वार्षिक राशिभविष्य 2022, सुयश लाभेल : तूळ | पुढारी

वार्षिक राशिभविष्य 2022, सुयश लाभेल : तूळ

मनुष्य हा बौद्धिक व कलेची भूक असलेली व्यक्ती आहे. नाटक, सिनेमा, रंगभूमी, चित्रपटसृष्टी, नृत्य, काव्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तूकला, संगीत, कथा, काव्य हे तूळ व्यक्तींचे विशेष आहेत. साहित्य व संगीत याची ज्यांना आवड नाही त्यांची संभावना पंडितांनी पशूत केली आहे. संगीत, वाद्य, चित्रपट व नाट्य याची मोहिनी तुळा व्यक्तींना जन्मजात असते. तुळा व्यक्ती म्हणजे मानवी जीवनाचे वैभव आहे. जीवन कसे जगावे हे तुळा व्यक्तींना अधिक कळते. सर्वांबरोबर मिळून मिसळून वागण्याची कला, आर्जवी, मधुर व्यक्तिमत्त्व, न्यायाविषयीची आवड व सर्वांबरोबर मिळतेजुळते घेण्याच स्वभाव यामुळे तुळा व्यक्ती सर्वांनाच प्रिय असतात. नि:पक्षपातीपणा व न्यायीपणा याची आवड आपणाला जन्मजात आहे. समतोल विचाराबद्दल आपण प्रसिद्ध असता. स्वातंत्र्य, न्याय, समता व बंंधुता या मूल्यांच्यावर आपला विश्वास असतो. तूळ राशीच्या व्यक्ती म्हणजे मानवी जीवनाचे वैभव आहे. पावित्र्य, सात्त्विकता, शुद्धता, निर्मळता, सुंदरता, आकर्षकता यामध्ये न्हाऊन निघालेली आपली रास आहे.

आरोग्य

आरोग्याच्या द़ृष्टीने हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींना चांगले जाणार आहे. जीवनाकडे आपण सकारात्मक द़ृष्टीने पहाल. आपल्या जीवनात वैचारिक प्रगती होणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. सामान्यत: आरोग्य चांगले राहील. मात्र, काहीवेळा आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहणार आहेत. दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा आरोग्याच्या द़ृष्टीने चांगला असणार आहे. अधूनमधून आरोग्य किंवा मानसिक स्थिती बिघडेल. या तक्रारी आरोग्याच्या असणार नाहीत. थोड्या अडचणी आल्यामुळे मानसिक दबाव राहणार आहे. प्रत्यक्ष आरोग्याच्या तक्रारी असणार नाहीत.

खालील कालखंड आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 24/05/2022 ते दि. 18/06/2022
दि. 13/07/2022 ते दि. 24/09/2022
दि. 01/11/2022 ते दि. 31/12/2022

व्यवसाय व आर्थिक स्थिती

तूळ राशीच्या व्यक्तींना व्यवसाय, व्यापाराच्या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. मात्र, पूर्णपणे समाधानकारक असणार नाही. थोड्या अडचणी राहतील. परंतु, त्या अडचणी किरकोळ स्वरूपाच्या व तात्कालिक असतील. अडचणीचे स्वरूप फार मोठे असणार नाही. तुमचे व्यवसायातील निर्णय योग्य येणार आहेत. व्यवसायात वाढ होईल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्या द़ृष्टीनेदेखील ग्रहमान समाधानकारक ठरणार आहे. व्यवसायात तुमचे निर्णय अचूक ठरतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. नवीन करारमदार करू शकाल. व्यापारात, उद्योगात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जुनी येणी वसूल होतील. हे वर्ष तुळा राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने चांगले आहे. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. दि. 12/04/2022 पर्यंत नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. कर्मचारीवर्गाचे चांगले सहकार्य लाभणार आहे. दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. व्यवसायाची नवी शाखा सुरू करू शकता.

खालील कालखंड व्यवसाय व आर्थिक लाभाच्या द़ृष्टीने अनुकूल ठरतील.

