हाडांसाठी घातक ठरणार्‍या काही गोष्टी | पुढारी

हाडांसाठी घातक ठरणार्‍या काही गोष्टी

हाडे आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहेत. हाडे जितकी मजबूत, तितकेच आपण आरोग्यदायी आणि तंदुरुस्त राहतो. आहारात योग्य पोषक घटक नसतील तर पोषक घटकांच्या कमतरतेमुळे हाडे कमजोर होतात. याव्यतिरिक्त बैठ्या जीवनशैलीमुळेही हाडांशी निगडित अनेक समस्या समोर येतात.

हाडांसाठी घातक ठरणार्‍या काही गोष्टी पाहू.

धूम्रपान : धूम्रपानानेही हाडे कमजोर होतात. दर काही वेळाने सिगारेट ओढत असाल तर शरीर नवीन तंदुरुस्त हाडांच्या पेशी सहजपणे निर्माण करू शकत नाही. त्यामुळेच जितके जास्त धूम्रपान कराल तेवढीच परिस्थिती अधिक बिकट होईल. धूम्रपान करणार्‍या व्यक्तींची हाडे तुटण्याचा धोका असतोच; शिवाय तुटलेली हाडे पुन्हा जुळून येण्याचा कालावधीही अधिक असतो; पण सिगारेट ओढणे बंद केल्यास हा धोका कमी होऊ शकतो. हाडांचे आरोग्यही सुधारू शकते. अर्थात, या गोष्टी काही लगेच होत नाहीत. त्यासाठी काही वर्षे जातातच.

मिठाचे अतिसेवन : मिठाचे सेवन जितके अधिक कराल तितके जास्त कॅल्शियम शरीरातून बाहेर टाकले जाते. याचा अर्थ अतिमीठ सेवन करणे आपल्या हाडांसाठी योग्य नाही. ब्रेड, चीज, चिप्स आणि कोल्ड कटसारख्या काही पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. अर्थात, मीठ अजिबातच खाऊ नये असे नाही, तर दिवसभरात केवळ 2300 मिलिग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे.

बैठी जीवनशैली : टीव्हीवरील आवडीचे कार्यक्रम जरूर पाहावेत; पण सतत एकाच जागी बसून टीव्हीकडे टक लावून बसणे हे देखील शरीराच्या तंदुरुस्तीच्या दृष्टीने हानिकारक आहे. कारण, सतत टीव्ही पाहण्याची सवय लागली की, एका जागेवरून मनुष्य हलत नाही आणि हाडे कमजोर होतात. व्यायामामुळे हाडे मजबूत होतात. शारीरिक ठेवण चांगली ठेवण्यासाठी आपल्या पंजांवर आणि पायावर शरीराचा भार तोलावा. त्यामुळे हाडांना आणि स्नायूंना ताकद मिळते.

फ्लेवर्ड ड्रिंक्स : गरजेपेक्षा जास्त कोला फ्लेवर असलेला सोडा हाडांना नुकसान पोहोचवतो. अर्थात, यावर आणखी संशोधन होते आहे. काही अभ्यासानुसार या पेयांमध्ये असलेल्या कॅफीन आणि फॉस्फरसमुळे हाडांचे नुकसान होते असे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते, दूध आणि इतर पेये ज्यामध्ये कॅल्शियम असेल ती पेये प्यावीत. त्याऐवजी सोडायुक्त पेयांचे सेवन नक्कीच हानिकारक आहे. जास्त चहा किंवा कॉफी प्यायल्यास हाडांतील कॅल्शियम कमी होते.

हे आवर्जून करा

हाडांच्या बळकटीसाठी नियमित व्यायाम गरजेचा आहेच; पण तो शक्य नसेल तर आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी सायकलिंग करावे. सायकलिंगमुळे फुफ्फुसे आणि हृदय मजबूत होते. त्याचबरोबर हाडेही मजबूत होतात. टेनिस, हायकिंग, डान्सिंग आणि पोहणे आदी गोष्टी केल्यासही व्यायाम होतो.

डॉ. मनोज शिंगाडे

Back to top button