आपली प्रकृती आणि आहार | पुढारी | पुढारी

आपली प्रकृती आणि आहार | पुढारी

आपल्या प्रकृतीला कोणता आहार त्रासदायक आहे व कोणता हितकारक त्याची माहिती घेऊ. यामध्ये आपण त्रासदायक म्हणून जो आहार असेल तो शक्यतो टाळावा किंवा कमी खावा, असा अर्थ आहे. कधीतरी एखाद्या वेळी एखादा पदार्थ खाल्ला की लगेच प्रकृती बिघडणे, असा याचा अर्थ नाही.

व्यवहारात बोलताना, ‘माझी प्रकृती उष्ण आहे’, ‘माझी थंड असल्याने मला पावसाळा मानवत नाही’, अशी वाक्ये ऐकावयास मिळतात, तर ‘काय भाऊ, काय म्हणतीय प्रकृती?’, ‘नानाची प्रकृती गंभीर आहे,’ यासारख्या वाक्यांतूनही प्रकृतीचा उल्लेख होत असतो. एखाद्याचा स्वभाव विचित्र वेगळा वाटला तर (सुस्कार सोडून) ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही म्हणदेखील ऐकविली जाते. 

अशी ही प्रकृती म्हणजे नक्की काय आहे? ती किती प्रकारची असते? ती शारीरिक आहे की मानसिक? आपली प्रकृती कशी ओळखायची? तिच्या माहितीने काय फायदा होतो? आहाराच्या दृष्टीने प्रकृतीचा विचार कसा करावा? कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तींनी कोणता आहार घ्यावा किंवा कोणता टाळावा? आहाराचा सर्वांगीण विचार करताना आपली प्रकृतीही माहिती झाली, तर त्याचा आपल्याला खूपच फायदा होईल. त्यादृष्टीने आपण प्रकृतीची थोडक्यात ओळख करून घेऊ. आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार वात, पित्त व कफ अशा तीन प्रकृती सांगितल्या जातात. 

वात प्रकृती : 

वात प्रकृतीची माणसे कृश बांध्याची लहान चणीची उंच, सावळ्या रंगाची असतात. त्यांचा आवाज घोगरा व रुक्ष असतो. स्वभाव चंचल व बुद्धी अस्थिर असते. वात प्रकृतीची माणसे जास्त बडबड करणारी असतात. त्यांना थंडी सहन होत नाही. अशी माणसे चटकन चिडतात. झटकन प्रेम करतात. लवकर विरक्त होतात. यांची स्मरणशक्ती थोडी कमी असते व ही अल्पसमाधानी असतात.

यांचा आहार अनियमित असतो. त्यामुळे शौचाच्या तक्रारी असतात. अशा व्यक्तींची झोप कमी असते, तर स्वप्ने अधिक पडतात. हिवाळ्याचा त्रास होतो. अशक्तपणा, कमी झोप, शौचाच्या तक्रारी, हाडे व सांध्याचे विकार, वारंवार अवयव दुखणे, हातपाय दुखणे, हातपाय फुटणे, चक्कर येणे इत्यादी तक्रारी अधिक आढळतात. 

पित्त प्रकृती : पित्त प्रकृतीची माणसे गोरी, हातापायांचे तळवे, चेहरा लालसर वर्णाची असतात. बांधा मध्यम, शरीर स्पर्श उष्ण असतो. केस कमी व पिंगट असतात. अशा प्रकृतीच्या माणसांना घाम जास्त येतो. अंगावर सुरकुत्या लवकर पडतात. तसेच केसही लवकर पांढरे होतात. यांच्या अंगावर तीळ, वांग अधिक असतात. या व्यक्ती खूप तापट किंवा रागीट असतात. अभिमानी तसेच कुशाग्र बुद्धीच्या असतात. स्मरणशक्ती चांगली असते. शूर, बुद्धिमानी तसेच कोणतीही गोष्ट चटकन समजणारी असतात.

कफ प्रकृती :

कफ प्रकृतीची माणसे रंगाने गोरी, बांधेसूद, धष्टपुष्ट किंवा सुदृढ असतात. सर्व अवयव गोल व पुष्ट असतात. कपाळ मोठे, केस दाट, स्निग्ध व काळे असतात. आवाज सुस्पष्ट, खणखणीत असतो. डोळे पाणीदार असतात. स्वभाव शांत नम्र व गंभीर असतो. अशा व्यक्तीचा आहार तसेच झोप भरपूर असते. शौचासही साफ होते. यांच्या जीवनात नियमितता असते. हे लोक कमी बोलतात; पण यांना लोकामध्ये मिसळायला खूप आवडते. आरोग्य संपन्नता वागणुकीत गंभीरता व स्थिरता ही यांची काही स्वभाव वैशिष्ट्ये आढळतात. स्थूलपणा, आळस, सांधेदुखी, सर्दी, खोकला, दमा, धाप यासारखे कफाचे विकार, त्वचेचे विकार, वारंवार उलटी होणे, गळून गेल्याप्रमाणे वाटणे इ. तक्रारी जास्त आढळतात. 

