लठ्ठपणा : कमी वयातील वाढती समस्या | पुढारी

लठ्ठपणा : कमी वयातील वाढती समस्या

लहान मुलांत स्थूलता येण्याची, लठ्ठपणाची समस्या अधिक वाढत चालली आहे. कमी वयात लठ्ठपणा आहे म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेण्यापेक्षा शरीराला सांभाळणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. योग्यवेळी अचूक प्रयत्न केल्यास अनेक समस्यांवर मात करता येणे शक्य आहे. यास स्थूलपणा देखील अपवाद नाही.

धावपळीची जीवनशैली आणि अनियमित आहारामुळे उच्च रक्‍तदाब, मधुमेह आणि हृदयासंबंधीच्या समस्या निर्माण करणार्‍या आजारांचा धोका वाढला आहे. लठ्ठपणा देखील या समस्येपैकीच एक आहे. हा लठ्ठपणा केवळ मोठ्या लोकांमध्ये नाही तर सर्व वयोगटांतील मुलांत दिसून येत आहे.

विशेेषत: लहान मुलांत वाढते वजन हे अनेक आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे. एका आकडेवारीनुसार मुलांत स्थूलता वाढण्याची सर्वाधिक समस्या ही चीनमध्ये आहे. भारत या प्रकरणात दुसर्‍या स्थानावर आहे.

भारतात सुमारे दीड कोटींहून अधिक मुले सामान्यांपेक्षा अधिक वजनाचे आहेत आणि त्याची संख्या वेगाने वाढत चालली आहे. अमेरिकेत देखील एक तृतियांश मुले सामान्यांपेक्षा अधिक वजनाचे किंवा लठ्ठपणाने त्रस्त आहेत.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, मुलांत वयस्करांच्या तुलनेत स्थूलतेची समस्या अधिक वेगाने वाढत आहे. हा लठ्ठपणा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम करत आहे.

बीएमआय इंडेक्स समजून घ्या

भारदस्त, धिप्पाड दिसणारी सर्वच मुले हे लठ्ठपणाचे शिकार असतात असे नाही. प्रत्यक्षात प्रत्येकाची शारीरिक रचना ही एकमेकांपेक्षा विभिन्‍न असते. वय समान असतानाही काही मुले सडपातळ असतात, तर काही जण गुबगुबीत असतात. त्यांच्या हाडांची रचना ही एकमेकापेक्षा वेगळी असते. वयस्कर होईपर्यंत मुलांचा विकास हा वेगवेगळ्या टप्प्यांतून होत असतो.

त्यामुळे त्यांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांवर चरबी जमा होत राहते. काही मुले मोठे होताना चरबी संतुलित होते. अर्थात ही बाब त्यांची उंची आणि देहयष्टीवर अवलंबून असते. एखाद्या मुलांकडे वरवर पाहून त्याच्या लठ्ठपणाचा अंदाज गृहित धरला जात नाही.

तज्ज्ञ मंडळी बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)ची मोजणी करत लठ्ठपणा किंवा सरासरीपेक्षा अधिक वजनाच्या समस्येचा शोध घेतात. बीएमआयचे मोजमाप हे मुलाचे वय, वजन, उंची यानुसार निश्‍चित केले जाते.

जर मुलांचा बीएमआय हा त्याच्या वयाच्या तुलनेत 85 ते 95 टक्के अधिक असेल तर त्याला लठ्ठपणा मानला जाईल. काही वेळा रक्‍ताची चाचणी देखील करावी लागते.

कारणांचा शोध घेणे गरजेचे

अधिक जंकफूड खाणे, शारीरिक श्रम कमी असणे, दिवसभर संगणक किंवा मोबाईलवर व्यग्र राहणे ही लठ्ठपणाची विशेष कारणे आहेत.

यूएस डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्यूमन सर्व्हिसेस (एचएचएस) च्या एका रिपोर्टनुसार तब्बल 32 टक्के अल्पवयीन मुली आणि 52 टक्के अल्पवयीन मुले हे दररोज सुमारे एक लिटरपर्यंत कोल्ड ड्रिंक्स घेतात. याशिवाय लठ्ठपणा वाढवण्यामागे आणखी काही कारणे आहेत.

