

डॉ. अनिल मडके
कोरोनामुळे टेलिमेडिसिनचा वापर गेल्या दोन वर्षांत वेगाने वाढला. दळणवळणाची सोय नसलेल्या ठिकाणी दुर्गम-ग्रामीण भागात टेलिमेडिसिनचा मोठा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी या सुविधा स्वस्त व्हायला हव्यात…
कोव्हिडच्या आगमनानंतर जगभरातल्या आरोग्य यंत्रणेमध्ये प्रचंड उलथापालथ झाली. कोव्हिडमुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्यामुळे सारे जगच भयग्रस्त झाले. कोव्हिडचा प्रसार – प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी झाला. इतर आजारांसाठीसुद्धा हॉस्पिटलमध्ये जायला लोक कोव्हिड काळात घाबरू लागले. साहजिकच डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी इतर पर्यायी मार्गांचा विचार सुरू झाला.
आज वैद्यकीय क्षेत्र वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानामुळे निदान आणि उपचार सुलभ, वेगवान होऊन त्याचा फायदा रुग्ण आणि डॉक्टर दोघांनाही होऊ लागला आहे. आता 'टेलिमेडिसिन' हा परवलीचा शब्द झाला आहे. 'टेलिहेल्थ' म्हणजे 'दूरस्थ आरोग्य' ही संकल्पना गेल्या 20 -25 वर्षांपासून वापरात आहे. याचा वापर आरोग्य शिक्षण, आरोग्य सल्ला अशा सार्वत्रिक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर व्हायचा; पण कोरोनामुळे टेलिहेल्थची बरीचशी जागा 'टेलिमेडिसिन'ने व्यापली आहे.
टेलिमेडिसिन म्हणजे 'दूरस्थ वैद्यकीय सल्ला, निदान आणि उपचार'. रुग्णाला प्रत्यक्ष न तपासता म्हणजेच रुग्णाशी संपर्क येऊ न देता किंवा त्याला रुग्णालयात दाखल न करता, एकेका रुग्णाला वैद्यकीय सल्ला, तपासण्या आणि उपचार देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा – फोन – व्हिडीओ कॉन्फरन्सचा यशस्वी उपयोग करणे म्हणजे टेलिमेडिसिन.
पाश्चात्त्य देशांत कोरोनामुळे टेलिमेडिसिनचा वापर गेल्या दोन वर्षांत वेगाने वाढला. उत्पन्नाच्या भाषेत बोलायचे झाले तर 2014 पासून 2019 पर्यंत दूरस्थ आरोग्य व्यवस्थेमधील महसुलात दरवर्षी 34 टक्के वाढ झाली. मे 2017 मध्ये अमेरिकेत केवळ 18 टक्के लोक टेलिमेडिसिनचा लाभ घेत होते. कोरोनाच्या आगमनानंतर दर आठवड्यातल्या लाभार्थींची अकरा हजारांची संख्या तब्बल साडेसहा लाखांवर गेली. झूम व्हिडीओचे शेअर 2020 च्या प्रारंभापासून आजअखेर अनेक पटींनी वाढले. मायक्रोसॉफ्टचे शेअर्ससुद्धा महाग झाले. कोव्हिडपूर्वी टेलिमेडिसिन वापरकर्त्यांची संख्या साडेतीन कोटी होती. कोव्हिडनंतर ती 20 कोटींपर्यंत गेली. क्वचित असणारा टेलिमेडिसिनचा वापर कोव्हिडनंतर आता निकडीचा बनू पाहत आहे.
सुरुवातीला म्हणजे जेव्हा टेलिमेडिसिनचा शोध लागला, तेव्हा अमेरिकेतील ग्रामीण भागातील व्यक्तीला रुग्णालयापर्यंत किंवा डॉक्टरपर्यंत पोहोचता येत नाही, म्हणून या पद्धतीचा वापर केला गेला. विसाव्या शतकाच्या मध्यावर टेलिमेडिसिनचा पहिल्यांदा उपयोग केला गेला, तो बोटीवर वैद्यकीय सल्ला देण्यासाठी. 1950 च्या दशकात मनोरुग्णालयांत क्लोज सर्किट टीव्हीच्या माध्यमातून रुग्णांना सल्ला देण्यासाठी टेलिमेडिसिनचा वापर करण्यात आला. गेल्या तीस वर्षांत मानसिक विकार, ब्रेन स्ट्रोक तसेच दमा, मधुमेह आणि हृदयविकार आदी दीर्घकालीन विकारांसाठी टेलिमेडिसिनचा अधिकाधिक उपयोग होत आहे.
