आरोग्य : मुलांना धोका ‘एमआयएस-सी’चा, वेळेत करा उपचार | पुढारी

आरोग्य : मुलांना धोका ‘एमआयएस-सी’चा, वेळेत करा उपचार

डॉ. प्राजक्‍ता पाटील

आधी कोव्हिड आणि नंतर ब्लॅक फंगस यासारख्या भयानक संकटातून आपला देश अद्याप सावरलेला नसतानाच, मुलांमध्ये मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेट्री सिन्ड्रोम (एमआयएस-सी) हा आजार पाहायला मिळाला आहे. हा मूलतः कोव्हिडोत्तर विकार आहे. जसजशी मुले कोरोनातून बरी होत आहेत, तसतशी त्यांच्यामध्ये या आजाराची व्याप्‍ती वाढत आहे. हा आजार घातक असला तरी, वेळेत उपचार केल्यास मुलांना धोक्यापासून वाचविता येऊ शकते.

कोव्हिड-19 च्या भीषण संसर्गामुळे लहान मुलांमध्ये दोन बदल घडून येऊ शकतात. एक म्हणजे, त्यांना न्यूमोनिया होऊ शकतो किंवा त्यांच्यात ‘एमआयएस-सी’ची लक्षणे दिसू शकतात. पहिल्या लाटेदरम्यान अनेक मुलांना कोव्हिडचा संसर्ग झाला होता आणि त्यानंतर ‘एमआयएस-सी’चे दोन हजारांहून अधिक बालरुग्ण देशभरात आढळून आले होते. त्यामुळे जी मुले कोव्हिडच्या संसर्गातून बाहेर आली आहेत, त्यांच्या दिनचर्येवर पालकांनी बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे बनले आहे.

मुलांमध्ये ‘एमआयएस-सी’ म्हणजे मल्टिसिस्टीम इन्फ्लेमेट्री सिन्ड्रोम हा आजार 4 ते 17 वर्षे वयोगटात दिसून येत आहे. यात काही अशा मुलांचा समावेश आहे, ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसलीच नव्हती. म्हणजे ती मुले ‘एसिम्प्टोमॅटिक’ होती आणि त्यांच्या घरात कुणाला ना कुणाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. अशा मुलांची आरटी-पीसीआर चाचणी केल्यास ती निगेटिव्ह येते. त्यातील 46 टक्के मुलांना बरे झाल्यानंतर 2 ते 6 आठवड्यांच्या कालावधीत किंवा नंतरही पुन्हा एकदा ताप येतो आणि इथूनच ही समस्या सुरू होते.

वास्तविक, ‘एमआयएस-सी’ हा सिन्ड्रोम म्हणजे कोरोनाच्या विषाणूविरोधात रोगप्रतिकारक प्रतिक्रिया (इम्युनोलॉजिकल रिअ‍ॅक्शन) आहे. अनेक रुग्णांच्या बाबतीत इम्यून रिस्पॉन्स म्हणजे रोगप्रतिकारक प्रतिक्रिया हायपर अ‍ॅक्टिव्ह म्हणजे अतितीव्र स्वरूपाची होते. यामुळे शरीरात सायटोकाइन एन्जाइम स्रवू लागते. अशा स्थितीत अँटिबॉडीज शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम करू लागतात. उदाहरणार्थ त्वचा, आतडे, रक्‍त, मेंदू, डोळे, हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे यापैकी कोणत्याही अवयवांमध्ये इन्फ्लेमेशन होते आणि संसर्ग खूपच वेगाने पसरून विविध अवयवांच्या समस्या सुरू होतात.

मुलांमध्ये जर तापाबरोबर आणखी एखादे किंवा दोन-तीन लक्षणे जरी दिसली, तरी त्वरित डॉक्टरांशी संपर्क केला पाहिजे. अर्ली स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यात ‘एमआयएस-सी’च्या लक्षणांची ओळख पटवून योग्य उपचार केले गेल्यास मुलांना या आजारापासून वाचविता येते. परंतु दुर्लक्ष केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते आणि अतिदक्षता विभागात उपचार घेण्याची गरज भासू शकते.

