पायदुखीपासून सुटका | पुढारी

पायदुखीपासून सुटका

अनेकांना पायदुखीचा त्रास होऊ शकतो. हा एक सर्वसामान्य त्रास असला तरी त्याची कारणे मात्र वेगवेगळी असू शकतात. बदलत्या जीवनशैलीतील आहार-विहाराची पद्धत, धूम्रपान, मद्यपान, पादत्राणांची चुकीची निवड, उठण्या-बसण्याच्या चुकीच्या पद्धती अशी अनेक कारणे त्यामागे असतात. त्यामुळे पायदुखीपासून सुटका करून घ्यायची असेल किंवा अशा प्रकारचा त्रास नको असेल तर जीवनशैलीत बदल करायला हवाच; पण त्याचबरोबर पूरक व्यायामही करायला हवा.

आरोग्याच्या सर्वसामान्य तक्रारींमध्ये पायदुखीचादेखील समावेश करावा लागेल. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये ही तक्रार जाणवते; पण तुलनेने यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त दिसून येते. पाय कशा पद्धतीने दुखतात, यावरून पाय दुखण्यामागचे कारण शोधता येते.

कमरेपासून पोटरीपर्यंत चमक येत असेल, बसले तरी त्रास होत असेल, पाय पसरून उताणे झोपले तरी रग लागत असेल आणि वाकून काही वस्तू उचलली तर फारच तीव्र वेदना होत असतील तर संबंधित व्यक्तीला कमरेतील मणक्यांचा आजार आहे आणि त्यामुळे पायांकडे जाणार्‍या नसांवर दाब येत असेल असे निदान काढले जाते.

मधुमेह झालेल्या व्यक्तींना काही वेळा सुरुवातीला पायदुखीचा त्रास होत नाही; पण कालांतराने खूप पायदुखी सुरू होते. पायांची जळजळ होणे, पाय सुन्न होणे, काही वेळा उदबत्तीसारखे चटकेही जाणवतात. ही स्थिती जुनाट आणि नियंत्रित नसलेल्या मधुमेहामुळे निर्माण होते. अशा प्रकारचा त्रास नसांचा दाह, मद्यपानाचा अतिरेक, कुपोषणातून उद्भवणारी जीवनसत्त्वांची कमतरता इत्यादीमुळे होऊ शकतो.

ज्या लोकांना खूप जास्त धूम्रपान करण्याची सवय असते आणि नंतर ती सवय बंद केली तर अशा वेळीही तीव्र पायदुखीचा त्रास सुरू होतो. पन्नासएक पावले चालले की, मांड्या, पोटर्‍या दुखायला लागतात. बसले किवा उभे राहिले तर ठणका कमी होतो. धूम्रपानामुळे पायांतील रोहिण्या आणि शुद्ध रक्तवाहिन्या अरुंद होतात, हे यामागचे कारण असते.

बर्‍याच महिलांना पायात गोळे येतात. दिवसा तशी तक्रार नसते; पण रात्री झोपेत थोडेसे पाय ताणले गेले की, अचानक पोटरीचे स्नायू आखडतात आणि घट्ट होतात. त्यातून इतक्या भयंकर कळा येतात की, अक्षरशः ओरडावेसे वाटते. हाताने काही वेळ मसाज केल्यानंतर हळूहळू हे दुखणे कमी होते. काही वेळा हा प्रकार पावलांच्या बोटांतही होतो.

एक बोट दुसर्‍यावर चढते आणि पाऊल सरळ होत नाही. अशा प्रकारचे दुखणे काही वेळा औषधांमुळेसुद्धा उद्भवते. डाययुरोटिक्स किंवा स्टॅटिन्स यांसारखी औषधे घेणार्‍या रुग्णांना कधी कधी अशा प्रकारची पायदुखी होते. अशावेळी औषधांचे प्रमाण कमी करणे किंवा बदलणे हाच उपाय असतो. अशा त्रासात डॉक्टर पिरिडॉक्सिंग, ब्रिटॅमिन-ई यांसारखी औषधे देतात. तसेच भरपूर पाणी पिणे, फळे खाणे आणि नियमित चालणे फायद्याचे ठरते.

पायांमध्ये खुबा, गुडघा आणि घोटा हेे तीन मुख्य सांधे असतात. तसेच पावलांमध्येही छोटे छोटे सांधे असतात. या सर्व सांध्यांमध्ये वयानुसार स्थूलपणामुळे, दुखापत झाल्यामुळे, दाब वाढल्यामुळे झीज होऊ शकते किंवा संधिवातामुळे सूजही येऊ शकते. ही दुखणी सांध्यांमधील आहे हे कळल्यानंतर त्यावर व्यायाम आणि इतर उपचार करता येतात. काही स्त्रियांच्या टाचा खूप दुखतात. आपल्या शरीराचे सर्व वजन पावलांच्या तुलनेत लहान सांध्यांवर पडते. रस्त्यावर असणारे खाचखळगे, दगड यामुळे पावलांना इजा पोहोचू शकते.