टेलिमेडिसिनच्या वापरामुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघेही समाधानी असल्याचे दिसून आले आहे. दळणवळणाची सोय नसलेल्या ठिकाणी दुर्गम-ग्रामीण भागात टेलिमेडिसिनचा मोठा उपयोग होऊ शकतो. त्यासाठी या सुविधा स्वस्त व्हायला हव्यात. अमेरिकेत कोव्हिडनंतर टेलिमेडिसिनचा वापर सर्रास होताना दिसतो. टेलिमेडिसिनसाठी जादाचे शुल्क वापरू नयेत. ते इतर इलेक्ट्रॉनिक अॅप्सप्रमाणेच असावे, असे तिथल्या सरकारचे धोरण आहे.
आपल्या देशात टेलिमेडिसिनचा अजून सर्रास वापर होताना दिसत नाही. कारण, आपल्याकडचे कायदे. आपल्याकडील अनेक कायदे आजही जुने, म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. टेलिमेडिसिनबाबतच्या कायद्याचे तसेच आहे. अजूनही ठोस कायदे नसल्याने टेलिमेडिसिनचा वापर करण्यास अनेक डॉक्टर्स धजावत नाहीत.
गेल्या दोन वर्षांत कोरोना काळातील एकमेकांना न भेटणे ही अपरिहार्यता दूरस्थ वैद्यकीय सल्ल्यासाठी अनिवार्यता ठरली आहे. अमेरिकेत केवळ व्हिडीओ कॉलने घेतलेल्या सल्ल्याला कायदेशीर मान्यता मिळाली आहे. टेलिफोनवरील सल्ला हा अजून कायदेशीर कक्षेत मान्यताप्राप्त नाही. आता टेलिमेडिसिनमध्ये वेगवेगळ्या कंपन्या 'सर्व्हिस प्रोव्हायडर' म्हणजे सेवा पुरवठादार बनल्या आहेत. प्रत्येकाची सेवा देण्याची पद्धत वेगळी आहे. उदाहरणार्थ, सर्व्हिस देणारे वेगवेगळे वैद्यकीय तज्ज्ञ एकाच व्यासपीठावर उपलब्ध असतात. सेवा घेणार्या व्यक्तीला त्या व्यासपीठावर जाऊन म्हणजे नाव नोंदणी करून हव्या त्या तज्ज्ञाकडून सल्ला उपलब्ध करून घेता येतो. अर्थात, या सर्व सुविधा सेवा देणारी कंपनी देत असते आणि त्यासाठी शुल्क आकारत असते.
भारतापुरता विचार करायचा झाला तर टेलिमेडिसिनचा फायदा ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उत्तम आरोग्य सुविधेपासून वंचित असलेल्या 70 टक्के जनतेला होईल. ते घरबसल्या फोनवरून किंवा व्हिडीओवरून आपल्या डॉक्टरांशी संपर्क करतील. वेळेचा अपव्यय आणि दळणवळणातील प्रचंड अडचणी यावर ही एकप्रकारे मात ठरेल. कारण अलीकडच्या आकडेवारीनुसार भारतातील 60 टक्के रुग्णालये ही शहरी भागात आहेत; जिथे केवळ तीस टक्के जनता राहते. भारतात डॉक्टरांची संख्या दर दहा हजाराला आठ इतकी कमी आहे. त्यामुळे टेलिमेडिसिनचा वापर केला तर दरवर्षी चारशे ते पाचशे कोटी डॉलर्स इतक्या रकमेची बचत होईल, असा एका अभ्यास गटाचा अंदाज आहे. आज अनेक स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे रुग्णांची खूप गर्दी असते. काही रुग्णालयांत अगदी पहाटे जाऊन रुग्णांना तपासणीसाठी नंबर लावावा लागतो. अनेक रुग्णांची इच्छा असूनही तेथे उपचार मिळत नाहीत. यावर टेलिमेडिसिन हा एक पर्याय होऊ शकतो. खरे तर, भविष्यात टेलिमेडिसिनचा फायदा हा केवळ ग्रामीण-दुर्गम भागातील लोकांनाच नव्हे, तर मोठ्या शहरातील लोकांनाही तितकाच होणार आहे.
टेलिमेडिसिनचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे रिअल टाईम टेलिमेडिसिन किंवा सिंक्रोनस टेलिमेडिसिन. ज्यामध्ये रुग्ण आणि डॉक्टर हे इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रत्यक्ष हजर असतात आणि प्रशिक्षणातून तसेच वैद्यकीय उपकरणांचा वापर करून रुग्णाजवळ असलेल्या व्यक्तीकडून रुग्णाची तपासणी करून ती डॉक्टरांपर्यंत पोहोचविली जाते. दुसरा प्रकार म्हणजे ऑफलाईन किंवा 'स्टोअर इट फॉरवर्ड व्हिजिट'. यामध्ये रुग्णाच्या तक्रारी, लक्षणे आणि तपासण्यांचे रिपोर्ट, फोटो किंवा व्हिडीओ हे ई-मेलद्वारे डॉक्टरांपर्यंत पाठविले जातात आणि डॉक्टर त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार ते बघून रुग्णाला ई-मेलद्वारे त्याचे
उत्तर पाठवितात. ज्या डॉक्टरांना किंवा रुग्णांना त्यांच्या सोयीने इलेक्ट्रॉनिक भेट घडत नाही, त्यांच्यासाठी हा दुसरा प्रकार सोयीचा ठरतो.
टेलिमेडिसिनचे अनेक फायदे आहेत. दीर्घकालीन आजारासाठी रुग्णांनी घ्यावयाची काळजी-पथ्ये ही त्यांना व्हिडीओवर वारंवार पाहता येतात आणि स्वतःच्या आजारपणात काळजी घेण्याची त्यांची क्षमता वाढते. अनेक रुग्णालयांत रुग्णांना प्रतीक्षालयात म्हणजे वेटिंग रूममध्ये थांबून राहावे लागते. अशा ठिकाणी इतर रुग्णांच्या सान्निध्यात येऊन जंतुसंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टेलिमेडिसिनमुळे हे टळते. कोव्हिड काळात याच भीतीमुळे कोव्हिडव्यतिरिक्त रुग्णसुद्धा रुग्णालयांत जाणे टाळत होते. संसर्ग टाळण्याचा फायदा रुग्णांबरोबर डॉक्टरांनाही होतो.
टेलिमेडिसिनमध्ये रुग्णाला त्याच्या वातावरणात पाहून निदान करण्यात डॉक्टरांना मदत होते. विशेषतः घरातील वातावरणामुळे काही अॅलर्जीकारक पदार्थ असतील, तर ते डॉक्टरांना प्रत्यक्ष दिसू शकते. रुग्णाच्या हालचाली, त्याच्या बोलण्यातील फरक किंवा त्याला लागणारा दम हे टेलिमेडिसिनद्वारेसुद्धा नीटपणे डॉक्टरांना कळू शकते. टेलिमेडिसिनसाठी डॉक्टरांनी वेगळा वेळ काढल्यामुळे ते एखाद्या रुग्णाला शांतपणे आणि दीर्घ वेळ देऊ शकतात. रुग्णालासुद्धा दवाखान्यात जाऊन दीर्घकाळ वेटिंग करून तपासून घेण्यापेक्षा घरीच आरामात बसून डॉक्टरांशी संवाद साधणे सोयीचे आणि आनंदाचे होऊ शकते.
टेलिमेडिसिनमुळे रुग्ण आणि डॉक्टर दोघांचाही वेळ वाचतो. दळणवळणाचा खर्च टळतो. प्रवासातील धोके टळतात. रुग्ण कुठेही असला तरी त्याला सल्ला मिळतो. औषधोपचार सुरू ठेवण्यासाठी पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागत नाही.
