मासिक पाळीदरम्यान होणारे मायग्रेन | पुढारी | पुढारी

मासिक पाळीदरम्यान होणारे मायग्रेन | पुढारी

डॉ. माधुरी बुरांडे लाहा

मासिक पाळीच्या वेळी होण्यार्‍या हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. पाळीच्या 2 दिवस अगोदर किंवा पाळी आल्यानंतर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. यादरम्यान स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी झाल्याने मायग्रेनचा त्रास होतो. विशेषत: इस्ट्रोजेनची पातळी बदलणे संभाव्यत: रक्ताभिसरण, न्यूरोट्रान्समीटर, रक्तवाहिन्या आणि रक्तदाबांवर परिणाम करते आणि ते सर्व संतुलनावर परिणाम करतात. यामुळे मायग्रेनदेखील होतो.

मायग्रेनमध्ये डोके दोन्ही बाजूंनी किंवा कधीकधी एका बाजूने दुखते. या वेदना तीव्र असतात. अर्धशिशीचा त्रास जेव्हा होतो, तेव्हा रक्तप्रवाह वाढलेला असतो. त्यामुळे खूप वेदना होतात. बर्‍याचदा मासिक पाळीदरम्यान मायग्रेनचा त्रास होतो. हार्मोन्सच्या पातळीतील चढ-उतार हे मायग्रेनचे मुख्य कारण आहे.

वेगवेगळ्या अभ्यासानुसार असेही निदर्शनास आले आहे, की मासिक पाळीदरम्यान येणारे मायग्रेन हे पाळीशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त, मायग्रेनला कारणीभूत ठरणारे इतर घटक म्हणजे ताणतणाव, थकवा, मद्यपान, तीव्र प्रकाशाचा संपर्क, मोठा आवाज, हवामान, टायरामाईनयुक्तपदार्थांचे सेवन इत्यादी.

मायग्रेनचे व्यवस्थापन

* ओव्हर-द-काऊंटर (ओटीसी) औषधोपचार : आपले डॉक्टर आपल्याला अशी काही औषधे लिहून देतील, ज्यामुळे आपल्याला त्या त्रासदायक वेदनापासून आराम मिळू शकेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम देखील घ्यावे लागतील.

* तणावातून मुक्त राहा : ताण व चिंता व्यवस्थापित करणे ही काळाची गरज आहे. तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि ध्यान यासारख्या पर्यायांचा आधार घ्या. त्याचप्रमाणे, आपण प्राणायाम करणेदेखील फायदेशीर ठरू शकेल.

* दररोज व्यायाम करा : व्यायाम केल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होईल. शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय राहिल्यास संप्रेरकांमुळे होणार्‍या मायग्रेनपासून मुक्तता मिळते. शिवाय भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. मनाने औषधोपचार करू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Back to top button