

गणेश उत्सव २०२३ : लाडक्या गणरायांच्या आगमनाला आता फक्त 5 दिवस उरले आहेत. त्यासाठी घराघरात साफ-सफाई, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती आगाऊ पैसे देऊन बूक करून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. या दिवशी पहाटेपासून ते दुपारपर्यंत श्रीगणेशाची स्थापना करावी, असे पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. गणपतीच्या आरतीसह विठ्ठलाची आरती ही उत्सव काळात म्हटली जाते.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
तुळसीमाळा गळा कर ठेवूनी कटी।
कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी॥
देव सुरवर नित्य येती भेटी।
गरुड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा॥
राही रखुमाबाई राणीया सकळा।
ओवाळिती राजा विठोबा सावळा॥३॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती।
दिंड्या पताका वैष्णव नाचती।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती॥
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति।
केशवासी नामदेव, भावे ओवाळिती ॥५॥
जय देव जय देव जय पांडुरंगा।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ॥
हेही वाचलंत का?