आपल्या प्रकृतीला कोणता आहार त्रासदायक आहे व कोणता हितकारक त्याची माहिती घेऊ. यामध्ये आपण त्रासदायक म्हणून जो आहार असेल तो शक्यतो टाळावा किंवा कमी खावा, असा अर्थ आहे. कधीतरी एखाद्या वेळी एखादा पदार्थ खाल्ला की लगेच प्रकृती बिघडणे असा मात्र अर्थ नाही.

वात प्रकृती :

तिखट, कडू आणि तुरट या चवींनीयुक्त उदा. वाळलेल्या भाज्या, वरी, नाचणी, करी, वाटाणा, मटार, पावटे, खसखस, चवळी, हरबरा, काकडी, कलिंगड, अळू, चुका, चाकवत, अंबाडी, तांदळी, मुळा ही धान्ये, कडधान्ये व भाज्या वात प्रकृतीला अहितकारक असतात. याच्याच जोडीला वेफर्स, चिवडा, भेळ, फरसाणा, पापड, खाकरा, टोस्ट, पोहे, बटाटेवडे, पापडी, भजी, चकली हे पदार्थदेखील जास्त वातप्रकोपक आहेत. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने. या 4 महिन्यांत वातप्रकोप जास्त होत असल्यामुळे वरील पदार्थ कटाक्षाने टाळणे चांगले.

दूध, ताक, लोणी, सूप, भात, पोळी, दुधाचे पदार्थ, उडिदाच्या डाळीचे पदार्थ, हरभरा, डाळीची पुरणपोळी तसेच तिळाचे पदार्थ, बटाटा, दुधी भोपळा इ. भाज्या, सर्व प्रकारची ताजी फळे, विशेषत: केळी, खजूर, बदाम इ. पदार्थ आहारात ठेवावेत. तसेच गुलकंद, मोरावळा, च्यवनप्राश, नाचणीची खीर व अन्यही सर्व प्रकारच्या खिरी नेहमी खाव्यात. 

पित्त प्रकृती : 

सर्व प्रकारचे तिखट, आंबट, खारट, तेलकट पदार्थ, उदा. तूरडाळ, शेंगदाणे, मसाल्याचे पदार्थ, चटण्या, लोणची, दही, आंबट ताक, डालडा, मोहरी, जवस, हुलगे, शेवगा, दालचीन, ओवा, आले, जिरे, लसूण, मिरची जास्त असणारे पदार्थ, भजी, वडा, पुरीभाजी, मिसळ, रस्सावडा, इडली, डोसा, सांबार, कचोरी, शाबुदाणा, खिचडी, ब्रेड, खारी बिस्किटे, जास्त चहा, कॉफी, मद्यपान, तंबाखू, सिगरेट या गोष्टी नेहमी टाळाव्यात. याच्याच जोडीला उन्हात फिरणे, उपवास, जागरण, जास्त चिडणे, काळजी करणे हेदेखील घातकच ठरते. 

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दुपारी उष्णता अधिक असते आणि एप्रिल-मे या काळात तर या गोष्टी सदैव टाळाव्यात. पित्त प्रकृतीच्या माणसांनी दूध, सरबते, गोड पदार्थांचे रस, नियमित वेळी जेवण घेणे निश्‍चित फायद्याचे असते. याचबरोबर डाळिंब, केळी, ताजा आवळा, सीताफळ इ. फळे, दुधी भोपळा, पडवळ यासारख्या भाज्या, ताजी भाकरी (ज्वारीची), मुगाच्या डाळीचे पदार्थ तसेच थंड दूध व दुधाचे पदार्थ, विशेषत: तूप नेहमी जेवणात ठेवावे. याचबरोबर गुलकंद, च्यवनप्राश, मोरावळा, ताजे ताक, गार दूध, शरीर बळकटीसाठी नेहमी खावे व विशेषतः भूक लागल्यानंतर दुर्लक्ष न करता थोडे तरी अन्न सेवन करावे.

कफ प्रकृती :-

जास्त भात, उडीद, गहू, शिंगाडे, द्राक्षे, पेरू, केळी, खजूर, मासे, दूध, तूप, लोणी, आंबट ताक, उसाचा रस, गुळाचे पदार्थ, आईस्क्रिम, कोल्ड्रिंक्स, मिल्कशेक, फ्रुट ज्यूस, बियर या प्रकारचे मद्य, तळलेले पदार्थ, खिर, बांसुदी, पेढा, बर्फी, गुलाबजाम, लस्सी, शिरा, बालूशा, शाबुदाण्याची खिचडी, इडली, डोसा, ढोकळा इ., ब्रेड, केक, जॅम, जेली या गोष्टी सदैव टाळणे गरजेचे असते. याच्याच बरोबर दिवसा झोपणे, ओल्या जागेत काम, सदैव बैठे कामदेखील टाळावे. 

कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी ताजे ताक, लिंबू सरबत नेहमी घ्यावे. सर्व ताजी फळे, ताज्या पालेभाज्या, भाकरी, फुलके असे पदार्थ खावेत, तसेच जेवणामध्ये खोबर्‍याची चटणी, लसणाची चटणी घ्यावी व जेवण नेहमी गरम असतानाच खावे. आपण आपली प्रकृती ओळखून या गोष्टी पाळल्यात तर निश्‍चितच आपण आरोग्यसंपन्न व्हाल.

Back to top button