क्रिकेट : ऋतुराज ‘रनी’ आला! | पुढारी

क्रिकेट : ऋतुराज ‘रनी’ आला!

संजीव पाध्ये

एक दर्जेदार अशी खेळी आयपीएलमधल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडने केली. बलवान मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचे धडाधड गडी बाद करायला सुरुवात केली होती. पण सलामीला आलेला ऋतुराज अपराजित राहिला. तो शेवटपर्यंत नाबाद राहिलाच; शिवाय त्याने 88 धावा काढताना संघाला बर्‍यापैकी धावसंख्या उभारून दिली होती. ती खूपच मोठी ठरली, जेव्हा मुंबईचे फलंदाज सपशेल ढेर झाले. साहजिकच ऋतुराज सामनावीर ठरला.

त्याच्या या खेळीचे कौतुक दिलीप वेंगसरकरने उत्स्फूर्तपणे नंतर केले. तो म्हणाला, मला ही खेळी खूप आवडली. एक तर त्याने जे फटके मारले ते सगळे व्यवस्थित होते. उंच फटकेही त्याने विशेष ताकद न लावता मारले होते.

क्षेत्ररक्षक काही करू शकत नव्हते असे हे फटके होते. मी त्याला म्हणालो होतो, तुला आता 40/50 धावा काढून चालणार नाही. तू लगेच बिनधास्त होतोस आणि विकेट फेकतोस. तसे करू नकोस.तू सलामीवीर आहेस तर पूर्ण वीस षटके उभा राहा. अधिक धावा जमतील असे बघ. तसा तो खेळला.

मुख्य म्हणजे समोर पडझड चालूच होती. त्यामुळे तो विचलित झाला नाही. असे तो सातत्याने खेळेल तर नक्की पुढे जाईल. या खेळीचे नेमके विश्लेषण वेंगसरकर यांनी केले आहे यात शंका नाही. विशेष म्हणजे वेंगसरकर यांच्याच पुण्याच्या अकॅडमीमधून ऋतुराज तयार झाला आहे. पण म्हणून वेंगसरकर भरभरून बोलले असे नाही. ती खेळीच सहजसुंदर होती. अशा खेळी फलंदाजांचा आत्मविश्वास वाढवतात. त्याने बुमराह, बोल्ट यांची बोलती बंद करणारे फटके शेवटच्या षटकात मारले. इथे त्याने त्याचा दर्जा सिद्ध केला.

आता उरलेल्या सामन्यांमध्ये त्याला सातत्य दाखवावे लागेल. कारण ऋतुराजला भारतीय संघात येऊन टिकण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. के. राहुल सर्वच प्रकारांत आता परिपक्व होतोय असे संकेत देऊ लागलाय. त्यामुळे रोहित शर्मा बरोबर सध्या तरी तो कायम होणार आहे. तरीही तिसरा सलामीवीर संघात ठेवला जातो. वाचे कारण कुणी ऐनवेळी अनुपलब्ध झाला तर काय करायचे? आणि त्यादृष्टीने सध्या पृथ्वी शॉ आणि देवदत्त पद्दिकलसुद्धा चर्चेत आहेत. ऋतुराजला यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे.

हे तिघेही साधारण एकाच वयाचे आहेत. त्यामुळे जो दर्जा दाखवेल, तो पुढे जाणार आहे. सध्या निवड समिती भरपूर पर्याय असल्याने विश्रांतीच्या सबबीखाली सगळ्यांना संधी मिळेल असे बघते. ही एक दिलासादायक बाब आहे. ऋतुराजला श्रीलंका दौरा त्यामुळे मिळाला. त्याचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न माफक स्वरूपात का होईना पूर्ण झाले. आता जेव्हा केव्हा संधी मिळते तेव्हा ती साधणे गरजेचे झाले आहे. ऋतुराजने याची काळजी घ्यायची आहे.

त्याला रोहित शर्मा आवडतो. तो स्वतः देखील रोहितसारखा आधी मधल्या फळीत खेळणारा होता.सलामीवीर झाल्यावर काय पथ्ये पाळायची याची त्याला आता कल्पना आली आहे. सुरुवातीला गोलंदाज भरात असतात. ताजेतवाने असतात. खेळपट्टीसुद्धा गोलंदाजाला मदत करणारी असते. अशा वेळी मोठे फटके म्यान करावे लागतात.

ऋतुराज सध्या तरी मर्यादित षटकांच्या प्रकारासाठी विचाराधीन राहणार आहे. तरीसुद्धा त्याला घाईघाईत हाणामारी सुरुवातीलाच करणे महाग ठरू शकते.हे त्याला नेहमीच लक्षात ठेवावे लागेल. त्याने संयम राखत पण आक्रमक धोरण ठेवले तर तो आपला हक्क अधिक प्रभावीपणे सांगू शकेल.

