महती नवदुर्गांची : श्री प्रत्यंगिरादेवी (फिरंगाई)

नवदुर्गांची महती श्री प्रत्यंगिरादेवी फिरंगाई
नवदुर्गांची महती श्री प्रत्यंगिरादेवी फिरंगाई

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.

नवदुर्गांतील चतुर्थ दुर्गा देवी म्हणजेच श्री प्रत्यंगिरादेवी (फिरंगाई) होय. शिवाजी पेठेतील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या पाठीमागील बाजूस देवीचे दगडी मंदिर आहे. अलीकडे मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. देवीची मूर्ती १० इंच उंचीची उभी असून शेंदूर लावलेल्या निर्गुण तांदळाची (शिला) आहे.

अथर्ववेदामध्ये फिरंगाई देवीचा उल्लेख आहे. रैवतक मन्वंतरीतील अत्रिकुळातील महर्षी अंगिरस होत. ब्रह्मदेवाने अग्नीत दिलेल्या आहुतीतून यांचा जन्म झाला. या अंगिरसांनी आपल्या तपोबलाने सिद्ध व प्रसन्न केलेली देवी, त्यांचे प्रतिरूप अशी (प्रति – अंगिरा) म्हणजेच 'प्रत्यंगिरादेवता' होय.

आपल्या उपासकारावर कोणीही अभिचार (करणी) केल्यास स्वतः प्रत्यंगिरा त्या बाधेचे निवारण करून प्रतिपक्षी नवदुर्गाची दुष्टास नष्ट करते, अशी भावना आहे. शनिवार व मंगळवारी सायंकाळी देवीची उपासना केली जाते. कानकोबा, खोकलोबा ही परिवार देवता आहेत. खोकलोबा देवास पीठ – मीठ, दहीभात तर कानकोबाला २१ किंवा ११ कानवल्याची माळ अर्पण केली जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news