गर्भारपण आणि धनुर्वात | पुढारी

गर्भारपण आणि धनुर्वात

गर्भवती महिलेला आणि शिशूला धनुर्वाताच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी गर्भधारणेच्या काळात टीटॅनस टॉक्साईडचे (टीटी) इंजेक्शन देण्यात येते. धनुर्वात हा एक जीवघेणा आजार असून त्यावर कोणताही उपचार नाही. परंतु टीटीच्या इंजेक्शनने यापासून बचाव करणे सहज शक्य आहे.

क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी या जीवाणूमूळे धनुर्वात होतो. हा एक तीव्र संक्रामक रोग आहे. हा संसर्ग साधारणत: माती किंवा धुळीतून पसरतो. एवढेच नाही तर जखम मोकळी राहिली तर त्या माध्यमातूनही संसर्ग शरीरात येतोे.

टीटीचे इंजेक्शन शरीरात रोगप्रतिकारक शक्ती (अँटीबॉडीज) तयार करते आणि ते टेटनस बॅक्टेरियाचा सामना करते. परिणामी संभाव्य आजारापासून शरीराचे संरक्षण होतेे. गर्भधारणेच्या काळात टीटीचे इंजेक्शन घेतल्यास शरीरात वाढणारी अँटीबॉडीज ही गर्भात वाढणार्‍या बाळापर्यंत पोचते. त्यामुळे जन्मानंतर जोपर्यंत शीशूला टीटीचे इंजेक्शन दिले जात नाही, तोपर्यंत आपल्या अँटीबॉडीजच्या मदतीने बाळाला काही महिन्यांपर्यंत आजारापासून संरक्षण होतेे. बाळाला साधारणपणे सहा ते आठ आठवड्यादरम्यान डीटीपीची इंजेक्शन दिले जाते.

गर्भधारणेच्या स्थितीत टीटीचे इंजेक्शन कधी आणि किती घ्यावे ही बाब यापूर्वी टीटीचे इंजेक्शन कधी घेतले आहे आणि कितीदा गर्भधारणा राहिली आहे तसेच दोन गर्भधारणेतील कालावधी किती आहे, यावर अवलंबून आहे. महिला जर पहिल्यांदाच गर्भवती असेल आणि लहानपणी तसेच प्रौढ वयात सर्व लसी नियमितपणे घेतल्या असतील तर टीटीची दोन इंजेक्शन घ्यावी लागतात. या लशीच्या दोन इंजेक्शनमध्ये किमान महिनाभराचे अंतर ठेवावे लागते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार, ज्या महिलांनी टीटीचे इंजेक्शन घेतलेले नसते त्यांना गर्भधारणेच्या काळात टीटीचे पहिले इंजेक्शन लवकर देणे गरजेचे आहे. पहिले इंजेक्शन घेतल्यानंतर चार आठवड्यांनी दुसरे आणि सहा महिन्यानंतर तिसरे इंजेक्शन घ्यायला हवे. काहीवेळा डॉक्टर प्रसूतीपूर्वच्या अपॉइंटमेंटमध्ये टीटीचे पहिले इंजेक्शन देतात. तसेच बाळंतपण होईपर्यंत गर्भवतींना टीटीची तीन इंजेक्शन देखील देण्याचा विचार केला जातो.

पहिल्या गर्भधारणेच्या काळात टीटीची दोन इंजेक्शन दिले असतील तर पुढील तीन वर्षांपर्यंत टीटॅनसपासून संरक्षणकवच लाभते. तीन इंजेक्शन दिले असतील तर पाच वर्षांपर्यंत बचाव होईल. या कालावधीत महिला दुसर्‍यांदा गर्भवती राहत असेल तर कदाचित बूस्टर इंजेक्शन देण्याची गरज पडेल.

पहिल्या आणि दुसर्‍या गर्भधारणेत अंतर अधिक असेल तर कदाचित टीटीची दोन इंजेक्शन घ्यावे लागतील.

इंजेक्शनच्या वेदना

टीटीचे इंजेक्शन दिल्यानंतर इंजेक्टेड ठिकाणी वेदना होऊ शकते. वेदनेपासून आराम मिळण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी त्याठिकाणी आईसबॅग ठेवण्यास हरकत नाही.

वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर गोळ्या घेण्याचे टाळावे. कारण गर्भधारणेत ही कृती सुरक्षित ठरत नाही.

अगदीच गरज असेल तर पॅरासिटीमॉलची टॅबलेट घ्यावी. परंतु शक्यतो पेनकिलर गोळी घेण्याचे टाळावे. बर्फाचा वापर करून जागा बधीर करावी.

Back to top button