रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक, नाष्टा का आहे महत्त्वाचा? | पुढारी

रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक, नाष्टा का आहे महत्त्वाचा?

डॉ. मनोज शिंगाडे

आपल्या कामाच्या ठिकाणी व घरातील जबाबदार्‍या पार पाडताना आपल्या शरीरात 24 तास ऊर्जा खेळत राहणे महत्त्वाचे असते. आपल्या शरीरातील ऊर्जेचा स्तर आपण खात असलेल्या अन्नावर खूप अवलंबून असतो. म्हणजेच थोडक्यात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आपले आरोग्य कसे राहणार, हे ठरत असते.

संबंधित बातम्या 

आपले पोट सुटलेले असल्यास किंवा आपल्याला सतत गॅस किंवा मलमूत्र विसर्जनाशी संबंधित तक्रारी होत असल्यास या सर्वांचे मूळ आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आहे हे नक्की समजावे. या सवयींमध्ये बदल केल्यास आपल्या आरोग्यात नक्कीच सकारात्मक बदल होतात. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

रिकाम्या पोटी चहा-कॉफी टाळावे

आपल्यापैकी बर्‍याच लोकांना सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेण्याची सवय असते. यामुळे दिवसभराची कामे करण्यासाठी ऊर्जा मिळते, असा एक समज आहे; पण वास्तवात असे नाही. या सवयीमुळे काहीवेळासाठी आपल्याला बरे वाटू शकते. पण, ही गोष्ट सवय म्हणून अंगीकारणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे आपल्या पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो व अतिआम्लतेसारख्या समस्या निर्माण होतात. याचा अर्थ चहा-कॉफी पिणे संपूर्णतः बंद करावे, असे मात्र नाही. फक्तचहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी नाष्टा करावा. नाष्ट्यातही पौष्टिक व आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा. बदाम, बिस्कीट, शेंगदाणे किंवा टोस्ट इत्यादी पदार्थ चहा-कॉफी पिण्यापूर्वी खाणे फायदेशीर असते.

आरोग्यदायी आहार

नाष्ट्यात कमीत कमी एक चमचा आरोग्यदायी फॅट असणे खूप गरजेचे असते. यामुळे दिवसभराचे काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळते. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात वेळ काढून काही खाणे शक्य नसल्यास खिशात काजू, बदाम, खारीक किंवा इतर सुक्या मेव्याच्या छोट्या पुड्या ठेवाव्यात व कामाच्या वेळी मध्ये मध्ये खात राहाव्यात. याशिवाय आपल्या जेवणात लोणी, तूप इत्यादी पौष्टिक घटकांचा समावेश करावा. यामुळे आपल्याला काम करण्यासाठी खूप ऊर्जा मिळते. शिवाय यामुळे आपला इन्सुलिनचा स्तरही सामान्य राहील व आपले विचार स्पष्ट होऊन आपली निर्णय घेण्याची क्षमताही वाढेल.

नाष्टा महत्त्वाचाच

सकाळी नाष्टा करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण रात्रीच्या जेवणानंतर शरीराला जवळजवळ 12 तासांचा उपवास घडलेला असतो. अशावेळी शरीरातीचा रक्तदाब व इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी, तसेच शरीराला ऊर्जा देण्यासाठी नाष्टा खूप महत्त्वाचा आहे. दही पराठे किंवा चपाती, उकडलेले अंडे किंवा ऑम्लेट, दोन-तीन स्लाईस ब्रेड, एक बाऊल ओटमिल किंवा एक बाऊल दूध व कॉर्नफ्लेक्स असा पौष्टिक आहार नाष्ट्यात असणे खूप महत्त्वाचे असते.

