Horror Films : तुम्‍ही हॉरर फिल्‍म्‍स का पाहता? जाणून घ्‍या भीतीचे मानसशास्‍त्र काय सांगते… | पुढारी

Horror Films : तुम्‍ही हॉरर फिल्‍म्‍स का पाहता? जाणून घ्‍या भीतीचे मानसशास्‍त्र काय सांगते...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : किर्रर अंधार.. जीवाचा थरकाप उडविणाऱ्या किंकाळ्या… मती गुंग व्‍हावी असा प्रत्‍येक क्षणाला वाढत जाणारा थरार आणि मनावरील प्रचंड दडपणानंतर उलगडणारे रहस्‍य… हे सारं क्षण आपण हॉरर फिल्‍म्‍समध्‍ये अनुभवतो; पण हा सारा मानसिक ताण आपण का विकत घेतो? म्‍हणजे हॉरर फिल्‍म्‍समुळे आपल्‍या मनावर प्रचंड ताण येतो तरीही बहुतांश जणांना असे भयपट ( Horror Films) पाहायला का आवडतात? काय आहे यामागील भीतीचे मानसशास्‍त्र याविषयी जाणून घेवूया…

Horror Films : अमेरिकेतील ‘एनएलएल’चे  संशाेधन सांगते..

भयपट हे आपल्‍या मनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम करतात. काही जणांना तर केवळ भयपटच आवडतात इतकी या चित्रपट आणि टीव्‍हीवरील मालिकांची क्रेझ आहे. मानवाला भयाचे एवढं आकर्षण का? या प्रश्नाचे उत्तर मानसशास्‍त्राच्‍या एका सिद्धांतामध्‍ये आढळते. अमेरिकेतील नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने (एनएलएल) याबाबत केलेले संशाेधन सांगते की, भयपटांची आवड ही बालपणीच विकसित होते. प्रौढ व्‍यक्‍तींच्‍या मनात सहानुभूती आणि भय याचा अभाव असेल तर त्‍यांना भयपट म्‍हणजे हॉरर फिल्‍म्‍स पाहायला खूपच आवडतात. भयपटातून निर्माण होणार्‍या मानसिक तणावातून त्‍यांना आनंद मिळतो. लहान मुले ही या चित्रपटांमधील धक्‍कांतत्राला घाबरतात तर किशोरवस्‍थेतील मुले ही वास्‍तवावादी धक्‍कातंत्रामुळे घाबरतात.

अनेकांना हॉरर फिल्‍म्‍स पाहायला का आवडतात?, या प्रश्‍नाचे उत्तर अमेरिकेतील प्रख्‍यात विचारवंत नोएल कॅरोल यांनी दिले आहे. ते म्‍हणतात की, कथेची रचना आणि कथानक यामधून प्रेक्षकांना आनंद मिळत असतो. संपूर्ण कथेमधील अपरिहार्यता आणि त्‍याची पूर्णत: म्‍हणजे रहस्‍य उलगडणे यातून प्रेक्षकांना एक मानसिक समाधान मिळते.

मानसशास्‍त्रातील अभ्‍यासानुसार, हॉरर फिल्‍म्‍सची रचनाच ही प्रेक्षकांना थरार अनुभविण्‍यासाठी केलेली असते. भयातून मनोरंजन या कल्‍पनेतूनच भयपटाची निर्मिती हाेते. काही प्रेक्षकांना भयाचे एक आकर्षण असते. हॉरर फिल्‍म्‍सचे निर्माते याच भयाच्‍या आकर्षणाचा विचार करुन हा चित्रपट अधिक भयप्रद कसा वाटेल, याची मांडणी करत असतात.

हॉरर फिल्‍म्‍ससाठी संगीत आणि साउंडट्रॅक याकडे असते विशेष लक्ष

हॉरर फिल्‍म्‍स पाहताना प्रेक्षकांच्‍या शरीरात होणार्‍या बदलांचाही मानसशास्‍त्रात अभ्‍यास झाला आहे. चित्रपटातील धक्‍कातंत्राने आवाक होणे, ह्रदयाची गती कमी होणे किंवा वाढणे हेही घडत असत. अशा चित्रपटांमध्‍ये सर्वात प्रभावी ठरणारा घटक म्‍हणजे ध्‍वनी (आवाज). त्‍यामुळेच हॉरर फिल्‍म्‍स पाहताना संगीत आणि साउंडट्रॅक याकडे विशेष लक्ष दिले जाते. कारण भयप्रद आवाज हा मानवी भावनेवर परिणाम करतो, हे मानसशास्त्रातील विविध संशोधनांमध्‍ये स्‍पष्‍ट झाले आहे.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनने (एनएलएल) याबाबत केलेल्‍या अभ्‍यासानुसार, “रहस्‍य याचा अर्थ धोका, तणाव, या तणावाचे निराकरण असा अनिश्‍चितेचा अनुभव आहे. हॉरर फिल्‍म्‍समुळे प्रेक्षकांना एका अनिश्‍चितेचा अनुभव मिळतो. मात्र हा अनुभव व्‍यक्‍तीनिहाय वेगळा असतो. कोणासाठी तो हानिकारक ठरतो तर तणावमुक्‍ती झाल्‍याने काहींसाठी तो आनंददायी अनुभवही असू शकतो.”

हेही वाचा :

Back to top button