गणेशोत्सवाचे पावित्र्य ठेवणे आवश्यक.... | पुढारी

गणेशोत्सवाचे पावित्र्य ठेवणे आवश्यक....

नवीन घर बांधल्यावर, घराच्या दारावर गणेशाचे चित्र अथवा मूर्ती लावण्याचा प्रघात आहे. पण वास्तुशास्त्राच्या नावाखाली काहीजण अत्यंत उग्रमुद्रा असलेली गणेश मूर्ती लावतात. त्याच्यामुळे कुणाची करणी, बाधा वगैरे होत नाही तसेच नजर लागत नाही, अशी समजूत आहे. पण ज्या-ज्या ठिकाणी अशा उग्र मंगलमूर्ती लावलेल्या आहेत. त्या घरात अजिबात समाधान नसल्याचे दिसून आले आहे. मंगलमूर्ती ही केव्हाही शांत व सात्विक हवी हे लक्षात ठेवावे.

गणेशमूर्ती आणताना मूर्ती ओलसर असणे, गडबड गोंधळ व मोठ्या आवाजाच्या फटाकड्यांचा आवाज यामुळे मूर्ती भंगण्याची शक्यता असते. अशावेळी काहीजण भीती घालून मोठ्या खर्चाच्या शांती सांगतात. पण मूर्ती घरी आणून तिची प्रतिष्ठापणा केल्यावर जर असे काही घडले तरच शांती करावी किंवा गणेशाचे स्तोत्रे २१ किंवा १०८ वेळा म्हटले तरीही हा दोष दूर होतो. पण त्यासाठी घरी होम करा किंवा तत्सम शांती करा हे सांगणेच चुकीचे आहे.

गणेशमुर्तीची दीड दिवसाची पूजा हीच खरी असते. त्यामुळे दीड दिवसाचा गणपती बसवणे हेच शास्त्रानुसार योग्य ठरते. त्यामुळे बाकीचा अवडंबर व त्या अनुषंगाने येणारे इतर खर्च टाळता येतात. हल्लीच्या काळाला अनुसरून गणेश पूजा श्रध्देने केल्यास तिचे चांगले फळ मिळेल. घरात पूजा करण्यासाठी गणेश मूर्ती किती आकाराची असावी हेही शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक मोठा तसेच नाचऱ्या स्वरूपातील गणेथ मूर्ती ठेवू नयेत.

हल्ली नको त्या व्यक्तीच्या स्वरूपात गणेश मूर्ती बनविल्या जातात हे चुकीचे आहे. मर्त्य एखादा साधूसंत, राजकारणी व्यक्ती, नेते, पूजनिय व्यक्ती किंवा तुमचे जे कोणी गुरू असतील ते तुम्हाला कितीही पूज्य असले तरी देवाशी त्याची तुलना होऊ शकत नाही. त्यामुळे शास्त्रात वर्णन केलेल्या मूर्ती योग्य आकार, रूप सौंदर्य व सर्व गुणांनी युक्त असतील अशाच पुजाव्यात .

मानवी स्वरूपातील गणेश मुर्तीची पूजा ही अधोगतीला नेणारी पूजा समजावी. मंगलमूर्ती घरी असेपर्यंत मांसाहार व तत्सम प्रकार घरी करू नयेत. कारण त्याने मूर्तीचे पावित्र्य भंग होते व त्यामुळे केलेली पूजा वायफळ ठरून चांगले होण्याऐवजी नुकसान होते. एखाद्याला गणपती लाभेल की नाही ते त्याच्या कुंडलीवरून स्पष्ट कळू शकते. एखाद्याने गणपती आणला म्हणून मी आणतो, असे कधी करू नये.

घराण्यातील बरेच दोष गणेश चतुर्थीच्या पूजनाने नष्ट होतात. पण अत्यंत शांत, सोशिक वातावरणात, कुणालाही त्रास न होता तसेच सर्वांचा आशीर्वाद घेऊन जर गणेश पूजन केले तर ते निश्चित फळ मिळते. गणेश मूर्ती ज्या उत्साहात आणता त्याच उत्साहात अनंत चतुर्दशीला तिचे विसर्जन करा. मिरवणुकीत कोणतेही हिडीस प्रकार व व्यसने असू नयेत. त्याचा पुढे त्रास होऊ शकतो.

Back to top button