गलगंड आजार कशामुळे होतो? त्यावर हे आहेत उपचार | पुढारी

गलगंड आजार कशामुळे होतो? त्यावर हे आहेत उपचार

थायरॉईडची एखादी समस्या झाल्यास घशात सूज येते. अशी सूज येण्यास थायरॉईड सिस्ट, कॅन्सर किंवा नोड्यूलचे कारण ठरू शकते. हा ट्यूमर थायरॉईडच्या आत तयार होतो. यास आपण गलगंडदेखील म्हणतो. गलगंड हा हायपरथायरॉडिज्म हार्मोनचा स्राव झाल्याने किंवा हायपोथायरॉडिज्मचा खूपच कमी स्राव झाल्याने किंवा अचानक सामान्य स्थिती झाल्यावरही होऊ शकतो.

थायरॉईड नोड्यूल ग्रंथीत गाठी होतात. परंतु, बहुतांश गाठी आणि सूज यापासून त्रास होत नाही. त्यामुळे त्याची गंभीर स्थिती होत असेल, तर डॉक्टरला तत्काळ भेटायला हवे.

गलगंड आजाराचे प्रकार

गलगंडाचा आजार हा चार प्रकाराने होऊ शकतो

सामान्य गलगंड : यात थायरॉईड ग्रंथी वाढू लागते आणि आयोडिनचे प्रमाण कमी होते. परंतु, यात कोणताही ट्यूमर होत नाही.

डिफ्यूज टॉक्सिक गोईटर : यात थायरॉईडच्या ग्रंथी वाढतात आणि डिप्रेशन आणि हृदयाची समस्यादेखील निर्माण होऊ शकते. या समस्येत थायरोस्टॅटिक योग्यरीतीने काम करत नाही.

नॉनटॉक्सिक गोईटर : या समस्येत सूज येण्याबरोबरच थायरॉईडच्या ग्रंथी वाढतात.

टॉक्सिक नोड्यूल गोईटर : या प्रकारातील गलगंडाचा आजार 55 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना होतो. यात थायरॉईडच्या ग्रंथी वाढतात आणि ग्लँडचा आकार वाढत राहतो. गाठी होऊ लागतात.

लक्षणे : अधिक प्रमाणात घाम येणे, अधिक भूक लागणे, उष्णता सहन न होणे, सुस्ती, थकवा आणि अशक्तपणा जाणवणे, घसादुखी, घसा खराब होणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, वजन कमी होणे, घबराट वाटणे, श्वास घेताना आवाज येणे.

गलगंड आजाराचे कारण

धूम्रपान: तंबाखूच्या धुरातील थायोसायनेट हे आयोडिनच्या शोषणात अडथळे आणतो आणि थायरॉईडच्या ग्रंथी वाढण्यास कारणीभूत ठरतो.

हार्मोनल बदल: गर्भधारणा, कौमार्य स्थिती आणि रजोनिवृत्ती ही थायरॉईडवर परिणाम करू शकते.

थायरॉईडायटिस : संसर्गामुळे घशात सूज येऊ शकते.

लिथियम : हे औषध मानसिक विकार असलेल्या रुग्णास दिले जाते आणि त्यामुळे थायरॉईडच्या कार्यप्रणालीत अडथळा येऊ शकतो.

खूप मीठ खाणे : आहारात मीठाचे प्रमाण अधिक ठेवल्यास थायरॉईडचा त्रास बळावू शकतो.

गर्भावस्था : गर्भधारणेच्या काळात ह्यूमन कोरियोनिक गोनाड्रोपिन हार्मोन तयार होतो. या कारणामुळे थायरॉईडचे ग्रंथी वाढू लागतात.

गलगंडपासून बचाव आणि उपचार

गलगंडपासून बचाव करण्यासाठी संतुलित आहार गरजेचा आहे. हार्मोन थायरॉईड हार्मोनसाठी आयोडिन गरजेचे आहे. अशावेळी आहारात आयोडिनयुक्त भोजनाचा समावेश करायला हवा. उदा. मासे, सफरचंदाचा ज्यूस, वाटाणे, दूध, दही, अंडी, चीज, केळी, वाळलेला बटाटा, कॉन आदीचा समावेश हवा.

धूम्रपान करण्यापासून दूर राहा. स्वच्छतेकडे लक्ष द्या. दररोजच्या जीवनशैलीत व्यायाम आणि मेडिटेशनला जोडा. योग्य प्रमाणात पाणी प्या, मीठाचे अधिक प्रमाण ठेवल्यास गलगंड होऊ शकतो.

डॉ. संतोष काळे

Back to top button