

मानवी शरीरात गळ्याच्या मध्यभागी थायरॉईड नावाची अंतर्स्रावी ग्रंथी असते. शरीरातील अनेक क्रिया या थायरॉईड ग्रंथीच्या स्रावाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. ज्यावेळी कोणत्याही कारणांनी थायरॉईड ग्रंथीच्या थायरॉक्झिन, (T4) व ट्रायआयडॉथायरोनिन (T3) या स्रावाचे रक्तातील प्रमाण वाढते त्यावेळी शरीरात विविध तक्रारी उत्पन्न होतात. या अवस्थेला 'हायपरथायरॉईडीझम' असे म्हटले जाते.
काही वेळा थायरॉईड ग्रंथीच्या सुजेमुळे अतिरिक्त संचीत स्राव रक्तात आल्यामुळे तर काही वेळा थायरॉईड हार्मोन्सच्या गोळीचा डोस जास्त जात राहिल्याने देखील हा विकार होऊ शकतो.
हायपरथायरॉईडीझमची कारणे
थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढणे म्हणजेच 'गॉयटर' नोड्यूकलर गॉयटर, कॅन्सर चा थायरॉईडमध्ये प्रसार, थायरॉईडचा कॅन्सर, पिच्युटरी ग्रंथीचा कॅन्सर, थायरॉईड ग्रंथीला सूज आल्यामुळे, तसेच हायपोथायराईडचे उपचार करताना थायरॉईड हार्मोन्स चा डोस जास्त जात राहणे तसेच काही वेळा अनुवंशिकता यामुळे आढळणारा हा विकार महिलांमध्ये तरुण वयात जास्त दिसून येतो. अचानक वाढलेले कोणतेही तणाव काही वेळा हायपरथायरॉईडीझमचे कारण ठरते.
हायपरथायरॉईडीझम मधील तक्रारी
गळ्याच्या मध्यभागी गाठ येते. गळ्याचा आकार मोठा दिसू लागतो. बहुतांशी ही सूज दोन्हीही बाजूला असते, तर क्वचित रुग्णात एकच बाजू सुजलेली दिसते. अशक्तपणा जाणवतो, ताप येणे, अंग गरम राहणे, चिंताग्रस्तता, अस्वस्थता वाटत असते. घाम जास्त येतो, ऊन सहन होत नाही, चेहरा व मान लाल होणे, हा त्रासही होत असतो. हृदयाची धडधड वाढत असते.
डोळ्यावरील परिणामामुळे डोळे खोबणीतून बाहेर आलेले असतात. मोठे दिसतात, दिसण्यात अडचणी येतात. धूसर अंधूक दिसते, डोळे खाजणे, लाल होणे, सुजणे, हा त्रास देखील होऊ शकतो. भूक जास्त लागते. सारखी खा-खा होते. काहींना सतत उलटी किंवा जुलाब होतात. शरीराचे पोषण कमी होऊन वजन उतरलेले असते. दैनंदिन वागणुकीमध्ये नैराश्य, चिडचिडेपणा, मानसिक अस्वस्थता जाणवत असते. महिलांमध्ये अंगावरून कमी रक्तस्राव होणे, वंध्यत्वाची समस्या होऊ शकते. अंग खाजणे, अंगाची आग होणे, तळहात लाल होणे, पायावर सूज, केस पातळ होणे, या तक्रारींमुळे त्वचेचे स्वास्थ्य बिघडलेले असते. काही जणांत हातापायांना जास्त घाम येतो.
शिरास्नायूंच्या तक्रारी
हातपायांना कंप येणे, हातपाय कापणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, स्नायूंची झीज होणे, अशक्तपणा, स्नायूंची हालचाल कमी होणे, हातपायात ताकद कमी होणे.
वरीलप्रमाणे विविध तक्रारी असल्या तरी प्रत्येक पेशंटमध्ये त्या कमी-अधिक प्रमाणात आढळून येतात.
हायपरथायरॉईडचे निदान
रक्ताच्या T3, T4, TSH या घटकांची तपासणी तसेच थायरॉईडची सोनोग्राफी, काही वेळा स्कॅन या तपासण्यावरून हायपरथायरॉईडीझम चे निदान होते.
आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेद शास्त्रानुसार काही जणात गलगंड या विकाराची लक्षणे आढळून येतात. हायपरथायराईडीझमच्या विकारात शरीरातील वात व पित्त दोषांचा प्रकोप झालेला असतो. शरीरातील रस, रक्त व मांसधातू या धातूंमध्ये बिघाड उत्पन्न होऊन धातूपाक ही अवस्था आलेली असते. कालांतराने धातूबल कमी झालेले आढळते. याच्याच जोडीला काही जणांत मानसिक अस्वस्थतेची लक्षणेही आढळून येतात.
हायपरथायरॉईडीझमवरील उपचार
आधुनिक शास्त्राप्रमाणे थायरॉईड हार्मोन्सचे वाढलेले प्रमाण नियंत्रित करणारी हार्मोन्सचे संतुलन निर्माण करणारी रासायनिक औषधे दिली जातात. काही दिवसांनी तक्रारी कमी होऊन काहींना बरेही वाटते; पण काही रुग्णात रक्ताचा रिपोर्टमधील दोष कमी होतो; परंतु होणार्या तक्रारी पूर्ण कमी होत नाहीत.
अशा रुग्णांना आयुर्वेदिक शास्त्रीय उपचारांची जोड दिल्यास आश्चर्यकारक परिणाम मिळतो. खूपदा तक्रारीची तीव्रता उत्तम प्रमाणात कमी होताना आढळते.
आयुर्वेदिक उपचारांचे स्वरूप
होणार्या त्रासाच्या प्रमाणानुसार औषधोपचार व गरजेप्रमाणे पंचकर्म उपचारांच्या युक्तीने वापर केला जातो.
वातपित्तशामक औषधी तेलाने डोक्याला अभ्यंग, नस्यकर्म, शिरोपिचू, शिरोधारा, इ.काही वेळा बस्ती विरेचन या उपचारांचा उत्तम उपयोग होतो.
जाणवणारी लक्षणे, त्यांची तीव्रता, प्रकृती शरीरबल, यांचा विचार करून संयुक्त औषध वापरावी लागतात. यामध्ये कांचनार, शतावरी अश्वगंधा, गुडुची, निम्ब, पटोल, दाडीम, सारीवा, मंजिष्ठा, त्रिफला, द्राक्षा, विदारी, ब्राम्ही, जटामांसी, कमल, गिलोय, सत्व, चंदन, वाळा, कवचबीज, अर्जुन इ. वनस्पती माक्षिका, अभ्रका, रौप्य, मौक्तिक, प्रवाळ कुकुटांड, भस्म या भस्म औषधीपासून केलेले संयुक्त कल्प वापरले जातात.
डॉ. आनंद ओक