Kitchen Tips : टोमॅटोशिवाय स्वयंपाकात आता ‘हे’ पर्याय वापरुन पहाच! | पुढारी

Kitchen Tips : टोमॅटोशिवाय स्वयंपाकात आता 'हे' पर्याय वापरुन पहाच!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : टोमॅटोच्या दरवाढीने आर्थिक बजेट तर कोलमडले आहेच, पण गृहिणींना सर्वात मोठी विवंचना सतावतेय ती स्वयंपाक करायचा तरी कसा? एकवेळ कड्डीपत्ता नसला तरी चालेल, पण टोमॅटोशिवाय स्वयंपाक म्हणजे गृहिणींची मोठी डोकेदुखी बनली आहे. टोमॅटोचे दर ऐकून गृहिणींचे चेहरे लालबूंद झाले असून या त्रस्त महिलांनी आता टोमॅटोवर कच्ची कैरी, चिंच, दही आणि भोपळा, असे वेगवेगळे पर्याय शोधले आहेत.

रोजच्या स्वयंपाकात, मग ती मटकी, भोपळा, बटाटा, गोड-तिखट डाळ, ढोबळी मिरची, फरसबी, घेवड्याची भाजी असो, रस्सा, सांबर आणि मच्छी असो की, मटण-चिकन… टोमॅटोशिवाय हे पदार्थ… कल्पनाच करवत नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगणाला भिडले आहेत. किरकोळ बाजारात १५० ते १६० रुपयांच्या खाली टोमॅटो नाहीत. त्यामुळे फ्रीजमधल्या भाज्यांच्या ट्रेमधून टोमॅटो गायब झाला आहे. यामुळे गृहिणींना टोमॅटोशिवाय इतर पर्यायी पदार्थांचा वापर करून स्वयंपाक तयार करावा लागत आहे.

लाल मिरची

टोमॅटोसाठी लाल मिरची हा एक उत्तम पर्याय आहे. भाज्यांमध्ये घातल्यावर ते टोमॅटोसारखेच पोत आणि चव देतात. सलाड, सँडविच यांसारख्या गोष्टींमध्येही याचा वापर करता येऊ शकतो. यासोबतच पास्ता, मॅगी आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटोऐवजी लाल बेल पेपर घालता येते. सध्या बाजारात लाल बेल पेपर सहज उपलब्ध असल्याचे ठाण्याच्या स्वाती मोरे यांनी सांगितले.

कच्ची कैरी

दर वाढल्याने टोमॅटोच्या खरेदीवर बंधन | आले आहे. कच्च्या कैरीच्या आधारे रोजच्या | स्वयंपाकातील टोमॅटोची कसर भरून काढता | येईल. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात | कैऱ्या उपलब्ध आहेत. बाजारात कैरी ६० ते ७० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. कच्ची कैरी जास्त आंबट असते. त्यामुळे स्वयंपाक करताना टोमॅटोऐवजी कैरी वापरता येइल. कैरी कमी वापरावी, अन्यथा चव जास्त आंबट होते, असे मुलुंडच्या सेजल मेथर यांनी सांगितले.

दही हा उत्तम पर्याय

टोमॅटोला दही हा उत्तम पर्याय आहे. दह्यामुळे आंबटपणासोबतच ग्रेव्ही देखील घट्ट होते.
शिवाय दही आरोग्यासाठी उत्तम असते. त्यामुळे दह्याचा वापर करुन जेवणाची लज्जत वाढवता येईल, असे वाशीच्या विपुला कोले सांगतात.

चिंचेची चटणी

स्वयंपाक घरात चिंच ही असतेच. टोमॅटोऐवजी चिंच वापरुन पदार्थात आंबटपणा आणता येतो. ज्याप्रकारे टोमॅटोची चटणी बनवली जाते, त्याचप्रकारे चिंचेची चटणी बनवून वापरता येईल. शिवाय टोमॅटोपेक्षा चिंच खूपच स्वस्त असल्याचे सीवुडच्या मनीषा फडके यांनी सांगितले.

उकडलेला दुधी भोपळा

भाज्यांची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी टोमॅटो ऐवजी उकडलेला दुधी भोपळा वापरु शकता. परंतु त्यामध्ये आंबटपणा आणण्यासाठी चिंचेचे पाणी घालावे लागेल. त्यामुळे भाजी आंबट आणि घट्ट होईल. दुधी भोपळा सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

शेफ काय सांगतात ?

महिलांना टोमॅटोशिवाय जेवण बनवायचे म्हणजे डोक्याला ताप झाला आहे. त्यामुळे टोमॅटो स्वस्त होईपर्यंत विलेपार्लेच्या ऑर्चीड हॉटेलचे साऊथ इंडियन शेफ गौतम गायकवाड यांनी एक खास वाटण सांगितले आहे. वाटण : लसूण-आले-हिरव्या मिरच्या-कोथिंबीर – ओलं खोबरे हे मिक्सरमधून वाटून घ्यावे. त्यात थोडीसी पिवळी मोहरी टाकून पेस्ट करावी. हे वाटण कोणत्याही भाज्यांमध्ये वापरता येते.

Back to top button