असंतुलित आहार : पिझ्झा आणि चिप्ससारखे फास्टफूड हे सॅच्युरेटेड फॅटचे गोदाम असतात. त्यात चरबीयुक्‍त पदार्थ आणि मिठाचे अधिक प्रमाण असते. याप्रमाणे कोल्ड ड्रिंक्स आणि डबाबंद ज्यूससारख्या पदार्थांतही साखरेचे प्रमाण अधिक असते.

दीर्घकाळापर्यंत या पदार्थांचे सेवन केल्यास लठ्ठपणा वाढू शकतो. कोणत्याही शारीरिक श्रमाशिवाय संपूर्ण दिवस एकाच ठिकाणी घालवल्यास लठ्ठपणाची समस्या वाढू शकते.

अनुवांशिकता : जर मुलांच्या पालकांत किंवा कुटुंबामध्ये लठ्ठपणाचा इतिहास असेल तर मुलांमध्ये वजन वाढण्याची शक्यता बळावते.

अनुवांशिक कारणांमुळे भोजनाच्या रूपातून सेवन केलेले चरबीयुक्‍त पदार्थ हे शरीरात जमा होत राहतात. या चरबीमुळे लठ्ठपणा हळूहळू वाढू लागतो. आई-वडील स्थूल असतील तर मुलांचे वजन देखील अधिक असण्याची शक्यता राहते.

कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड : देशातील उच्च उत्पन्‍न कुटुंबातील मुलांत लठ्ठपणा होण्याचे प्रमाण हे 35 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामागे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्ड ड्रिंक्स आणि जंक फूडचे अतिसेवन.

सध्या देशात दीड कोटीहून अधिक मुलांना लठ्ठपणाचा त्रास होत असून ही संख्या 2025 पर्यंत 1.7 कोटी होण्याची शक्यता आहे.

5.8 ते 8 टक्क्यांपर्यंत शालेय दशेतील मुलांना लठ्ठपणाने वेढले आहे. वेग असाच राहिल्यास भारतात 2030 पर्यंत लठ्ठ मुलांची संख्या प्रचंड वाढू शकते.

उपचार

* मुलांना अधिकाधिक ताजे पदार्थ देणे आणि ते खाण्यास प्रेरित करणे.

* मुलांना देहयष्टीचे महत्त्व सांगा आणि अधिकाधिक सॅलेड खाण्याचे महत्त्व पटवून द्या.

* फराळात डबाबंद कॉर्नफ्लेक्स, ब्रेड किंवा बिस्किट देण्याऐवजी दलिया, पोहे, इडलीसारखे पदार्थ द्यावेत.

* आहरात डाळ, पनीर, सोयाबीन, अंडी, चिकन आणि फिशचा समावेश करावा. यात प्रोटिनचे उच्च प्रमाण असते. या पदार्थाच्या सेवनामुळे बराच काळ भूक लागत नाही.

* स्क्रीन टाईमबाबत वेळापत्रक तयार करा. सायंकाळी गार्डनमध्ये खेळण्यासाठी प्रोत्साहित करा.

* कोल्ड ड्रिक्स/ डबाबंद ज्यूसऐवजी घरात सरबत, कोकमसह अन्य जलपेय द्यावेत.

* मुलांना डायटिंगच्या नुकसानीची माहिती द्यावी. त्यांना पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगावे.

* भूक लागल्यानंतर बाजारातून फास्टफूड आणण्याऐवजी घरातच भेळ, चकली, चिवडा, शंकरपाळे यासारख्या वेगवेगळ्या पदार्थाचा नाश्ता द्यावा.

* रिफाईंड शूगरऐवजी मध किंवा गुळाचा वापर करावा.

* मुलांच्या आहारात सर्व प्रकारच्या पौष्टिक पदार्थाचा समावेश करावा.

डॉ. प्राजक्‍ता पाटील

Back to top button