राजमाता जिजाऊ स्मृतिदिन विशेष लेख | राष्ट्रमाता जिजाऊ यांची विज्ञानदृष्टी | पुढारी

राजमाता जिजाऊ स्मृतिदिन विशेष लेख | राष्ट्रमाता जिजाऊ यांची विज्ञानदृष्टी

प्रकाश पवार

समाजाच्या मनोधारणेवर विज्ञानाचा परिणाम होतो. परंतु, विज्ञानाला राज्यकर्ते प्रगतीशील किंवा आधोगामी पद्धतीने वळविण्याचा प्रयत्न करतात. जिजाऊंच्या काळात विज्ञान फार प्रगत नव्हते. परंतु, समाजाला प्रगतीशील टप्प्यावर घेऊन जाण्याचा उद्देश जिजाऊंचा होता. जिजाऊंच्या काळातील राजकीय प्रक्रिया व्यवस्थात्मक पातळीवर घडण्यास सुरुवात झाली होती. पर्यावरणात्मक, आकलानात्मक व संबंधात्मक अशा तीन पातळ्यांवर राजकीय प्रक्रिया घडत होती. या घडामोडींचा कार्यकारणसंबंध वैज्ञानिक क्रांतीच्या परिणामामध्ये दिसतो.

जिजाऊंच्या काळाच्या आधी कृषीशी संबंधित विज्ञानाची सुरुवात झाली होती. तसेच हिंदुस्थानमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची सुरुवात झाली होती. या वैज्ञानिक घडोमोडीचा परिणाम जिजाऊंच्या काळावर, स्वराज्यावर झाला होता. हिंदवी स्वराज्य समूह लक्षकेंद्रीत होते. ही घडामोड आकलनात्मक राजकीय प्रक्रिया होती. तसेच या संकल्पनेला गती दिली गेली होती. केवळ तीन दशकामध्ये स्वराज्याची राज्यसंस्था सार्वभौम व अधिमान्य झाली होती (1644-1674). जिजाऊंनी सामाजिक सुधारणांच्या संदर्भात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला होता. त्यांनी त्यांच्या काळातील विज्ञानाला समाजकारणात व राज्यकारभारात पुरेसा अवकाश उपलब्ध करून दिला. यामुळे विज्ञानाची समाजातील स्वीकारार्हता वाढली. त्यांनी घडवलेल्या राजकीय प्रक्रियेत विज्ञानाचे काही कंगोरे होते. त्याबरोबर त्यांनी स्वराज्याची संकल्पना त्या काळातील विज्ञानाच्या पायावर आधारित विकसित केली होती.

विशेषतः जिजाऊंच्या दृष्टीने (विज्ञानाच्या दृष्टीने) स्वराज्य म्हणजे काय होते तसेच स्वराज्य आणि त्या काळातील विज्ञान यांचा सहसंबंध जिजाऊंनी कसा जोडला ही जिज्ञासा महत्त्वाची ठरते. त्या काळातील विज्ञानाचा समाजमनावर कोणता परिणाम झाला त्या परिणामतून जिजाऊंनी कोणती समाज वैज्ञानिक तत्त्वे निवडली. स्वराज्य आणि न्याय यांचे सहसंबंध जिजाऊंच्या संकल्पनेतील विज्ञानाच्या चौकटीत कोणते होते तसेच स्वराज्यातील वेगवेगळ्या समूहांचे परस्परसंकबंध (ओळख, अस्मिता, सामाजिक, सलोखा-संघर्ष) समाजविज्ञानाच्या चौकटीत कसे होते हा प्रश्न तर संबंधात्मक राजकीय प्रक्रियेशी संबंधित आहे. यांचा उलघडा केला पाहिजे. विशेषतः न्यायनिवाडा, सार्वभैमत्व , अधिमान्यता, प्रशासनाची कौशल्ये, जमिनीचे मोजमाप, बांधकाम, नीतिशास्त्र, विचारसरणी, या गोष्टीमध्ये त्यांच्या काळातील विज्ञानाचा उपयोग केला गेला होता. जिजाऊंच्या आधी वैज्ञानिक पर्यावरण घडण्यास सुरू झाली होती. हिंदुस्थानमध्ये अकबराच्या काळात विज्ञानाशी जुळवून घेतले गेले होते. मध्ययुगाच्या पोटातून विज्ञानाचा आधार घेऊन नवजागृतीस सुरुवात झाली होती.

