टेनिस : ग्रँड स्लॅममध्ये तरुणाईचा उदय

टेनिस : ग्रँड स्लॅममध्ये तरुणाईचा उदय
टेनिस : ग्रँड स्लॅममध्ये तरुणाईचा उदय
Published on
Updated on

मिलिंद ढमढेरे

टेनिस क्षेत्रामध्ये करिअर करणारे खेळाडू एक वेळ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत फारसे गांभीर्याने लक्ष देणार नाहीत; परंतु ग्रँड स्लॅम स्पर्धा ही त्यांच्यासाठी सर्वोच्च महत्त्वाची स्पर्धा असते. प्रतिष्ठेच्या या स्पर्धांमध्ये विजेतेपदाची माळ आपल्या गळ्यात कधी येते हे स्वप्न तो पाहात असतो आणि त्यासाठी तो खूप मेहनत घेत असतो.

डॅनियल मेदवेदेव आणि एम्मा रॅडूकानू यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे अजिंक्यपद मिळवताना बुजुर्ग आणि प्रस्थापित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे ग्रँड स्लॅममध्ये खर्‍या अर्थाने युवाशक्तीचाच विजय झाला आहे. टेनिस क्षेत्रासाठी हा स्वागतार्ह बदल झाला आहे.

टेनिसमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. व्यावसायिक टेनिस क्षेत्रात पदार्पण करणारा प्रत्येक खेळाडू या स्पर्धांमध्ये आपल्याला केव्हा आणि कशी संधी मिळेल याचीच वाट पाहत असतो. ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या मोसमास ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेने सुरुवात होते.

त्यानंतर फ्रेंच, विम्बल्डन आणि सरतेशेवटी अमेरिकन खुली स्पर्धा हा क्रम आणि त्यांचा संभाव्य कालावधीही ठरलेला असतो. या स्पर्धांच्या पात्रता फेरीत स्थान मिळवणेदेखील आव्हानात्मक असते. तिथेही मानांकने दिलेली असतात आणि मुख्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये अहमहमिका दिसून येत असते.

ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणारा एखादा खेळाडू जर त्यानंतर वर्षभर एकही स्पर्धा खेळला नसेल तर त्याला पुन्हा ग्रँड स्लॅम स्पर्धांसाठी पात्रता फेरीतूनच यावे लागते. सांगण्याचा मतितार्थ हाच की, या स्पर्धा प्रत्येक खेळाडूसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

दिग्गज खेळाडूंची माघार

माजी विजेते रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासह अनेक मानांकित खेळाडूंनी यंदाच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. साहजिकच विजेतेपदासाठी नोवाक जोकोव्हिच याचे पारडे जड मानले जात होते.

यंदा ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन या तिन्ही स्पर्धा जिंकणार्‍या जोकोव्हिच याला अमेरिकन स्पर्धा जिंकून ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी होती. अंतिम फेरीत स्थान मिळवूनही त्याला या कामगिरीपासून वंचित राहावे लागले.

रशियन खेळाडू मेदवेदेव याने सरळ तीन सेटस्मध्ये त्याला गारद केले आणि करिअरमधील पहिले ग्रँडस्लॅम अजिंक्यपद पटकावले. ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याला जोकोव्हिचकडून तीन सेटस्मध्ये पराभूत व्हावे लागले होते. त्याची परतफेड त्याने तितक्याच जोमाने केली.

महिला गटात ब्रिटिश खेळाडू रॅडूकानू हिने विजेतेपद मिळवित सनसनाटी कामगिरी केली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळवत ग्रँडस्लॅम जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू ठरली आहे. हा पराक्रम करताना तिने पात्रता फेरीतील तीन आणि मुख्य फेरीतील सात असे सलग दहा सामने जिंकताना एकही सेट गमावला नाही. यावरून तिच्या कामगिरीतील सातत्य प्रकर्षाने दिसून आले. अंतिम फेरीत तिने कॅनडाची 19 वर्षीय डावखुरी खेळाडू लैला फर्नांडेझ हिला पराभूत केले. या दोन्ही बिगर मानांकित खेळाडूंमधील अंतिम लढतीबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. या दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीपर्यंत वाटचाल करताना अनेक मानांकित आणि अनुभवी खेळाडूंना पराभवाचा रस्ता दाखविला.

अनुभवापेक्षा युवाशक्ती अधिक सरस आहे हेच या दोन्ही खेळाडूंनी दाखवून दिले होते. या दोन्ही खेळाडूंनी स्पर्धेत केलेला बहारदार खेळ चाहत्यांसाठी खेळाचा निखळ आनंद देणारा ठरला. क्रॉसकोर्ट फटके बेसलाईन व्हॉलीज, नेटजवळून प्लेसिंग, अचूक आणि बिनतोड सर्व्हिस असा चतुरस्र खेळ या दोन्ही खेळाडूंनी केला. मात्र, अंतिम सामन्यात रॅडूकानू हिने महत्त्वाच्या क्षणी खेळावर नियंत्रण मिळवले होते आणि त्याचाच फायदा तिला विजय मिळवण्यासाठी झाला.

रॅडूकानूचे पुणेरी 'कनेक्शन'

करिअरच्या सुरुवातीला परदेशातील स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद भावी कारकिर्दीसाठी प्रेरणादायी एकच असते. रॅडूकानू हिने पुण्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले होते. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या स्पर्धेत तिने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविले होते आणि नंतर विजेतेपदावर आपली मोहोर नोंदवली होती. त्यावेळी देखील तिने सलग सात सामने जिंकताना सातत्यपूर्ण कौशल्याचा ठसा उमटविला होता.

महाराष्ट्रात आणि आपल्या देशातील अन्य ठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक परदेशी खेळाडू विजेतेपद मिळवित दिमाखदार कारकिर्दीचा श्रीगणेशा करतात. स्टॅनिस्लास वॉवरिंका याने इंडियन ओपन स्पर्धेतील विजेतेपद मिळविल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचेही विजेतेपद मिळवले होते. परदेशी खेळाडू भारतामधील स्पर्धांचा अनुभव घेत ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवू शकतात. त्यांच्याकडून प्रेरणा घेत भारतीय खेळाडूंनी ग्रँड स्लॅममधील एकेरीत अजिंक्यपद मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

कोरोनाच्या नियमावलीची ऐशी-तैशी

जगामध्ये कोरोनाच्या महामारीचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. अमेरिकादेखील त्याला अपवाद नाही; मात्र अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या वेळी कोरोनासंदर्भात केलेल्या नियमावलीची ऐशी-तैशीच झालेली पाहावयास मिळाली. प्रेक्षकांच्या संख्येबाबत कोणत्याही मर्यादा नव्हत्या, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क याचे फारसे पालन केलेले नव्हते. बॉल बॉईज आणि साईड पंच हे देखील क्वचितच मास्क घालून उभे राहिले होते.

टोकियो येथे नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये कोरोनाच्या नियमावलीचे कटाक्षाने पालन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकन खुल्या स्पर्धेतील या बेशिस्तपणाचा फटका भविष्यात संबंधित प्रेक्षक आणि तांत्रिक अधिकारांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत फारशी चमक दाखविता आली नाही. सुमित नागल, रामकुमार रामनाथन आणि अंकिता रैना यांना एकेरीच्या पात्रता फेरीतच पराभवास सामोरे जावे लागले. रोहन बोपण्णा याने पुरुषांच्या दुहेरीत इव्हान लोरिक याच्या साथीत भाग घेतला होता. मात्र, त्यांची वाटचाल तिसर्‍या फेरीतच संपुष्टात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news