वर्धापनदिन विशेष : भारतीय अर्थव्यवस्थेचे युगांतर | पुढारी

वर्धापनदिन विशेष : भारतीय अर्थव्यवस्थेचे युगांतर

  • अनिल पाटील, गुंतवणूक तज्ज्ञ

येणारे दशकच नव्हे; तर शतक भारताचे आहे, असा विश्वास अनेक विदेशी वित्तीय तज्ज्ञ देत आहेत. सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात युगांतर होताना दिसत आहे. याची जाण प्रत्येक भारतीय नागरिकाने ठेवली पाहिजे. भविष्यात कुटुंबात श्रीमंती आणण्यासाठी भांडवली बाजारातील संधीचा फायदा घेतला पाहिजे.

सन 2014 मध्ये आपल्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न दोन ट्रिलियन डॉलर होते. इतर देशांच्या तुलनेत भारत दहाव्या क्रमांकावर होता. तो आज बि—टनला मागे टाकून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. तीन ट्रिलियन डॉलरहून अधिक उत्पन्न निर्माण करणारा देश बनला आहे. मॉर्गन स्टेनली यांनी 2027 पर्यंत जर्मनीला मागे टाकून भारत चौथ्या क्रमांकावर पोहोचेल आणि 2030 पर्यंत तो तिसर्‍या क्रमांकावर येईल. त्या वेळेस सुमारे दहा ट्रिलियन डॉलर इकॉनोमी होईल. 2030 साली राष्ट्रीय सकल उत्पन्न आजच्यापेक्षा तीनपट होईल, असे अनुमान
मांडले आहे. सध्या भारताचा ‘जीडीपी’वाढीचा दर जगात सर्वाधिक आहे. वेगाने प्रगती करणारा देश म्हणून सर्व जगाचे लक्ष आपल्या देशाकडे लागले आहे.

विविध क्षेत्रांतून येणार्‍या एकूण ‘जीडीपी’मध्ये सेवा क्षेत्रातून 54 टक्के उत्पन्न निर्माण होत आहे. 30 टक्के उत्पन्न उत्पादन क्षेत्रातून होत असून, 16 टक्के उत्पन्न शेती क्षेत्रातून होत आहे. देशात 60 टक्के लोक हे ग्रामीण भागात राहत असून, शेती क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. जगामध्ये तांदूळ, गहू, साखर, कापूस, दूध, फळे उत्पादनामध्ये भारताचा दुसरा व तिसरा नंबर लागत आहे. शेतीमाल उत्पादन भारत आज मोठ्या प्रमाणात निर्यात करत आहे. मागील वर्षापेक्षा गहू, तांदूळ, साखर, फळे इत्यादी 20 टक्क्यांहून
अधिक निर्यात वाढ आपल्या देशातून झालेली पाहावयास मिळत आहे.

सेवा क्षेत्रामध्ये भारताचा सातवा क्रमांक लागत असून, फायनान्स, पर्यटन, हॉटेल इंडस्ट्री इन्श्युरन्स, बँकिंग, आयटी सेक्टर, टेलिकॉम, वाहतूक, बिझनेस सर्व्हिसेस, सोशल सर्व्हिसेस, रियल इस्टेट आदी सेवा क्षेत्रांतून 27 टक्के रोजगार सेवा क्षेत्र देत आहे. विशेषतः, आयटी सेक्टरमध्ये प्रचंड मोठी प्रगती होताना दिसत आहे. 60 लाख लोकांना रोजगार या सेवा क्षेत्रातून मिळत आहे. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रामध्ये आज आपल्या भारत देशाचा दुसरा क्रमांक लागत आहे. देशात मोबाईलधारकांची संख्या 75 कोटींपर्यंत पोहोचली आहे. 65 कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत. जागतिक स्तरावर रोजगार घटत आसताना आपल्या देशातील सेवा क्षेत्रात रोजगार वाढत आहे, हे यश महत्त्वाचे आहे.

उत्पादन क्षेत्राचे ‘जीडीपी’मध्ये 30 टक्के योगदान आहे. आज मोठ्या प्रमाणात उत्पादन क्षेत्र वाढत आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी 22 टक्के रोजगार या उत्पादन क्षेत्रामधून मिळत असून, यामध्ये आज देशाचा सहावा क्रमांक लागत आहे. जेनरिक औषधे व इतर औषधे उत्पादन आज आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होत असून, एकूण मागणीपैकी 62 टक्के मागणी आपल्या देशातील औषधी उत्पादनातून पुरवठा होत आहे. कोरोनामध्ये सर्वात चांगली लस तयार करण्यात आली. 200 देशांना या लसीचा पुरवठा करून या देशांचा विश्वास मिळविण्यात यश मिळविले आहे. स्टील उत्पादनामध्ये 2013-14 साली 60 दशलक्ष टन होणारे उत्पादन सध्या 154 दशलक्ष टन होत आहे. 2014 साली 10 व्या क्रमांकावर असलेला देश जागतिक स्तरावर आता दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’अंतर्गत मोबाईल उत्पादनात 2014 साली 12 व्या क्रमांकावर होता तो आता जगात दुसर्‍या क्रमांकावर आला आहे. 85 हजार कोटींचे मोबाईल उत्पादन आपल्या देशात होत आहे.

