किशोरवयीन मुलांमधील ताणतणाव : लक्षणे आणि उपाय

किशोरवयीन मुलांमधील ताणतणाव : लक्षणे आणि उपाय
Published on
Updated on

एखादी कृती करण्यासाठी आपल्याला तयार करणारा घटक म्हणजे ताण होय. आपण एखादे आव्हान स्वीकारून ते पूर्ण करू शकतो, असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती गोष्ट करण्यासाठी ताण प्रोत्साहन देते; परंतु आपल्या आव्हान स्वीकारण्याच्या क्षमतेपेक्षा ताण मोठा झाला तर मात्र समस्या निर्माण होते. किशोरवयीन मुलांमध्येसुद्धा अशा प्रकारचा ताणतणाव निर्माण होतो.

लक्षणे ः किशोरवयीन मुलांवर ताण आलेला आहे, हे त्यांच्या वागणुकीतून, भावनांमधून, विचारांमधून समजून येते. मुले आपल्या मित्रापासून दूर राहणे, त्यांना नेहमी ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टीतून आनंद न मिळणे किंवा त्या गोष्टी कराव्याशा न वाटणे, खूप जास्त झोप येणे किंवा अतिशय कमी झोप येणे, आवडणारेच अन्‍नपदार्थ खाणे, अतिशय कमी प्रमाणात खाणे, कारण नसताना स्वभावामध्ये भावनिक चढ-उतार दिसून येणे, अशी वेगवेगळी लक्षणे किशोरवयीन मुलांमध्ये दिसू लागतात. मुले अतिशय मुडी बनतात.

त्यांना अचानक दुःखी असल्यासारखे वाटू लागते, आपण कुठल्याच कामाचे नाही, आपण अयोग्य आहोत, आपल्या बाबतीत कुठलीच गोष्ट योग्य होत नाही, अशा नकारात्मक विचारांनी ती घेरली जातात. नेहमीपेक्षा कमी ऊर्जा असल्याचे जाणवू लागते, मुले अधिक आक्रमक बनतात, शाळेच्या प्रगती पुस्तकातील निकाल खालावतो, स्वतःच्या दिसण्याबाबत बेफिकिरी जाणवू लागते, आपल्याशी वागण्यात बदल होतो, अचानक अबोला धरू लागतात. तसेच शाळेत जाणे टाळू लागतात.

शारीरिक लक्षणे ः आपल्या किशोरवयीन मुलांवर अथवा मुलीवर ताण आला आहे हे दर्शविणारी केवळ मानसिक लक्षणे दिसतात असे नाही तर शारीरिक लक्षणेसुद्धा दिसतात. मुलांना आजारी असल्यासारखे वाटू शकते. डोकेदुखी, खांदेदुखी, पोटदुखी, जबडा दुखणे अशी लक्षणे दिसतात. तसेच भूक न लागणे, नेहमीपेक्षा खूप थकल्यासारखे वाटणे, पुरेशी झोप झाली असतानासुद्धा थकवा न निघणे, वजन कमी किंवा जास्त होणे, वारंवार सर्दी किंवा संसर्ग होणे, सतत वैतागलेले असणे, श्‍वास वेगाने होणे अशी बरीच लक्षणे दिसतात. ताणामुळे विचारांवर परिणाम होतो. ताण वाढल्यामुळे मुलांना मन एकाग्र करणे अवघड बनते. अभ्यासामध्ये मन लागत नाही. संवाद साधायला अडचणी येऊ लागतात. गोष्टी लक्षात ठेवणे अवघड बनू लागते. तर्क अथवा निर्णय चुकीचे ठरू लागतात किंवा त्यामध्ये अडचणी येऊ लागतात. एखादा निर्णय घेऊन त्याचे नियोजन करणे हे गुंतागुंतीचे आणि त्रासदायक वाटू लागते. थोडक्यात आपले मूल तणावाखाली असल्यास एखाद्या गोष्टीचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि तो विचार प्रत्यक्षात आणण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे सतत गोंधळाची स्थिती जाणवते.

मुलांमध्ये ताण वाढत असतील तर सर्वप्रथम ते समजून घेतले पाहिजे आणि मुलांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ताण येण्यामागे पुरेशी झोप न येणे हे कारण असू शकते. गृहपाठ, इतर अ‍ॅक्टिव्हिटीज, मित्र-मैत्रिणी बरोबर देण्यात येणारा वेळ यामुळे आठवड्यामधील शाळा असलेल्या दिवसात पुरेशी झोप मिळत नाही. किशोरवयीन मुलांसाठी रात्री किमान आठ तास झोपेची गरज असते, ती पूर्ण करण्यासाठी मुलांना मदत करावी.

मुलांच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करा

प्रत्येक मुलांमध्ये कुठले तरी गुण अधिक प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे आपल्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत, कोणत्या गोष्टीत त्यांना रस आहे. हे समजून घेण्यासाठी मुलांबरोबर वेळ घालवावा. त्यांना ज्याची आवड आहे आणि ज्या गोष्टीमध्ये गती आहे. ती गोष्ट अधिक चांगल्या पद्धतीने येण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधावे.

शारीरिक खळे अत्यंत उपयुक्‍त

ताण घालविण्यासाठी शारीरिक खळे अत्यंत उपयुक्‍त असतात. योगा, हायकिंग, बायटिंग, स्केटिंग, बास्केटबॉल, फुटबॉल यापैकी कुठल्याही खेळाची निवड करावी. कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे ताण हलका होतो आणि मन आनंदी राहते. व्यायामाव्यतिरिक्‍त संगीत ऐकणे, चित्रपट बघणे, चित्रकला, हस्तकला यापैकी कुठलीही गोष्ट करण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे. अर्थात, सुरुवातीला त्यांना कुठला छंद आनंद देतो हे बघावे आणि त्यांचा रोजच्या जीवनात समावेश करावा. त्यांच्या आवडत्या गोष्टी जाणीवपूर्वक त्यांच्या पद्धतीने करू द्याव्यात. यामुळे ताण कमी होण्यात मदत होते.

मुलांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या

काही वेळेला किशोरवयीन मुलांनी अभ्यासाबाबत भीती अथवा काळजी वाटू लागते. ते इतरांच्या कुटुंबातील सदस्यांकडे बघतात आणि तुलना करू लागतात. कौटुंबिक कलह, स्वतःच्या शरीरयष्ठीबाबतची प्रतिमा, असमानता, डावलले जाणे, सांस्कृतिक जगतातील गोष्टींचा ताण, स्वतःबद्दलच्या खूप जास्त अपेक्षा, पालकांच्या, शिक्षक आणि मित्र यांच्या खूप जास्त अपेक्षा इत्यादी गोष्टीमुळे मुलांच्या मनावर ताण येतो. मुलांचा ताण घालविण्यासाठी त्यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्यावे, त्यांच्या सोबत वेळ घालवावा. मुलाला ज्यामुळे चांगले वाटेल अशा गोष्टी कराव्यात.

डॉ. प्राजक्‍ता पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news