चटपटीत खाणे टाळावे

अनेकजणांना काम करताना चिप्स, वेफर्स किंवा आणखी काही चटपटीत खाण्याची सवय असते. यामुळे स्थूलपणा वाढण्याची खूप शक्यता असते. याशिवाय पोटातील पचनकार्य करणार्‍या रसायनांवर व एकंदरीत पचनक्रियेवरच विपरीत परिणाम होतो. आपल्याला काम करताना खायचेच असेल, तर बदाम, खारीक, काजू, काकडी किंवा गाजर असे पदार्थ खावेत. याशिवाय लिंबूपाणी आणि ताक इत्यादी पिण्यानेही खूप फायदे होतात. यामुळे आपल्या शरीरातील द्रवपदार्थांचे प्रमाण सुधारते व शरीरात ताजेपणा राहतो.

जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश

आपल्या जेवणात पिझ्झा, पास्ता, बर्गर इत्यादी खाद्यपदार्थांचा समावेश करू नये. कधी कधी बदल म्हणून खाण्यासाठी हे पदार्थ ठीक आहेत; पण नियमित खाण्यासाठी हे खाद्यपदार्थ घातक आहेत. आपल्या जेवणात डाळ, चपाती व भाजी इत्यादी साध्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा. याशिवाय दही व सलाड इत्यादी असेल तर उत्तम. जेवणाचा डबा नेणे विसरल्यास जंक फूड किंवा फास्ट फूड खाण्यापेक्षा फळे, ज्यूस किंवा ताक इत्यादी घटकांचे सेवन करावे. हे पदार्थ आरोग्यदायी असण्याबरोबरच पचायलाही हलके असतात.

उकडलेल्या भाज्या खाव्यात

खूपवेळ एका जागी बसून काम करावे लागत असल्यास काम संपल्यावर काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी संध्याकाळी कधी कधी उकडलेल्या भाज्या किंवा मोड आलेली कडधान्ये यांचा आहारात समावेश करावा. आपल्याला रोज उकडलेल्या भाज्या खाणे शक्य होत नाही, किंवा खायला सांगितले तरी आपली खाण्यावरची इच्छाच उडून जाऊ शकते. पण, कधी कधी उकडलेल्या भाज्या खाणे हे आरोग्यासाठी खूप चांगले असते. पालक, राजगिरा, मेथी इत्यादींपैकी कुठलीही भाजी उकडून खावी. किंवा दुपारच्या जेवणाच्यावेळी मेथी इत्यादी कच्च्या भाज्यांचा समावेश करावा.

हेल्थ सप्लिमेंटचा वापर करावा

अनेक नोकरदार महिलांना वेळेअभावी आपल्या जेवणात पौष्टिक पदार्थांचा समावेश करता येत नाही. याशिवाय घाईगडबडीत खाणे किंवा फक्त पोट भरण्यासाठी खाणे व आहारातील पौष्टिक घटकांचा विचार न करणे इत्यादींमुळे भविष्यात आरोग्याच्या खूप समस्या निर्माण होऊ शकतात. पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे हात-पाय इत्यादींमध्ये वेदना होतात. यापासून बचाव करावयाचा असल्यास ड, ब, क इत्यादी जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करावा. याचबरोबर ओमेगा-3 सारख्या हेल्थ सप्लिमेंटचा वापर करावा.

सावकाश व लक्षपूर्वक खाणे

बर्‍याचजणांना वेळ कमी असल्यामुळे समोरील अन्न भराभर पोटात ढकलण्याची सवय असते. किंवा कुणाला वेळ असल्यास टीव्ही पाहत किंवा मोबाईल पाहत खाण्याची सवय असते. दोन्ही सवयी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. जेवण करताना आपल्या समोरील अन्नाकडे लक्ष असणे खूप महत्त्वाचे असते. गडबडीत जेवल्यामुळे आपल्या अन्नाचे व्यवस्थित चर्वण होत नाही व लाळेतील सलायव्हा त्यात न मिसळल्याने पचनही नीट होत नाही. अन्न व्यवस्थित चावून खाण्यामुळे अन्न नीट बारीक होऊन पोटात जाते व त्यामुळे पचनास त्रास होत नाही.

Back to top button