आरोग्य : समस्या टॉन्सिल्सची | पुढारी

आरोग्य : समस्या टॉन्सिल्सची

डॉ. संजय गायकवाड

टॉन्सिल्सच्या गाठी वाढण्याचा त्रास अनेकांना लहानपणी आणि तरुणपणी होतो. टॉन्सिल्सच्या गाठी वाढल्यानंतर त्याचे ऑपरेशन केले जाते. एवढाच उपचार आपल्याला ठाऊक असतो. मात्र, या आजारावर आयुर्वेदातही काही उपचार सांगण्यात आले आहेत..

टॉन्सिल्सच्या गाठी आपल्या जिभेच्या मागच्या भागात असतात. खरे तर आपल्या घशाचे संरक्षण करण्याकरिता टॉन्सिल्सचा उपयोग होतो. मात्र, या टॉन्सिल्सना काही कारणांमुळे संसर्ग झाला तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

टॉन्सिल्सच्या गाठी वाढण्याचे प्रमाण मुलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. टॉन्सिल्सची व्याधी सर्व प्रकारच्या वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळून येत असली तरी लहान मुलांमध्ये या व्याधीचे प्रमाण अधिक दिसून येते. या व्याधीवर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे.

याचे कारण या व्याधीची लक्षणे आढळून आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केल्यास टॉन्सिल्समधून विषद्रव्ये बाहेर पडू लागतात. ही विषद्रव्ये आपले रक्त दूषित करून टाकतात. त्याचा परिणाम आपल्या हृदयावर होण्याची शक्यता असते. म्हणून टॉन्सिल्सच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

टॉन्सिलची व्याधी निर्माण होण्याची अनेक कारणे सांगितली जातात. सतत मसालेदार पदार्थ खाणे हे एक प्रमुख कारण सांगितले जाते. तसेच नेहमी चढ्या आवाजात बोलण्याने ही व्याधी होते, असेही सांगितले जाते. धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, टॉफीज, गोड पदार्थ, आईस्क्रीम अतिप्रमाणात खाणे यामुळेही ही व्याधी होते. थंड पाण्यावर गरम पाणी पिणे किंवा गरम पदार्थांवर थंड पदार्थ खाणे अशा प्रकारांमुळेही ही व्याधी होते. व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळेही ही व्याधी होऊ शकते.

ही व्याधी झाल्यावर त्याचा पारिणाम त्या व्यक्तीच्या उर्वरित आयुष्यातही होऊ शकतो. त्या व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर याचा परिणाम होतो. त्यामुळे आयुर्वेदात या व्याधीवर काही औषधे सुचवण्यात आली आहेत. अगस्त्य रसायन मधाबरोबर दररोज दोनवेळा घेणे. हे औषध सहा महिन्यांकरिता घेण्याची गरज आहे. याचबरोबर सीतोफलादीचुर्ण हे औषधही या आजारावर उपयुक्त ठरते.

 

Back to top button