लहान मुले किंवा अतिवृद्ध व्यक्ती यांना दवाखान्यात नेणे-आणणे जिकिरीचे असते. त्यांना सांभाळणे इतरांसाठी काही वेळा कसरतीचे असते. रुग्णांबरोबर येण्यासाठी घरातील व्यक्तीला आपल्या कामावर पाणी सोडावे लागते, रजा काढावी लागते. बसमधून, सार्वजनिक वाहनातून प्रवास करणे शक्य नसल्यामुळे त्यासाठी वेगळी भाडेतत्त्वावरची गाडी घ्यावी लागते; ज्याला अव्वाच्या सव्वा खर्च होतो. टेलिमेडिसिनमुळे रुग्णासोबत येणार्या व्यक्तीचा वेळ वाचतो. रुग्ण जर धडधाकट असेल तर त्यांच्याही कामाचा वेळ वाचतो. रजा न काढता सोयीच्या वेळी, ऑफिसच्या मधल्या सुट्टीत चहाच्या वेळी किंवा गृहिणींना घरातले काम करता करता डॉक्टरांचा सल्ला घेता येतो. एक्स रे – सिटी स्कॅन किंवा एमआरआय याच्या फिल्म दूर गावी असणार्या तज्ज्ञांकडे पाठवून त्याचे रिपोर्टिंग करून घेणे किंवा सेकंड ओपिनियन घेणे हे टेलिमेडिसिनमुळे शक्य झाले आहे.
टेलिमेडिसिन पद्धतीत डॉक्टर हे रुग्णाला प्रत्यक्ष तपासू शकत नसल्यामुळे नेमके निदान करणे हे काही आजारांच्या बाबतीत शक्य होत नाही; जे प्रत्यक्ष तपासणीत होऊ शकते. वातावरणातल्या बिघाडामुळे किंवा इलेक्ट्रिसिटीअभावी रुग्ण किंवा डॉक्टर यांच्याकडील संगणक बंद पडू शकतो. त्यात व्यत्यय येऊ शकतो. टेलिमेडिसिनमध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाची माहिती आणि त्याची गुप्तता. इलेक्ट्रॉनिक माध्यमातील रुग्णाची माहिती इतरत्र जाऊ शकते आणि त्यातील गोपनीयतेचा भंग होऊ शकतो. कारण हल्ली कोणाचीही माहिती, कोणाचाही डेटा हॅक होऊ शकतो, म्हणजे चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे ही जबाबदारी अशी सेवा पुरवणार्या कंपनीची राहते.
इंडियन मेडिकल कौन्सिल (प्रोफेशनल कंडक्ट ई टिकीट अँड ईथिक्स) कायदा 2002, ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट – 1940 आणि नियम 1945 – ग्राहक संरक्षण कायदा हे सर्व टेलिमेडिसिनला लागू असतात. थोडक्यात, रुग्णालयासाठी जे कायदे लागू असतात, तेच कायदे टेलिमेडिसिनला लागू आहेत.
विशेषतः इमर्जन्सीच्या बाबतीत टेलिमेडिसिनद्वारे सल्ला देऊ नये किंवा घेऊ नये. अशावेळी डॉक्टरांनी प्रथमोपचाराचा सल्ला द्यावा. कोणती काळजी घ्यावी, याविषयी माहिती घ्यावी आणि नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याविषयी सांगावे.जेव्हा रुग्ण प्रत्यक्ष भेटीसाठी तयार असतो, तेव्हा टेलिमेडिसिनचा आग्रह धरू नये. टेलिमेडिसिनद्वारे एखाद्या रुग्णाला औषधोपचाराचा सल्ला देण्यापूर्वी त्याचे निदान झालेले असावे. निदानाशिवाय उपचार देणे कायदेबाह्य ठरू शकते. मानसिक विकारावरील किंवा झोप येणारी औषधे ही टेलिमेडिसिनद्वारे देऊ नयेत. त्याचा गैरउपयोग होऊ शकतो. जर टेलिमेडिसिनद्वारे प्रिस्क्रिप्शन फार्मासिस्टकडे जाणार असेल तर, फार्मासिस्ट आणि रुग्ण यांची स्पष्ट संमती असणे महत्त्वाचे आहे. इतर कारणांसाठी रुग्णाचे रिपोर्ट – माहिती किंवा फोटो – व्हिडीओ यांच्या वापरासाठी रुग्णाची संमती घेणे महत्त्वाचे ठरते. रुग्णाकडून जर फी घेतली असेल तर त्याची पावती देणे किंवा त्याची प्रत ठेवणे महत्त्वाचे ठरते. टेलिमेडिसिनद्वारे दिलेल्या औषधोपचाराचा वापर जाहिरातीसाठी करण्यापूर्वी रुग्णाला तशी विनंती करणे कायदेशीर असते.