आपल्या देशातील पायाभूत सुविधा सुधारणेवर सरकार मोठा भर देत आहे. 2014 साली प्रतिदिन 12 किलोमीटर रस्ता तयार होत होता. तो आता प्रतिदिन 37 किलोमीटर तयार होत आहे. 62,000 किलोमीटरचे रस्त्यांचे नेटवर्क तयार करण्यात यश मिळविले आहे. रेल्वे नेटवर्क 68,000 किलोमीटर इतके आहे. 22,000 रेल्वे दररोज धावत असतात. हवाई क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. देशात 137 एअरपोर्ट, 34 इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत. देशांतर्गतसुद्धा मोठ्या प्रमाणात विमानसेवा विकसित होत आहे.
जगातील अनेक देशांपैकी आपला देश सर्वाधिक आर्थिक विकास दराने वाटचाल करत आहे. जगातील 144 देशांच्या
एकूण लोकसंख्येइतकी एकट्या भारताची लोकसंख्या आहे. 140 कोटी लोकसंख्येपैकी 54 टक्के तरुण युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असणारा भारत हा एकमेव देश आहे. जगातील इतर देशांच्या द़ृष्टीने एक प्रचंड मोठी बाजारपेठ असलेला हा देश आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धोरणानुसार इथे लागणार्‍या वस्तूंचे इथेच उत्पादन झाले पाहिजे, अशा सरकारच्या धोरणामुळे भविष्यात मोठे उत्पादन क्षेत्र निर्माण होताना दिसत आहे.

आजपर्यंत संरक्षण क्षेत्रातील अनेक हत्यारे, साहित्य आयात केले जात असे; मात्र या क्षेत्राचे युगांतर होऊन संरक्षण क्षेत्रातील अनेक हत्यारे, साहित्यसामग्रीचे उत्पादन भारतात होत असून, यावर्षी 17,000 कोटींची निर्यात करण्यात आली आहे. आजच्या सरकारने बँकिंग व वित्तीय क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रभावी कायदे केले जात आहेत. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक या गोष्टी लिंक केल्या आहेत. आर्थिक क्षेत्रात व धोरणात पारदर्शीपणा आलेला दिसत आहे. जगाच्या तुलनेत भारताचा भांडवली बाजार पाच वर्षांमागे 2.3 टक्के होता, तो आता 3.2 टक्के इतका आहे. ‘सेबी’च्या नियंत्रणाखाली भांडवली बाजारात मोठे बदल होत असून, सर्वसामान्य लोकांची या बाजारामध्ये गुंतवणूक वाढत आहे.

‘डिजिटल इंडिया’मुळे ऑनलाईन डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे. 2018-19 सालात 3.70 कोटी डीमॅट खाती होती. ती 7.50 कोटींच्या जवळपास झाली आहेत. मागील तीन वर्षांत ही संख्या दुप्पट झाली आहे. दर महिन्याला 30 लाख नवीन खाती उघडत आहेत. सप्टेंबर 2022 अखेर 10 कोटी डीमॅट खातेसंख्या झाली आहे. चालू वर्षात परकीय गुंतवणूकदारांनी 3.50 लाख कोटी गुंतवणूक काढून घेतली, तरीही आपला भांडवली बाजार खाली पडला नाही. 140 कोटी लोकसंख्येच्या तुलनेत 10 कोटी लोक या बाजारात गुंतवणूक करीत आहेत. याचा अर्थ अवघे 6 टक्के लोक या बाजारात उतरले आहेत. येणार्‍या दहा वर्षांत ही संख्या 40 ते 50 कोटींपर्यंत पोहोचेल त्यावेळी मार्केट कसे वाढेल, याचा अंदाज करून आपण गुंतवणूक केली पाहिजे.

2016 नंतर मोदी सरकारने डिजिटल इंडियाची सुरुवात केली. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र्र बदल झालेले दिसत आहेत. डिजिटलमुळे म्युच्युअल फंड गुंतवणूक क्षेत्रानेे एका नव्या उंचीवर झेप घेतली आहे. मागील वीस वर्षांत इक्विटी म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना 14 ते 20 टक्क्यांपर्यंत भरभरून परतावा दिला आहे. संपत्ती निर्माण करण्याचा चांगला मार्ग म्हणून म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवला आहे. हा विश्वास घेऊन म्युच्युअल फंड क्षेत्र एका वेगळ्या उंचीवर पोहोचले आहे.

भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातील दहा वर्षांचा इतिहास पाहिल्यास 30 नोव्हेंबर 2011 रोजी 6.82 लाख कोटी असलेली गुंतवणूक 30 नोव्हेंबर 2016 रोजी 5.20 कोटी खातेधारकांसह 16.50 लाख कोटी झाली होती. त्याची 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 11.70 कोटी खातेसंख्या आणि 37.34 लाख कोटी गुंतवणूक मूल्य झाले आहे. 5 वर्षांच्या कालावधीत 2016 ते 2021 पर्यंत 6.5 कोटी गुंतवणूकदारांच्या फोलिओची वाढ झालेली दिसते. 5 वर्षांच्या कालावधीत ही संख्या दुपटीने वाढली आहे. मूल्यात 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत 40.37 लाख कोटी इतकी वाढ झाली आहे. 2011 पासून हे क्षेत्र सहापटीने वाढलेले आहे. आपल्या देशात सीप गुंतवणूक लोकप्रिय ठरली आहे. 6.05 कोटी खात्यांतून 13,306 कोटी दरमहा मार्केटमध्ये गुंतवणूक होताना दिसत आहे. डिजिटल इंडियामुळे मोबाईलवरून सहजपणे गुंतवणूक करू शकतात. हे फार मोठी युगांतर झालेले आपण पाहत आहोत.

 (लेखक एस.पी. वेल्थचे प्रवर्तक आहेत.)

Back to top button