बांधकामशास्त्र, मापनशास्त्र, प्रशासकीय कसब, अंकगणित, तर्कशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, न्याय, भाषाशास्त्र या वैज्ञानिक गोष्टींशी जिजाऊंचा खूप जवळचा संबंध आला होता. किंबहुना त्यांची जडणघडण या विज्ञानाच्या घडामोडीशी संबंधित झाली होती. हा सुरुवातीस जावई शोध वाटेल. परंतु, जिजाऊंच्या जीवनातील घटना आणि त्यांच्या काळातील विज्ञान यांचे संबंध जोडले तर त्यांची विज्ञान दृष्टी सुस्पष्ट होत जाते. त्यांनी विज्ञानाच्या नव्या घडामोडीशी स्वतःला जुळवून घेतले होते. जिजाऊंच्या जन्माच्या आधी एका शतकापूर्वी वास्को-द-गामा हिंदुस्थानमध्ये आला होता (मे, 1498). त्यानंतर दुआर्त बार्बीझ (1500), दुमिंगगुश (1520) फेर्ना नुनिझ(1535) हे प्रवासी हिंदुस्थानमध्ये आले. त्यांच्यामुळे सागरी प्रवास (गलबते), भाषाशास्त्र (भाषा व सत्तासंबंध ), व्यापार, व्यापारी गोष्टींवर आधारित उत्पादन पद्धती, गलबताचे बांधकाम इत्यादी घडामोडी विज्ञानाशी सुसंगत घडत होत्या.

या गोष्टी जिजाऊंच्या आधी शभंर वर्षे हिंदुस्थानमध्ये आल्या. त्यांची सार्वजनिक चर्चा व उपयुक्तता त्यांच्या लक्षात आली होती. कारण कृषी संस्कृतीबरोबर लढवय्या संस्कृतीशी त्यांचे जीवन जोडले गेले होते. त्यांच्या काळात या दोन्ही संस्कृतीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला होता. विशेषतः स्वराज्याच्या विचारामुळे त्यांचा विज्ञानाच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक झाला होता. सनातनी रुढी व विचार स्वराज्याच्या विरोधी होता. म्हणून स्वराज्याच्या उन्नतीला पोषक असा विज्ञानाचा मार्ग त्यांनी निवडला होता. विज्ञानाचा मार्ग चोखळणे उचित आहे, अशी त्यांची धारणा झाली होती. स्वराज्याच्या प्रगतीला खीळ घातली जाते, अशा प्रतिगामी आचार-विचार व सामाजिक आडमुठेपणा यांचा त्यांनी सतत प्रतिकार केला. विज्ञान जिजाऊंच्या विचारांशी सुसंगत कसे होते? या संदर्भात काही निवडक मुद्दे पुढील प्रमाणे नोंदविता येतात. एक, विशेषतः शहाजी महाराज हे स्वराज्य संकल्पक होते. तर जिजाऊ यांनी स्वराज्याच्या विचारांचे बीज पेरले. त्यानंतर शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ही तथ्ये सर्वसहमत आहेत. स्वराज्य संकल्पक, स्वराज्याच्या विचारांचे बीज व हिंदवी स्वराज्य स्थापन या प्रत्येक गोष्टीत समाजविज्ञानाची दृष्टी होती.