टेलिमेडिसिनमुळे केवळ रुग्णाचा वेळ वाचत नाही तर डॉक्टरांचाही वेळ वाचतो आणि ते आपला अधिक वेळ आपल्या कुटुंबाला देऊ शकतात. सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयात एवढ्या संख्येने रुग्णतपासणी होईल याची खात्री नसते. उदा. न्यूरोफिजिशियन किंवा वंध्यत्व तज्ज्ञ यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये तेवढे रुग्ण येतील याची खात्री देता येत नाही; पण टेलिमेडिसिनद्वारे अगदी दूरदूरच्या गावी राहूनदेखील रुग्ण डॉक्टरांशी संपर्क करू शकतात; पण टेलिमेडिसिनचा वापर करायचा तर केवळ रुग्णांचेच नव्हे तर डॉक्टरांचे प्रशिक्षण व्हायला हवे. टेलिमेडिसिनसाठी दोघांकडे म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्याकडे आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हवीत.
उदाहरणार्थ, चांगल्या दर्जाचे संगणक किंवा अँड्रॉईड मोबाईल फोन तसेच त्यावर उत्तम दर्जाचे अॅप्स असायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेटचे कनेक्शन आणि त्याचा वेग. आपल्याकडे ग्रामीण भागात या सर्व गोष्टी शक्य होतात असे नाही.
आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते काहीसे वेगळे असते. डॉक्टरांनी केवळ रुग्णाला हात लावला तरी बरे वाटते, असा एक सात्त्विक समज काही रुग्णांचा असतो. त्यामुळे अशा रुग्णांना व्हिडीओद्वारे काही सल्ला किंवा उपचार देणे हे डॉक्टरांसाठी कसरतीचे ठरू शकते. कारण, रुग्णाला प्रत्यक्ष न तपासता नेमके निदान करणे आणि एकाच रुग्णाला – जेव्हा मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, श्वसन विकार किंवा संधिवात असे वेगवेगळे आजार असतात, तेव्हा दिली जाणारी औषधे एकमेकांमध्ये गुंता न होता, म्हणजेच त्यांचे साईड इफेक्टस् टाळून नेमक्या मात्रेमध्ये देणे, हे मोठे कसब असते. यासाठी त्या विषयातील प्रावीण्य आणि अनेक वर्षांचा वैद्यकीय विश्वातील अनुभव उपयोगी येतो.
रुग्णानेसुद्धा आपल्या तक्रारी नेमक्या पद्धतीने आणि कमी वेळेत सांगणे हे टेलिमेडिसिनमध्ये महत्त्वाचे असते. नाडीचे ठोके किती आहेत किंवा रक्तदाब किती आहे, रक्तातील साखर किती आहे, ऑक्सिजनची पातळी काय आहे, हे पाहण्यासाठी त्या दुर्गम भागात कुणीतरी उपलब्ध असायला हवे. ऑक्सिमीटर, थर्मामीटर किंवा स्फिग्मो मॅनोमीटर, त्या ठिकाणी ते वापरण्याची क्षमता असलेली व्यक्ती असायला हवी. यासाठी काही प्रशिक्षण द्यावे लागते; पण ती घेण्याची तयारी अनेक ठिकाणी नसते, ही आपल्याकडची अडचण ठरू शकते.
जगभरात टेलिमेडिसिन म्हणजेच दूरस्थ वैद्यकीय सल्ला आणि उपचार भविष्यकाळातील प्रमुख सेवा प्रकार असेल; पण भारतात याचा वापर किती वेगात किंवा किती प्रमाणात होईल हे येणारा भविष्यकाळच ठरवेल. कारण, 33 कोटी देव असलेल्या आणि संत-महंतांची परंपरा असलेल्या आपल्या देशात डॉक्टरांना काही ठिकाणी अजूनही देव समजले जाते आणि हा भाव मनात जपणार्या डॉक्टरांना आणि रुग्णांना टेलिमेडिसिन हे फारसे रुचेल असे नाही. कारण, देव आणि भक्त दोघेही भेटीसाठी नेहमी आतुर असतात. शास्त्रीय दृष्टिकोनातूनसुद्धा प्रत्यक्ष रुग्ण तपासणी आणि उपचार याची सर टेलिमेडिसिनला कधीही येणार नाही, हे मान्य करावे लागेल.