दि. 01/01/2022 ते दि. 26/02/2022
दि. 26/06/2022 ते दि. 17/09/2022
दि. 20/09/2022 ते दि. 15/10/2022
दि. 01/11/2022 ते दि. 07/12/2022

नोकरी

नोकरीतील तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. काहींची बदली होण्याची शक्यता आहे. जबाबदारी वाढणार आहे. कामाचा ताण वाढेल, दगदग वाढेल. मानसिक ताणतणाव राहणार आहेत. नोकरीमध्ये स्वास्थ्य मिळण्याचे हे वर्ष आहे. दगदग, कामाचा ताण, कटकटी, ताणतणाव हे सर्व यावर्षी कमी होईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी तुम्हाला कसल्याही अडचणी न येता शांतपणे काम करता येईल. अस्वास्थ्य कमी होणार आहे. आपली ठरावीक कामे सोडून नको ती कामे करावी लागणार नाहीत. नोकरीमध्ये थोरामोठ्यांचे व वरिष्ठांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. तूळ राशीच्या व्यक्तींना यावर्षी बढतीचे योग आहेत. यावर्षी तुमच्या बढतीच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. हितशत्रूंच्या कारवाया बंद पडतील. विरोधकावर मात कराल. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड बढतीच्या द़ृष्टीने चांगला आहे.

खालील कालखंड नोकरीच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 12/02/2022 ते दि. 13/03/2022
दि. 14/04/2022 ते दि. 14/05/2022
दि. 15/06/2022 ते दि. 16/09/2022
दि. 17/11/2022 ते दि. 17/12/2022

सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे.खालील कालखंडात आपण विशेष काळजी घ्यावी.

दि. 14/01/2022 ते दि. 12/02/2022
दि. 01/03/2022 ते दि. 06/04/2022
दि. 10/08/2022 ते दि. 15/10/2022

या कालखंडात आपण विशेष काळजी घ्यावी.

प्रॉपर्टी

प्रॉपर्टीच्या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. गुंतवणुकीलाही हे वर्ष समाधानकारक आहे. विशेषत: मोठमोठ्या जमिनीचे व्यवहार करणार्‍यांना हे वर्ष चांगले आहे. बिल्डर्स, डेव्हलपर्स व कॉन्ट्रॅक्टर्स यांनाही हे वर्ष चांगले आहे. मात्र, प्रॉपर्टीचे व्यवहार हे विलंबाने होणार आहेत.

खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत.

दि. 01/04/2022 ते दि. 26/04/2022
दि. 23/05/2022 ते दि. 18/06/2022
दि. 14/07/2022 ते दि. 23/09/2022
दि. 19/10/2022 ते दि. 11/11/2022

संततिसौख्य

संततिसौख्याच्या द़ृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. मुला-मुलींचे प्रश्न सुटतील. मुला-मुलींची प्रगती, मुला-मुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्न, शाळा, कॉलेजच्या प्रवेशाचे प्रश्न या द़ृष्टीने हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे आहे. दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड काहीसा समाधानकारक राहील. दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड समाधानकारक असणार नाही. मुला-मुलींच्या संदर्भातील महत्त्वाचे प्रश्न व एकूणच तुमच्या जीवनाविषयीचे महत्त्वाचे प्रश्न यांच्या संदर्भातील जे काही प्रश्न आहेत त्याचे निर्णय हे शक्यतो दि. 14/04/2022 पूर्वी घ्यावेत. दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा अनेक द़ृष्टीने चांगला आहे. विद्यार्थ्यांना सर्व द़ृष्टीने चांगला आहे.

खालील कालखंड संततिसौख्याच्या व विद्यार्थ्यांच्या द़ृष्टीने अनुकूल जातील.

दि. 14/01/2022 ते दि. 12/02/2022
दि. 01/04/2022 ते दि. 26/04/2022
दि. 06/03/2022 ते दि. 24/03/2022
दि. 02/07/2022 ते दि. 23/09/2022
दि. 11/11/2022 ते दि. 27/12/2022

वैवाहिक सौख्य

वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने व विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. शुभ कार्यासाठी हे वर्ष चांगले आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराबरोबर सुसंवाद साधू शकाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सामान्यत: हे वर्ष काहीसे संमिश्र स्वरूपाचे आहे. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. परंतु, ते फार टोकाचे असणार नाहीत. विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या द़ृष्टीने हे संपूर्ण वर्ष चांगले आहे. विशेषत: दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा विवाहेच्छुंचे विवाह जमण्याच्या द़ृष्टीने व होण्याच्या द़ृष्टीने अधिक चांगला आहे.

खालील कालखंड वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने चांगला आहे.

दि. 01/01/2022 ते दि. 15/01/2022
दि. 27/02/2022 ते दि. 26/04/2022
दि. 23/05/2022 ते दि. 18/06/2022
दि. 27/06/2022 ते दि. 10/08/2022
दि. 15/10/2022 ते दि. 05/12/2022

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, परदेश प्रवास, सहली या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. विशेषत: दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा अधिक चांगला आहे.

