जाणून घ्या स्तनाचा कर्करोग | पुढारी

जाणून घ्या स्तनाचा कर्करोग

डॉ. धैर्यशील सावंत

महिलांनी स्तनाची तपासणी करताना स्तनामध्ये किंवा स्तनाग्रांमध्ये काही बदल जाणवतोय का हे तपासा. जर काही बदल जाणवला तर मात्र घाबरू नका आणि तत्काळ डॉक्टरांचा सल्‍ला घ्या. लक्षात ठेवा की सर्व स्तनाच्या गाठी या कर्करोग च्या नसतात. म्हणून आणखी विलंब न करता, आपल्याला डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांना अनेकदा स्तनामध्ये काही असामान्य बदल पाहण्यासाठी स्वत:च्या स्तनांचे परीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. स्तनांचे परीक्षण करताना एखाद्या स्त्रीला तपासणीदरम्यान स्तनामध्ये गाठ अथवा इतर असामान्य बदल दिसू शकतात जे चिंताजनक असू शकतात. परंतु, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की सर्वच गाठी या कर्करोगाच्या नसतात.

काही गाठी या घातक (कर्करोगाच्या) किंवा अगदी कर्करोगाची सुरुवात असू शकतात. म्हणूनच आपल्याला या गाठींकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्यानुसार स्वतःची संपूर्ण तपासणी करावी लागेल. हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही सशक्‍त असणे आवश्यक आहे आणि तुमच्या मनात असलेल्या सर्व शंका दूर करणे गरजेचे आहे.

स्तनाची गाठ म्हणजे काय?

स्तनाची गाठ ही स्तनातील एक सूज, फुगवटा म्हणून ओळखला जाऊ शकतो जो त्याच्या सभोवतालच्या स्तनाच्या ऊतींसारखा नसतो किंवा तो केवळ स्तनांच्या त्याच भागात दिसून येतो.

स्तनाची गाठ होण्यामागील कारणे :

संक्रमण, आघात, गळू, फायब्रोएडीनोमा किंवा फायब्रोसिस्टिक स्तन ही देखील यामागची कारणे असू शकतात. शिवाय, स्तनातील गाठ ही पुरुष आणि स्त्री या दोघांमध्येही दिसू शकतात. तथापि, महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. तपासणीअंती जर तुमच्या स्तनातील गाठ ही कर्करोगbreast cancer ची आहे, असे निदान झाल्यास त्वरित उपचारांची गरज आहे.

स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी

स्तनाच्या कर्करोग चे निदान झालेल्यांपैकी, प्राथमिक ट्यूमरचे सामान्य स्थान स्तनाच्या वरच्या बाह्य चतुर्भुजात दिसून येते. स्तनाच्या कर्करोगाला स्तनाच्या ऊतींमध्ये कुठेही सुरुवात होऊ शकते. विविध अभ्यासानुसार, कर्करोगाच्या गाठी प्रामुख्याने स्तनाच्या वरच्या बाहेरील काखेजवळच्या चतुर्भुजात दिसतात. वरच्या भागात गुठळ्या का दिसतात याचे नेमके कारण अद्याप माहीत नाही. पुरुषांमध्ये, स्तनाग्रांभोवती कर्करोगाच्या गाठी दिसून येतात.

कर्करोगाच्या आणि स्तनाच्या गाठीतला फरक

जर गाठ कर्करोगाची असेल तर ती वेदनादायक असू शकत नाही. परंतु, ती कडक असेल, असामान्य असेल, सतत बदलू शकणारी आणि स्तनाच्या वरच्या चतुर्थांशात आढळणारी असेल तर कर्करोगाची असण्याची शक्यता आहे. त्यासाठी एक योग्य निदान करून गाठ कर्करोगाची आहे की नाही याची खात्री करायला हवी. स्तनाच्या कर्करोगाच्या अचूक निदानासाठी महिन्यातून एकदा स्तनाचे आत्मपरीक्षण उपयुक्‍त ठरेल. जर स्तनामध्ये काही गाठ किंवा बदल दिसले तर उपचार घेण्यास विलंब करू नका.

Back to top button