नाशिक, मुंबई, पुणे नंतर आता ड्रग्ज तस्करीचे सिंडिकेट सांगली! | पुढारी

नाशिक, मुंबई, पुणे नंतर आता ड्रग्ज तस्करीचे सिंडिकेट सांगली!

स्वप्निल पाटील, सांगली

नाशिक, मुंबई, पुणे त्यानंतर आता सांगलीदेखील ड्रग्ज तस्करीचे सिंडिकेट बनत चालले आहे. केवळ महिनाभरामध्ये पुण्याच्या पथकानंतर मुंबईतील पथकाने सांगलीतील इरळी गावाध्ये धाड टाकत तब्बल 245 कोटी रुपयांचे 122 किलो एमडी ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यावर छापा टाकत सांगलीतील ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे…

संबंधित बातम्या 

वैद्यकीय, सांस्कृतिक वारसा असणार्‍या सांगलीची ओळख आता अवैध धंद्याच्या तस्करीचे सिंडिकेट अशी बनत चालली आहे. मुंबईमधील कुर्लामध्ये पोलिसांनी तीन किलो एमडी ड्रग्जचा साठा पकडला होता. त्यातून एकास अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीमधून सांगलीचे कनेक्शन समोर आले होते. यावेळी सांगलीतील इरळी गावात ड्रग्ज बनविण्याचा कारखानाच थाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई आणि पुणे गुन्हे शाखेने एमडी ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नाशिक, मुंबई, दिल्ली, पुणे त्यानंतर सांगलीतील कुपवाडमध्ये धाडी टाकत तब्बल तीन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. यापूर्वी गोवा, गुजरात ही राज्ये एमडी ड्रग्जसाठी प्रसिद्ध होती. मुंबईतून एमडी ड्रग्जचा गोरखधंदा जोमात चालविला जातो. परंतु मुंबई गुन्हे शाखेतील पोलिसांनी एमडी ड्रग्ज तस्करांची कंबरडे मोडल्याने ड्रग्ज तस्करांनी ग्रामीण भागाकडे आपला अड्डा बनविल्याचे दिसून येते.

सांगलीतील इरळी गाव देखील यापैकीच एक. एरव्ही चिटपाखरू देखील ज्या परिसरात जाणार नाही, अशा ओसाड माळ रानावर ड्रग्ज तस्करांनी आपला अड्डा बनविला होता. पत्र्याच्या घरामध्ये कोणालाही संशय येणार नाही, अशा पद्धतीने एमडी ड्रग्ज बनविले जात होते. मुंबईत पकडण्यात आलेल्या ड्रग्जचा तपास करीत असताना इरळीमधील या ड्रग्ज अड्ड्याचा पर्दाफाश झाला आहे. गेल्या महिन्यात देखील पुण्यातील कारखान्यात तयार करण्यात आलेले एमडी ड्रग्ज हे कुपवाडमधील भरवस्तीमध्ये साठा करून ठेवण्यात आले होते. हा अड्डा कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असताना देखील याची पुसटशी कल्पना देखील
कुपवाड पोलिसांना नव्हती. या ठिकाणाहून पुणे गुन्हे शाखेने तब्बल 300 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज पकडले होते. त्यामुळे खळबळ उडाली होती. परंतु आता थेट ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यावरच छापा टाकत सांगलीतील ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त केले आहे.

मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे, परंतु तस्करांनी ड्रग्ज बनविणारे जाळे ग्रामीण भागामध्ये निर्माण केले आहे. यासाठी ड्रग्ज तस्करांनी आपले ड्रग्ज पेडलर देखील निर्माण केले आहेत. अल्पावधीत कोट्यवधी रुपयांची माया मिळत असल्याने अनेकांचे हात या ड्रग्ज तस्करीमध्ये रंगले आहे. सांगलीतील इरळी गावात बनविले जाणारे एमडी ड्रग्ज मुंबईत पाठविले जायचे. तेथून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जायची. सध्या नाशिक, मुंबई, दिल्ली, पुणे आणि सांगलीचे कनेक्शन समोर आले आहे. परंतु राज्यभरातील अनेक जिल्ह्यात ड्रग्ज पेडलर पसरले असून आगामी काळात आखणीन मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे अड्डे समोर येण्याची शक्यता आहे.

महिनाभरामध्येच दोन ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आल्यामुळे सांगलीत तर खडबळ उडालीच आहे, परंतु मुंबई आणि पुणे गुन्हे शाखेच्या नजरा देखील सांगलीकडे लागल्या आहेत. काही छोटी पिलावळ मुंबई गुन्हे शाखेच्या हाती लागली असून अद्याप मूख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मुंबईतील आणखीन काही तस्कर पोलिसांच्या हाती लागल्यानंतर राज्यभरात अन्यत्र कोठे कोठे ड्रग्जचा गोरखधंदा थाटला आहे. हे समोर येणार आहे. हे अड्डे उद्ध्वस्त करण्याचे आव्हान देखील आता मुंबई गुन्हे शाखेसमोर असणार आहे. केवळ एमडी ड्रग्जसाठीच सांगलीचा वापर केला जातो असे नाही.

ड्रग्ज पाठोपाठ रक्त चंदन, व्हेल माशाची उलटी आणि प्राण्याच्या अवयवांची तस्करी करण्यासाठी सांगलीचा वापर करण्यात आल्याचे दिसून येते. दोन वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमधून 2 कोटी रुपयांच्या रक्त चंदनाची तस्करी करण्यात येत होती. या रक्त चंदनाच्या सिंडिकेटचा मिरज पोलिसांनी पर्दाफाश केला होता. नुकतेच सिंधुदुर्गमधून कर्नाटकात तस्करी करण्यात येणारी 19 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमधून होत असलेल्या व्हेल माशाच्या उलटीचा पर्दाफाश झाला होता.

Back to top button