वेश्या व्यवसाय आणि मानवी अवयव खरेदी-विक्रीची तस्करी भयावह | पुढारी

वेश्या व्यवसाय आणि मानवी अवयव खरेदी-विक्रीची तस्करी भयावह

भारतातून चालणारी मानवी तस्करी आज चिंताजनक पातळीवर जाऊन पोहोचली आहे. संपूर्ण जगभरात मानवी तस्करीच्या बाबतीत आपल्या देशाचा क्रमांक बराच वरचा आहे. भारतातील मानवी तस्करीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी वेश्या व्यवसायासाठी आणि मानवी अवयव खरेदी-विक्रीसाठी होणारी तस्करी भयावह आहे. यातून लहान लहान मुलेही सुटलेली नाहीत. या मानवी तस्करीवर टाकलेला एक प्रकाशझोत…

संबंधित बातम्या 

भारतातून परदेशात केल्या जाणार्‍या मानवी तस्करीचा आकडा आज जवळपास एक लाखाच्या घरात गेला आहे, तर देशांतर्गत होणारी मानवी तस्करी वार्षिक दोन ते तीन लाखांच्या घरात आहे. स्वखुशीने, जबरदस्तीने आणि फसवणुकीने असे मानवी तस्करीचे वेगवेगळे प्रकार आहेत.

स्वखुशीने होणारी तस्करी

भारतातील लाखो लोक नोकरी आणि उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने अमेरिका, कॅनडा, आखाती देश आणि काही युरोपीय देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत; मात्र त्यापैकी अनेकांचे निकटचे नातेवाईक इथे भारतातच आहेत. या नातेवाइकांनाही आपापल्या आप्तेष्टांकडे जाऊन राहायचे असते; पण त्यासाठी संबंधित देशांचा व्हिसा किंवा नागरिकत्व मिळविणे सहजसाध्य नाही. त्यामुळे पळवाट म्हणून हे नातेवाईक चोरीछुपे त्या देशांमध्ये प्रवेश करण्याला पसंती देतात. अशा पद्धतीने चोरवाटेने त्या त्या देशांमध्ये घुसण्याचे अनेक मार्ग असून, मानवी तस्करीच्या दुनियेत त्यांना ‘डंकी रूटस्’ असे म्हटले जाते.

या मार्गाने संबंधितांना त्या त्या देशात घुसखोरी करण्यासाठी मदत करणार्‍या काही टोळ्याच देशाच्या विविध भागांमध्ये सक्रिय आहेत. हजारो रुपये आकारून या टोळ्या अशा पद्धतीची मानवी तस्करी करताना दिसतायत. अशा पदद्धतीने अन्य देशांमध्ये घुसखोरी करताना वर्षाकाठी किमान लाखभर भारतीय लोक पकडले जातात. गेल्यावर्षी फ्रान्समध्ये असेच एक विमान मानवी तस्करीच्या संशयावरून पकडून विमानातील 303 भारतीयांना पुन्हा मायदेशात पाठविण्यात आले होते; पण त्यामुळे हा प्रकार काही थांबताना दिसत नाही. उलट रोज नवे ‘डंकी रूटस्’ निर्माण होताना दिसतायत.

जबरदस्ती-फसवणुकीने तस्करी

भारतातून वर्षाकाठी तीस हजारांहून अधिक महिला बेपत्ता होताना दिसतायत. याशिवाय जवळपास पन्नास हजारांवर मुली गायब होताना दिसतायत. यापैकी बहुतांश महिला आणि मुलींची कधी देशाबाहेर, तर कधी देशांतर्गत तस्करी होताना दिसते. यापैकी अनेक महिला-मुलींना परदेशातील आकर्षक नोकरीचे आमिष दाखविण्यात येते, तर कधी चक्क अपहरणही केले जाते आणि या महिला व मुलींचा प्रामुख्याने वेश्या व्यवसायासाठी वापर केला जाताना दिसतो. याशिवाय नेपाळी आणि बांगलादेशी महिला-मुलींचीही भारतातून परदेशात तस्करी होताना दिसते.

कधी वेश्या व्यवसाय, तर कधी मोलकरीण म्हणून या महिला देशाबाहेर जाताना दिसतायत. बालमजुरी आणि भीक मागण्यासाठी अपहरण केल्या जाणार्‍या लहान मुला-मुलींचे प्रमाणही वर्षाकाठी पन्नास हजारांच्या घरात आहे. या बेपत्ता किंवा गायब झालेल्या महिला, मुली आणि लहान मुलांचे परत सापडण्याचे प्रमाण वार्षिक केवळ दोन हजारांच्या आसपास आहे. यावरून या मानवी तस्करीच्या भयावह स्वरूपाचा अंदाज येण्यास हरकत नाही.

मानवी अवयवांसाठी तस्करी

कायद्यानुसार मानवी अवयवांच्या खरेदी-विक्रीला देशात बंदी आहे. मात्र, केवळ आर्थिक लाभासाठी आपल्या अवयवांची विक्री करणार्‍यांचे प्रमाणही इतके कमी नाही. किडनी, त्वचा, लिव्हर यांसह अन्य अवयवांसाठी देशांतर्गत आणि परदेशात होणार्‍या मानवी तस्करीचे प्रमाणही लक्षणीय आहे. आजकाल या व्यवहारात करोडो रुपयांचे अर्थकारण सामावलेले असल्याने, कितीतरी टोळ्या या व्यवसायात कार्यरत झालेल्या दिसतात.

भिकारी, मनोरुग्ण, अनाथ लोक, लहान मुले अशी मंडळीही याप्रकारच्या मानवी तस्करीतून सुटत नाहीत. या प्रकारच्या मानवी तस्करीतून वार्षिक जवळपास 200 कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतो. या सगळ्या प्रकारावरून देशातील मानवी तस्करी किती भयावह पातळीवर पोहोचली असल्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. कठोर उपाययोजना करून त्याला आळा घालण्याची गरज आहे.

Back to top button