दि. 01/04/2022 ते दि. 06/04/2022
दि. 14/07/2022 ते दि. 23/09/2022
दि. 19/10/2022 ते दि. 31/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

सामाजिक, सार्वजनिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार व पद मिळण्याच्या द़ृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक आहे. आपणाला अपेक्षित यश लाभेल. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात काहींना मानसन्मान व कीर्ती लाभेल. कोणतेही निर्णय घाई गडबडीत घेऊ नये. शांतपणाने, विचारविनिमय करून महत्त्वाच्या निर्णयांवर यावे. सार्वजनिक क्षेत्रातील आपला वावर वाढणार आहे. आपला परिचय वाढणार आहे. सार्वजनिक कार्यातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुमच्या विचारांचा प्रभाव पडणार आहे. दि. 12/04/2022 पूर्वीच्या कालखंडात शैक्षणिक क्षेत्रात व सांस्कृतिक क्षेत्रात यश मिळेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल तर दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात प्रत्यक्ष अधिकार व पद लाभेल. एकूणच सुसंधी, प्रसिद्धी व अंगीकृत कार्यात यश या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींना सार्वजनिक कामात यश, प्रतिष्ठा या द़ृष्टीने विशेष महत्त्वाचे ठरणार आहे. हितशत्रूंच्या कारवाया थंड पडतील. यावर्षी तुमच्या प्रगतीच्या आड कोणीही येऊ शकणार नाही. मानसन्मानाचे योग येतील. तुमच्या कर्तृत्वाला संधी लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. खालील कालखंडात आपणाला मान, प्रतिष्ठा, अधिकार या द़ृष्टीने चांगला आहे.

दि. 12/02/2022 ते दि. 31/03/2022
दि. 14/04/2022 ते दि. 14/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 16/09/2022
दि. 17/11/2022 ते दि. 17/12/2022

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, अंगीकृत कार्यात यश या द़ृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात संधी मिळेल. लेखन, प्रकाशन, कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. स्वप्ने, मनोरथ फलद्रुप होतील. मुळात तूळ रास ही कला, संगीत, नाट्य, सामाजिक, सांस्कृतिक कार्य यासाठी विशेष महत्त्वाची असते. कलागुणांना वाव मिळणारी ही रास आहे. समाजप्रिय ही रास आहे. त्यामुळे इतरांच्यापेक्षा यांचा साहित्य, संगीत या क्षेत्रात सहजरीत्या प्रवेश होतो व त्यामध्ये प्रगती होते. कलेची दैवी देणगी आपल्याकडे असते. दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा अधिक चांगला आहे. या कालखंडात अनेक कामे मार्गी लागतील. नवे संबंध प्रस्थापित करू शकाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धी या द़ृष्टीने काही प्रमाणात लाभदायक ठरतील.

दि. 10/03/2022 ते दि. 22/04/2022
दि. 04/07/2022 ते दि. 20/09/2022
दि. 10/11/2022 ते दि. 25/12/2022

सारांश

सारांश, तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक जाईल. विशेषत: व्यापार, व्यवसाय, आर्थिक प्रगती नोकरीमध्ये बढती, उद्योग या द़ृष्टीने तूळ राशीच्या व्यक्तींना हे वर्ष समाधानकारक जाईल. जबाबदारी वाढेल. काहीसा मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. परंतु, कोणत्याही क्षेत्रात टोकाचा त्रास होणार नाही. संततिसौख्याच्या द़ृष्टीने व वैवाहिक सौख्याच्या द़ृष्टीने दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड चांगला आहे. तर, दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा व्यवसायाची प्रगती, आर्थिक लाभ, नोकरीत बढती, सार्वजनिक कामात यश, सुसंधी, प्रसिद्धी या द़ृष्टीने चांगला आहे. हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींना समाधानकारक ठरेल. तूळ राशीचे व्यक्तिमत्त्व मुळातच चांगले असते. तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांमुळे तुम्ही आपल्या क्षेत्रात प्रसिद्ध असता. चिकाटी, प्रयत्न, परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करू शकता. हे वर्ष आपणाला सुसंधी व प्रसिद्धी या दोन्ही द़ृष्टीने चांगले आहे. घरात मंगलकार्य घडू शकते. अनेक द़ृष्टीने हे वर्ष तूळ व्यक्तींना चांगले जाणार आहे.

– प्राचार्य रमणलाल शहा

Back to top button