‘एमआयएस-सी’बाबत शंका असल्यास डॉक्टर काही तपासण्या करायला सांगतात. यात रक्‍ताची चाचणी, इको कार्डिओग्राफी, सीआरपी, ईएसआर, डी-डायमर अशा इन्फ्लेमेटरी मार्कर्स टेस्ट्सचा समावेश असतो. याखेरीज अँटिबॉडी टेस्ट आणि आरटी-पीसीआर चाचणीही करायला सांगितली जाऊ शकते. जर मुलांमध्ये ‘एमआयएस-सी’ची सौम्य लक्षणे असतील तर योग्य देखभाल केल्यास पाच ते सात दिवसांत मुले बरी होऊ शकतात.

किंचित ताप असेल तर तोंडावाटे देण्यात येणारी औषधे घरच्या घरी दिली जाऊ शकतात. परंतु जर आजार तीव्र स्वरूपाचा असेल म्हणजे हृदयापर्यंत संसर्ग पोहोचलेला असेल, तर अशा मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार करावे लागू शकतात. अशा स्थितीत मुलांना गरजेप्रमाणे स्टेरॉइड, इन्ट्रावीनस इम्युनो ग्लोबलिनची इंजेक्शन दिली जाऊ शकतात. मुलांना वजनानुसार प्रतिकिलो दोन ग्रॅम इम्युनो-ग्लोबलिन आणि मिथाइल प्रीड्नीसोलोन एक ते दोन मिलिग्रॅम प्रती किलो वजनाच्या हिशोबाने दिले जाऊ शकतात आणि त्याचबरोबर प्रतिजैविकेही दिली जाऊ शकतात. हा आजार गंभीर आहे हे खरे; पण वेळेत निदान करणे शक्य आहे. मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली तरी लगेच वैद्यकीय मदत घ्यावी. घरगुती उपचार किंवा सेल्फ मेडिकेशन बिलकूल करू नये.

‘द लान्सेट’ या ब्रिटनमधील वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधन निबंधानुसार, ‘एमआयएस-सी’ची लक्षणे सर्वच मुलांमध्ये एकसारखी असतील असे नाही. हा सातत्याने वाढत जाणारा आजार असून, त्याची सुरुवात छोट्या-छोट्या लक्षणांपासून होते. सुरुवातीला ही लक्षणे श्‍वसनमार्ग, हृदय, आतडे, मूत्रपिंड, मेंदू आदी अवयवांमध्ये दिसून येऊ शकतात. ही लक्षणे ओळखायची कशी हे समजून घेतले पाहिजे.

दोन ते तीन दिवस तीव्र ताप, अशक्‍तपणा, थकवा, डोकेदुखी, मान आणि सांधेदुखी अशी लक्षणे दिसताच सावध व्हायला हवे. ऑक्सिजनचे शरीरातील प्रमाण 94 टक्क्यांपेक्षा कमी असणे, न्यूमोनिया, छातीत दुखणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये (पल्स) अनियमितता, रक्‍तदाब एकदम कमी होणे, जीव घाबराघुबरा होणे, झोप न लागणे अशा समस्याही ‘एमआयएस-सी’ची लक्षणे असू शकतात. याखेरीज हातपाय थंड आणि निळे पडणे, उल्टी, जुलाब आणि तीव्र पोटदुखी, कावीळ, त्वचेचा रंग पाढरा पडणे, शरीराच्या विविध भागांवर, हातापायावर आणि चेहर्‍यावर सूज येणे, बेशुद्ध पडणे, झटके येणे अशी तीव्र लक्षणेही दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये त्वचेवर लाल चट्टे पडणे, डोळे लाल होणे, जीभ आणि ओठ लालभडक होणे, ओठ फुटणे अशीही लक्षणे दिसतात.

मुलांचा ‘एमआयएस-सी’पासून बचाव करण्यासाठी त्यांची रोगप्रतिकार शक्‍ती वाढविणे गरजेचे असून, त्यासाठी त्यांच्या दिनचर्येवर लक्ष ठेवायला हवे. घरी बनविलेला पौष्टिक आहार नियमितपणे मुलांना मिळणे आवश्यक आहे. या काळात घरात तणावाचे वातावरण असता कामा नये. टीव्ही, मोबाइल किंवा कोणत्याही गॅजेटचा ‘स्क्रीन टाइम’ अगदी मर्यादित ठेवला पाहिजे. मुलांसोबत चांगला वेळ घालविण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याशी गप्पा मारणे, नियमित योगासने किंवा व्यायाम करणे, गेम्स खेळणे, मुलांना छंद जोपासण्यास प्रवृत्त करणे आणि त्यांना 8 ते 10 तास भरपूर झोप मिळेल याची तजवीज करणे आवश्यक असते.

Back to top button