अशा वेळी पादत्राणे नरम, जाड आणि चांगल्या दर्जाची असावीत. पण बर्‍याच जणी उंच टाचांच्या सँडल घालतात, तर काही अगदी पातळ टाचांच्या. या पादत्राणांचा पावलांच्या संरक्षणासाठी काही उपयोग नसतो. फिरायला जातानाही पातळ कापडी शूज उपयोगाचे नसतात, तर जाड तळाचे मध्ये हवेच्या पोकळ्या असणारे वॉकिंग शूज उत्तम असतात. ज्यांची पावले दुखतात, त्यांनी एकदा चवड्यावर, एकदा टाचेवर अशा प्रकारचा व्यायाम करावा. वाळूमध्ये चालावे. योग्य पादत्राणे आणि व्यायाम यामुळेही (पायदुखीपासून सुटका) दुखणी कमी होतात.

बर्‍याच जणांची तक्रार असते की, पाय भरून येतात. उभ्याने काम करताना किंवा ऑफिसमध्ये दहा-बारा तास खुर्चीवर बसून काम केल्यास बर्‍याच स्त्री-पुरुषांचे पाय जड होतात आणि घोट्यांजवळ सूजही दिसते. घोट्यांजवळच्या अशुद्ध रक्तवाहिन्या अशा प्रकारे अनेक दिवस फुगत राहिल्या तर त्वचेखाली वेड्यावाकड्या निलांचा एक गठ्ठा तयार होतो. त्याला व्हेरीकोज व्हेंज असे म्हणतात.

गर्भारपणातील अतिरिक्त वजन, पुढे व्यायामाचा अभाव, लहान जागेत सतत उभे राहून काम करणे, अनेक तास खुर्चीत बसणे यामुळे पायांतील रक्ताभिसरण मंद होते आणि अधिकाधिक रक्त नीलांमध्ये साठू लागते. त्यामुळे हळूहळू निळसर रेषांची जाळी तयार होते आणि त्यानंतर पाय भरून येण्यासारख्या तक्रारी सुरू होतात. हा त्रास होऊ नये म्हणून पायांची सतत हालचाल असावी. काही कामे उभ्याने, तर काही कामे खाली बसून करावीत.

सोफ्यावर, खुर्चीवर बसताना पाय लोंबकळत ठेवू नयेत. शक्यतो खाली पाय पसरून बसावे, पायाखाली स्टूल घ्यावे किंवा सरळ मांडी घालून बसावे. दर तासाने इकडे-तिकडे फिरावे. टाचांवर आणि चवड्यांवर चालण्याचा व्यायाम शंभर-दोनशे वेळा करावा. रात्री झोपताना सुरुवातीची दहा-पंधरा मिनिटे पाय उंच लोडावर ठेवावेत. दिवसासुद्धा भिंतीलगत झोपून दोन्ही पाय भिंतीच्या आधाराने 90 अंशांत उभे करून ठेवल्यास पाच मिनिटांत आराम जाणवतो. नियमित व्यायाम, पळणे, चालणे, खेळणे हेच या त्रासावर उत्तम उपाय आहेत.

या त्रासांकडे दुर्लक्ष केल्यास आणि वेळीच उपाय न केल्यास डीपव्हेनथ्रॉम्बोसिस (डीव्हीटी) हा त्रास होतो. यामध्ये पायातल्या एखाद्या निलेमध्ये गुठळी तयार होते आणि त्यामुळे तिथला रक्तप्रवाह थांबतो. ही गुठळी गुडघ्याच्या खाली झाली तर उपचार फारसे नसतात. दहा दिवस गुठळी विरघळण्यासाठी इजेक्शन आणि नंतर गोळ्या दिल्या जातात.

तसेच नियमित तपासण्या आणि नियम पाळून डॉक्टर यावर उपचार करतात. डीव्हीटी गुडघ्याच्या वरच्या भागात झाला तर उपचार तातडीने आणि गांभीर्याने करावे लागतात. कारण, मांडीतली गुठळी वर सरकून पोटातून हृदयापर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. त्याला अवधीही कमी लागतो. त्यामुळे अशी परिस्थिती धोक्याची असते हे लक्षात घ्यावे. लांब पल्ल्याचा विमान प्रवासदेखील पायांत गुठळी तयार करण्यास कारणीभूत ठरू शकतो.

कारण विमान प्रवासात आपण जास्त उठत नाही. अशावेळी भरपूर पाणी पिणे, बसल्या बसल्या पायांच्या हालचाली सुरू ठेवणे, शक्य तितक्या वेळा विमानात तसेच ट्रॅझिट लाऊंजमध्ये फेर्‍या मारणे हे उपाय आवर्जून करावेत. पायदुखीची काही सर्वसामान्य कारणे जाणून घेतल्यानंतर आपण नियमित व्यायाम, आहार, विहार याला नक्कीच महत्त्व देऊन पायदुखीपासून सुटका मिळवू शकतो.

डॉ. प्राजक्ता पाटील 

Back to top button