Discover Konkan : वेंगुर्लाला गेलात! 'ही' ठिकाणे एकदा तरी नक्की फिरा | पुढारी

Discover Konkan : वेंगुर्लाला गेलात! 'ही' ठिकाणे एकदा तरी नक्की फिरा

स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असणाऱ्या महाराष्ट्राची कीर्ती किती वर्णावी! महाराष्ट्राला ७२० किमी. लांबीचा भव्य समुद्रकिनारा लाभला आहे. (Discover Konkan) सुंदर, निसर्गरम्य असा प्रदेश, तुडूंब भरून वाहणाऱ्या अनेक नद्या, समुद्रकिनारे, गडकिल्ले, जंगले, डोंगर-दऱ्या असा सगळा निसर्गाचा पसारा महाराष्ट्रात राज्यात आहे. समुद्र म्हटलं की, कोकण डोळ्यासमोर येतो. या समुद्रांचे वर्णन करावे तितके थोडे आहे. तारकर्ली, सिंधुदुर्ग, मालवण, विजयदुर्ग, अशा असंख्य स्थळांपैकी ‘वेंगुर्ला’ प्रसिद्ध ठिकाण. वेंगुर्ल्यातील अनेक बीच पर्यटकांना नेहमीच साद घालताना दिसताहेत. ‘सागरेश्वर’ असो वा ‘वेंगुर्ला बीच’ फक्त समुद्रकिनाराच नाही तर अन्य ठिकाणेही तुम्हाला आकर्षित करणारी आहेत. (Discover Konkan)

vengurla

वेंगुर्ला –

वेंगुर्ला हा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुका आहे. वेंगुर्ला तसे मोठे तालुक्याचे ठिकाण आहे. वेंगुर्ल्यात एन्ट्री केल्यानंतर अनेक पर्यटन स्थळांना तुम्हाला भेट देता येईल. समुद्रकिनारी भेटी देत असताना तेथील वाळू आणि नजारा भिन्न भिन्न दर्शन घडवते.

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला बीच –

बीचकिनारी अनेक हॉटेल्स, रेस्टारंट्स आणि होम स्टे आहेत. जिथे तुम्ही समुद्राकाठी रात्र घालवू शकता. महत्त्वाचे म्हणजे वेंगुर्ला बीच स्वच्छ आहे. तुम्ही पोहोण्याचा आनंदही येथे घेऊ शकता. नावाडी नौका हाकताना तुम्हाला येथे दिसतील. संध्याकाळी समुद्रकाठी बसून मच्छिमारांची मासे पकडण्यासाठीची लगबग तुम्ही पाहू शकता. वेंगुर्ला बीचवर रात्री वाळूमध्ये कॅम्प फायर, टेंट कॅम्पमध्ये राहूनदेखील तुम्ही मस्त एन्जॉय करू शकता. समुद्रकिनारी वाहणारे खारे वारे, खळखळता फेसाळणारा समुद्र आणि शांतता हे सर्व आल्हादायक वातावरण येथेचं भेटेल. दिवसा वॉटर स्पोर्ट्सचीदेखील सोयदेखील आहे.

वेंगुर्ला टेबल पॉईंट

वेंगुर्ला टेबल पॉईंट –

येथे पांढरी वाळू निदर्शनास पडते. सभोवताली पाल्म ट्री तुमचे लक्ष वेधून घेतात. वेंगुर्ला दर्शन करताना तुमचा उत्साह आणखी वाढवणारा आहे. तुम्हाला अजिबात थकवा जाणवणार नाही. येथे पर्यटनासाठी ऑक्टोबर ते मार्चपर्यंतचा हंगाम चांगला समजला जातो.

वेंगुर्ला बाजारपेठ आणि भाजी मार्केट –

वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी, मासळी बाजारात दिसतील. येथे माशांचा लिलाव तुम्हाला पाहता येईल आणि खरेदीही करता येईल. भारंगीची भाजी, फणस, काटवल, वाघोटी, धानभाजी, फुले, नारळ, शहाळे अशा वस्तूंनी बाजारपेठ भरलेलं दिसतं.

वेंगुर्ला लाईट हाऊसकडे जाणारा रस्ता

वेंगुर्ला लाईट हाऊस –

याठिकाणी रात्रीच्यावेळी जावं. वेंगुर्ल्याची लाईट हाऊसची व्यवस्था अप्रतिम आहे. येथे चढून जाण्यासाठी लाल रंगाच्या पायऱ्या आणि सभोवतालची लाईटिंग सुंदरतेत भर टाकते.

वेंगुर्ला बंदर

वेंगुर्ला बंदर –

लाईट हाऊसच्या जवळचं वेंगुर्ल्याचे बंदर आहे. पूर्वी या बंदराजवळ येऊन मोठ-मोठ्या होड्या थांबत असत.

वेंगुर्ला म्युझियम

वेंगुर्ला म्युझियम –

मुख्य बाजारपेठेत हे म्युझियम असून त्यास ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह’ असे नाव आहे. या म्युझियममध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर कलादालन, वेंगर्ला बंदर, वेंगुर्ला लाईटहाऊन आणि अन्य ठिकाणांची प्रतिकृती आणि माहिती देण्यात आली आहे.