म्हणजेच पर्यावरणात्मक व्यवस्था व आकलनात्मक व्यवस्था यांचा मेळ घातला गेला होता. या अर्थाने, समाजविज्ञान हे तत्त्व व्यक्तिमत्त्वात होते. वैज्ञानिक विचारांना परस्परपूरक व्यवहार त्यांनी केला. या तीन महामानवाचे विचार समाज वैज्ञानिक होते, म्हणून स्वराज्याच्या संकल्पेने गती धारण केली होती. स्वराज्य आणि गती(तीन दशकात स्वराज्य) यांचा एकत्रित विचार केला पाहिजे.आधुनिक काळात भारतीय स्वातंत्र्य चळवळ दीडशे वर्षे सुरू होती. या गोष्टीशी तुलना केली तर स्वराज्याची गती लक्षात येते. दोन, अर्थकारण हे एक समाजविज्ञान आहे. स्वराज्याचे राजकीय अर्थकारण जुळवताना सरळसरळ अंकगणिताचा नियम त्यांनी तंतोतंत पाळला. स्वराज्यातील अर्थकारणाचे मोजमाप त्यांनी नीटनेटके ठेवले होते. ही मोजमाप व अंकगणिताची गोष्ट जिजाऊंच्या कार्य आणि कर्तृत्त्वाच्या संदर्भात सुरुवातीपासून दिसते.

तीन, लखूजी जाधवराव यांनी तळ्याचे बांधकाम केले होते. तेव्हा बांधकामशास्त्र ही वैज्ञानिक गोष्ट त्यांनी उपयोगात आणली होती. बांधकामशास्त्र हे विज्ञान आहे. बांधकामशास्त्र समजून घेणार्‍या घरात त्यांचे बालपण गेले होते. तसेच गंगा ही दैवी मानली जात होती. गंगा आडवण्यास विरोध परंपरागत समाजाचा होत होता. जिजाऊंच्या वडिलांनी तळ्याच्या बांधकामामुळे दैववादी प्रवृत्ती नाकारली गेली होती. त्यांनी प्रागतिक भूमिका घेतली होती. या गोष्टीचा जिजांऊच्या विचारांवर खूप खोलवर प्रभाव पडलेला दिसतो. चार, नवीन गावे व पेठा वसवणे ही दृष्टी शास्त्रीय व वैज्ञानिक होती. खुद्द जिजाऊंनी गावे व पेठा वसवल्या होत्या. तेथे गंगा अडवण्यात आली. गंगा कृषी समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणली गेली. पाच, दुमिंगगुश (1520) फे र्ना नुनिझ (1535)हेपोर्तुगीज प्रवासी हिंदुस्थानमध्ये आले होते (विजयनगर). त्या भागाचे नेतृत्व शहाजी महाराजांनी केले होते.

त्या भागातील खडान्खडा माहिती शहाजी महाराजांना होती. त्यामुळे त्यांचे भाषाशास्त्र,गलबतेविषयक ज्ञान शहाजी महाराजांना अवगत झाले होते. शहाजी महाराजांकडून हे ज्ञान जिजाऊंकडे आले. शिवरायांनी आरमार उभारले होते. तसेच त्यांनी पाण्यावरून प्रवास केला. आधुनिक काळात पाण्यावरून प्रवास केला तर धर्म बुडतो अशी धारणा होती. तसेच प्रायश्चित घ्यावे लागत होते. मतितार्थ, आधुनिक काळाच्या तुलनेत जिजाऊंची वैज्ञानिक भूमिका जास्त प्रगत होती. सहा, प्रशासनाचे कसब हे वैज्ञानिक आहे. पुरंदरच्या तहानंतर जिजाऊंच्या प्रमुखत्वाखाली सल्लागारांचे मंडळ नेमले होते. हे मंडळ शास्त्रशुद्धपणे हिंदवी स्वराज्याचा कारभार पाहत होते.( मोजमाप, अंकगणित, डावपेच, नीतिशास्त्र ). बारा किल्ल्यांचा राज्यकारभार जिजाऊंच्या प्रमुखत्वाखाली कठीण काळात चालविला गेला होता. त्यांचे प्रशासकीय कारभार संभाळण्याचे कौशल्य या काळामध्ये पूर्ण वैज्ञानिक कार्यक्षमतेने व्यक्त झाले होते.

