायक खडीवाले

उचकी वारंवार ढेकर येत असल्यास प्रथम प्रवाळपंचामृत 6 गोळ्या वारंवार देऊन पाहाव्या. खावयास फक्‍त लाह्या द्याव्यात. मलावरोध किंवा वायू अडकल्याची शंका असल्यास गंधर्वहरीतकीचूर्णाचा एक मोठा डोस द्यावा.

एवढ्याने न भागल्यास निरूह बस्ती काढ्याचा एनिमा आणि करंजेल तेलाची पिचकारी द्यावी. जेवणानंतर प्रवाळपंचामृत सहा गोळ्या आणि शंखवटी तीन गोळ्या द्याव्यात. जेवणाचे प्रमाण कमी करावे.(उचकी)

चहा, कॉफी अशी कृत्रिम पेये पूर्ण बंद करावीत. दिवसांतून दोन वेळा एकूण जेवण खाण करावे. मध्ये काहीही घेऊ नये. पोटांत जेवणानंतर डब्बल होत असल्यास पाचकचूर्ण; लवणभास्करचूर्ण, हिंगाष्टकचूर्ण किंवा ओवा चिमुटभर घ्यावा. शक्यतो कमी पाणी प्यावे. प्यावयाचे पाणी कोमट असावे.

संबंधित बातम्या

कोमट पाण्यात किंचित लिंबू आणि मिठ मिसळून ते पाणी प्यावे. जुनाट अजीर्ण, अग्निमांद्य, पोटदुखी या तक्रारी असल्यास पंचकोलासव, पिप्पलादी काढा, अभयारिष्ट यापैकी एखादे औषध चार चमचे समभाग पाण्याबरोबर जेवणानंतर घ्यावे.

अत्यायिक अवस्थेत मयूरपिच्छामशी अत्यल्प प्रमाणांत, प्रवाळपंचामृतासोबत घ्यावी. लघवीतील दोष वाढल्याची शंका आणि मूतखड्याचा इतिहास असल्याश गोक्षुरादी गुग्गुळ सहा गोळ्या आणि रसायनचूर्ण एक चमचा आणि सकाळी आणि सायंकाळी घ्यावे.

ग्रंथोक्‍त आणि उपचार : गंधर्व हरितकी, अमृतचूर्ण, एरंड हरितकी, मयूर पिच्छामशी.

विशेष दक्षता आणि विहार : खूप जेऊ नये, जेवणावर जेवण, वेगावरोध टाळावे. आतड्यांना पीळपडेपर्यंत बोलणे टाळावे.

पथ्य : रात्रीचे लंघन करावे, हलके जेवण, गरम जेवण, मनुका, आले, लसूण, पुदिना यांची चटणी. भरपूर लाह्या.

कुपथ्य : रात्रींचे जास्त जेवण, जडान्‍न, वाटाणे, मटकी, अशी कडधान्ये, बटाटे, वांगी, बेकरीचे पदार्थ, काजू, पिस्ते, शेंगदाणे, फ्रीजचे पाणी.

रसायनचिकित्सा : गंधर्व हरितकी, मयूर पिच्छामशी.

योग आणि व्यायाम : प्राणायाम. उताणे शवासनात दीर्घकाळ पडून राहणे.

रुग्णालयीन उपचार : निरूह बस्ती. मात्राबस्ती.

अन्‍न षष्ठी उपक्रम (पंचकर्मादी) : अभ्यंग-पोट, पोठ छातीला महानारायण तेल लावावे, टब बाथ घ्यावा.

चिकित्साकाल : तत्कालिक. 1 दिवस ते 7 दिवस.

निसर्गोपचार : बाळहिरडा, किंचित सैंधव, पादेलोण तोंडात धरावे, गरम पाणी.

अपुनर्भवचिकित्सा : एरंड हरितकी, त्रिफळाचूर्ण, प्रवाळपंचामृत, लाह्या.

संकीर्ण : गरम पाणी प्यावे, गॅसेस धरेल असे काही खाऊ नयेत. पोटाचे व्यायाम करावे. आरडा ओरडा, वजन उचलणे टाळावे.

ar

Back to top button