मानसीश्वर मंदिर
मानसीश्वर मंदिर

मानसीश्वर मंदिर –

वेंगुर्ला बसस्थानकापासून हे मंदिर जवळ आहे. येथून जवळ २ ते ३ किमी. अंतरावर सागरेश्वर बीच आहे. मानसीश्वराचे मंदिर इतर मंदिरांपेक्षा वेगळे आहे. येथे भाविकांची गर्दीही अधिक असते. मंदिराशेजारी भरती-ओहोटी येईल तसे खाडीचे पाणी येत जात राहते. मंदिराचा परिसर शांत आणि रमणीय आहे.

सातेरी मंदिर
सातेरी मंदिर

सातेरी मंदिर –

वेंगुर्ला बाजारपेठेतून तुळस रोडकडे जाताना दीड ते दोन किमी. अंतरावर सातेरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर मोठे असून पाहण्यासारखे आहे. मंदिरात छान सुशोभिकरण करण्यात आले आहे. मंदिरात देवीची मोठी पाषाणातील मूर्ती असून गाभाऱ्याभोवती विविध पाषाणातील मूर्ती आणि विरगळ आहेत.

वेतोबा मंदिर

वेतोबा मंदिर –

वेंगुर्ल्यातील आरवली गावात वेतोबा मंदिर आहे. वेंगुर्लापासून १२ किमी. अंतरावर हे ग्रामदैवत आहे. यास आरवलीचा वेतोबा असेही म्हटले जाते. वेंगुर्ला आणि रेडीच्या मध्ये हे गाव आहे.

मोचेमाड बीच –

वेंगुर्ल्यातील मोचेमाड समुद्र किनारा डोळ्याचे पारणे फेडणारा असून २ किमी. किनाऱ्याची लांबी आहे. अत्यंत शांत आणि स्वच्छ किनारा या मोचेमाडला लाभला आहे. मोचेमाड वेंगुर्लापासून ८ किमी. अंतरावर आहे. तर सिंधुदुर्गपासून ४७ किमी. अंतरावर आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि अरबी समुद्राच्या किनारी वसलेले मोचेमाड हिरवळीने नटलेले आहे. लिंग गिरोबा देवस्थान येथील प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. दुसऱ्या बाजूस नदी, मोठमोठी नारळाची झाडे, माडाची शेती, मच्छिमारी, श्रीदेव करंडेखोल मंदिर, काडोबा डोंगर, श्रीदेव दाडोबा मंदिर (खालचे अणसूर), श्रीदेवी नवलादेवी मंदिर अशी अनेक ठिकाणे येथे पहायला मिळतात.

श्री देव घोडेमुख मंदिर –

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला गावात मातोंड हे गाव आहे. वेंगुर्लापासून मातोंड २४ किमी. अंतरावर आहे. गावात जाण्यासाठी एसटीचीही सोय आहे. गावात श्री देव घोडेमुख मंदिर आहे. मातोंड-पेंडुर येथील या देवाची मोठी जत्रा भरते. उत्सवाला मोठ्या प्रमाणात भाविक येथे येतात. (Discover Konkan)

वेंगुर्लाजवळ आणखी काय पहाल? –

केपादेवी मंदिर, SKKY Beach, सी पुलदेखील तुम्ही पाहू शकता.

सागरेश्वर बीच –

वेंगुर्लातील सागरेश्वर बीच हे प्रसिद्ध पर्यटन स्थ‍ळ आहे. जेवढी गर्दी वेंगुर्ला बीचवर असते, तितकी गर्दी सागरेश्वर बीचवर पाहायला मिळत नाही. त्यामुळेच येथे नीरव शांतता, नितळ पाणी, स्वच्छता, सोनेरी वाळू आणि छोट्या-छोट्या खेकड्यांचे दर्शनही घडते. येथे लांब लांब पर्यंत विहार करणाऱ्या नौकांवर आपसूक नजर पडते. कधी-कधी डॉल्फिनचे दर्शनही क्षणात होते.

सागरेश्वर मंदिर –

बीचवरून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्त्यांवरून काही अंतरावर उभादांडा येथे सागरेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. मोठी तुळस, दिपमाळांनी हे मंदिर सजलेले आहे. सागरेश्वर मंदिर पाहण्यासारखे असून कोकणी पद्धतीचे मंदिर सर्वांनाचं भूरळ पाडणारे आहे.
सी पुल – सागरेश्वर बीचजवळ हा सी पुल आहे. दोन खडकांच्या मध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेला हा सी पुल आहे. येथे बोटीवाल्यांना काही पैसे दिल्यानंतर तुम्हाला ते बोटीतून सी पुल येथे घेऊन जाताते. या नॅच्युरल पुलामध्येदेखील तुम्ही पोहू शकता. या ठिकाणाची माहिती फारशी कुणाला नाही.

घावण-खोबऱ्याची चटणी आणि नारळाचा गोड रस

वेंगुर्ल्यात, सागरेश्वर, पर्यटनस्थळी काय खाल?

हळदीच्या पानातील पातोळ्या, घावण, नारळाची चटणी, नारळाचा गोड रस, शहाळे, सुरमई, बांगडा, कोळंबी, मच्छी करी, तांदळाची भाकरी, फणसाची भाजी, कोकणी पद्धतीची आमटी, भात, पापड, लोणचे, वरण, श्रीखंड-पुरी, चपाती, दही, घावण घाटले, सात कप्याचे घावण, गुळाची खापरोळी, सोलकडी, कोकम, इत्यादी.

वेतोबा मंदिर

हेदेखील वाचा-

सागरेश्वर मंदिर

Back to top button