सात, प्रशासनात कार्याचे विशेषीकरण केले जाते. प्रशासकीय विशेषीकरण हे वैज्ञानिक तत्व सल्लागार मंडळाचे कामकाज चालवितांना तंतोतंत राबविले होते. तसेच त्यांनी सतराव्या शतकातील चाळीशीच्या दशकात नियंत्रण – समतोलाचे तत्त्व प्रशासकीय व्यवहारात उपयोगात आणले होते. कारण, नवीन कारभाराची व्यवस्था शहाजी महाराजांनी केली होती. अशा वैज्ञानिक तत्त्वाची मीमांसा जिजाऊंच्या कार्य आणि कर्तृत्त्वाच्या संदर्भात इतिहासकार व विचारवंतांनी केली आहे. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला वैज्ञानिक दृष्टीचे योगदान जिजाऊ यांचे होते. ही गोष्ट राजारामशास्त्री भागवत, न्यायमूर्ती रानडे, वा. सी. बेंद्रे, सददेसाई , सेतूमाधव पगडी अशा अनेक विचारवंतानी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोंदविलेली दिसते. कारण, त्यांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना नैतिकतेवर (नीतिशास्त्र) आधारलेली होती, असे विवेचन केले. जिजाऊंच्या दृष्टीने हिंदवी स्वराज्य म्हणजे केवळ शासनसंस्था नाही.

जिजाऊंच्या हिंदवी स्वराज्यात राष्ट्रीय जीवन (नैतिकता) या तत्त्वाला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले. राष्ट्रीय जीवन म्हणजे राष्ट्र किंवा लोकसमूह अशी त्यांची धारणा होती. कारण, त्यांनी राष्ट्रभावना म्हणजे बहुविविधतेत एकात्मतेची जाणीव असते. ती जाणीव महत्त्चाची मानली होती. हा मुद्दा म्हणजे हिंदवी स्वराज्यातील नागरिकांची स्वत्वभावना जागृत असणे होय. स्वराज्यात सर्व लोक त्यांचे श्रेय पाहतील, अशी धारणा हिंदवी स्वराज्याची, त्यांची होती. थोडक्यात, मानवी चेतना, व्यक्तीचेतना, कुटुंबचेतना ही समाजात विलीन करावी. तेव्हा समूहजीवन घडते. समूहजीवन राष्ट्रजीवन घडण्यासाठी हिंदवी स्वराज्याला मानवी चेतना किंवा स्वत्व म्हणून ओळखले गेले पाहिजे. ही कृती मावळा या संकल्पनेशी संबंधित आहे. त्यामुळे मावळा ही संकल्पना राष्ट्रीय जीवन घडवते. मानवी जीवनात न्यायासाठी विज्ञान महत्त्वाचे सातत्याने राहिले आहे. या समाज विज्ञानाबद्दलची दृष्टी जिजाऊंकडे होती. विज्ञानाचा उपयोग न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी केला.

सामाजिक सलोखा हे वैज्ञानिक दृष्टीचे एक महत्त्वाचे लक्षण व संबंधात्मक यंत्रणा आहे. कारण, सामाजिक सलोखा म्हणजे समाजाचे मानवीकरण व ऐहिकीकरण करण्याची राजकीय प्रक्रिया घडणे होय. सामाजिक सलोखा म्हणजे मानव्याचा विकास असा अर्थ घेतला जातो. ही एक संबंधांत्मक राजकीय प्रक्रिया होती. यामुळे हा मुद्दा सलोखपणे समजून घेतला पाहिजे. जिजाऊंच्या दृष्टीने स्वराज्यातील वेगवेगळ्या समूहांचे परस्परसंबंध कसे असावेत. तसेच त्यांच्या दृष्टीने धर्माचे राजकीय व्यवहारातील स्थान काय होते. यांचे जिजाऊंचे स्पष्ट व चिकित्सक आकलन होते. कारण, भाषा, धर्म, जातिसंस्था या तीन संदर्भात जिजाऊंचा विचार सामाजिक सलोख्याचा होता.

 

Back to top button