ऑस्ट्रेलियात गणपती बाप्पाचे भव्य ग्रॅनाईट मंदिर | पुढारी

ऑस्ट्रेलियात गणपती बाप्पाचे भव्य ग्रॅनाईट मंदिर

मेलबोर्न : जगभरात अनेक ठिकाणी भव्य आणि सुंदर हिंदू मंदिरे पाहायला मिळतात. आता दक्षिण गोलार्धात ग्रॅनाईटपासून बनवलेले पहिले भव्य मंदिर पाहायला मिळत आहे. भगवान श्रीगणेशाचे हे मंदिर तंजावूरच्या बृहदिश्‍वर मंदिरापासून प्रेरणा घेऊन बनवलेले आहे. ‘श्रीवक्रतुंड विनयगर मंदिर’ असे या मंदिराचे नाव आहे.

या मंदिरासाठी वीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मंदिरात अन्यही देवी-देवतांची अकरा छोटी मंदिरे आहेत.1988 मध्ये श्रीलंकेतील गृहयुद्धामुळे अनेक तामिळी हिंदूंना देश सोडावा लागला होता.

या लोकांनी ऑस्ट्रेलियात आश्रय घेतला होता. मेलबोर्नमध्ये त्यावेळी एकही दक्षिण भारतीय मंदिर नव्हते. त्यामुळे या लोकांनी तिथे मंदिर उभे करण्याचा संकल्प सोडला. 1990 मध्ये मेलबोर्नच्या पूर्व भागात जमीन खरेदी करण्यात आली व मंदिराच्या कामास शुभारंभ करण्यात आला. श्रीगणेशाची मूर्ती तामिळनाडूतूनच आणण्यात आली आहे.

मंदिरासाठी 350 टन ग्रॅनाईटचा वापर झाला असून 1200 वेगवेगळ्या शिळा जोडून सतरा स्तर बनवण्यात आले आहेत. सर्वात छोट्या शिळेचे वजन 250 किलो असून सर्वात जड शिळा 6 टनांची आहे. तामिळनाडूतील महाबलीपूरमच्या शंभर शिल्पकारांनी हे दगड कोरून त्यांना ऑस्ट्रेलियात पाठवले.

Back to top button