ऋतुराज आहे मूळचा सासवडचा. त्याच्या पुढची आव्हाने मोठी आहेत. मुख्य अडथळा राजकारणाचा. मुंबईबाहेरचे, पण महाराष्ट्रामध्ये होते असे मोजकेच क्रिकेटपटू मोठे झाले, असा इतिहास आहे. अजिंक्य रहाणे नगरचा.

झहीर खान ही तिथला. हे मुंबईत येऊन मोठे झाले. केदार जाधव हा शेवटचा मुंबईबाहेरचा खेळाडू, जो काही काळ भारतीय संघात राहिला. त्या आधी राजू भालेकर, सुरेंद्र भावे, संतोष जेधे, शंतनू सुगवेकर, मिलिंद गुंजाळ, श्रीकांत कल्याणी आणि अर्थात पांडुरंग साळगावकर गुणवत्ता असूनही मागे राहिले.

महाराष्ट्राचे क्रिकेट मुंबई आणि पुण्यापुरते मर्यादित राहिले. विदर्भने अलीकडे दोनदा रणजी करंडक जिंकला. तरीही त्यांचा दबदबा नाही. आता तर मुंबईचासुद्धा राहिलेला नाही. काय चुकते या इथल्या युवकांचे. एक तर गरीब नाही तर मध्यम वर्गातील मुले अधिक क्रिकेटकडे ओढली जातात. त्यांना कष्ट करून यश मिळाले नाही की नाउमेद व्हायला होते. ईर्षा कमी झाली की माणूस कुठेही मागे पडतो. ही गोष्ट टाळली पाहिजे.अलीकडे कर्णधाराच्या विश्वासाला महत्त्व आलंय. पूर्वी कर्णधार आपल्या विभगातला कुणी घुसवायचा.

आता आयपीएल संघात जो बरोबर असतो, त्याची तो पाठराखण करतो. या खेळाडूंना आपले नाणे सतत खणखणीतरीत्या वाजवता यायला हवे. याद़ृष्टीने शार्दुल ठाकूरचे उदाहरण देता येईल. तोसुद्धा पालघरमधून पुढे आलाय.

त्याला कर्णधार विशेष किंमत देत नव्हता. पण जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो उपयुक्तता दाखवत गेला. त्याने खांदे कधी पाडले नाहीत. आज राजकारण असे खेळवले जाते की, एखाद्याचा काटा काढण्यासाठी त्याचा आत्मविश्वास कमजोर करायचे प्रयत्न होतात. कुलदीप यादव आणि अगदी आश्विनसुद्धा यात भरडले गेलेत.

आणि अजिंक्य रहाणे कर्णधार म्हणून भारी ठरेल, असे वाटू लागल्यावर त्याला योजनाबद्धरीत्या संपवायचे डावपेच खेळले जाताहेत. ऋतुराजवर आज धोनी खूश आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण धोनी आता निवृत्त आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार प्रशिक्षक यांना आपला पर्याय राहील आणि आपल्यालाच पसंती मिळेल हे बघितले पाहिजे.

ऋतुराज याला मोठी संधी आहे. पिंपरी-चिंचवड भागातला तो पहिला आहे, जो भारताकडून खेळला आणि खेळणार आहे. या आधी राजू मोटवानी रणजी खेळला होता. अवघा अकरा वर्षांचा असल्यापासून ऋतुराज क्रिकेट खेळत आहे.

त्याचे आई-वडील त्याला प्रोत्साहन देत आहेत. त्याचे वडील दशरथ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसर तर आई शिक्षिका. ज्युनिअर स्तरावर त्याने छाप पाडली आणि अठरा वर्षाचा होत नाही तोच तो रणजीसाठी निवडला गेला आणि मग दोन वर्षांत आयपीएलमध्ये तो खेळायला लागला. त्याची ही प्रगती समाधानकारक राहिली आहे. हल्ली आयपीएल हेच मुलांचे उद्दिष्ट होऊ लागले आहे. पैसा मिळून स्थैर्य आणून देणारा हा एक मार्ग त्यांना वाटतो.

पण ज्यांचे खरे खेळावर प्रेम आहे आणि जे देशाकडून खेळण्यात महत्त्व मानतात, ते मात्र यात अडकून पडत नाहीत. ऋतुराजसुद्धा आता भारतीय संघातील स्थान महत्त्वाचे मानतो हे त्याच्या एकूण खेळावरून स्पष्ट होते. त्याला यावर आता लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मध्यंतरी तो कपिल शर्मा शोमध्ये आला होता. त्याने त्याच्या साधेपणाने सर्वांची मने जिंकली होती.

ऋतुराजने संयमितरीत्या मैदानावर आणि मैदानाबाहेर वागावे. याच्यासाठी प्रत्येक पुढचा ऋतू बरवा राहणार आहे हे नक्की.

Back to top button