ज्ञानाच्या क्षेत्रात भारताला योग्य दिशा देणारा महानेता

ज्ञानाच्या क्षेत्रात भारताला योग्य दिशा देणारा महानेता
Published on
Updated on

चंद्रकांतदादा पाटील

ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहेत. बिग डेटा, मशिन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्तासारख्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगाने होत असलेल्या विकासामुळे जगभरातील अकुशल कामे आता माणसांऐवजी यंत्रे करू शकतील. त्याच वेळी गणित, संगणक विज्ञान आणि डेटा विज्ञान, यातील कुशल कर्मचार्‍यांना तसेच विज्ञान, समाजशास्त्र आणि मानव्यशास्त्र यांच्यातील बहुशाखीय क्षमता असलेल्या कुशल कर्मचार्‍यांना वाढती मागणी असेल…

हा मजकूर एखाद्या भविष्यवेत्त्याच्या ग्रंथातील नाही. जगात काय बदल होत आहेत आणि त्यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणार्‍या विज्ञानकथेतीलही हा मजकूर नाही. देशाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रस्तावनेमध्ये तिसर्‍या पानावरील ही टिप्पणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने देशाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 तयार करण्यात आले. हे देशाचे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिक धोरण आहे आणि या धोरणाचे ध्येय हे आपल्या देशातील वाढत्या विकासाच्या आवश्यकतांवर उपाययोजना करण्याचे आहे. या धोरणामध्ये विविध घटकांचा विचार केलेला आहे. देशाच्या समृद्ध वैचारिक परंपरेचा आणि ज्ञानसाधनेचा विचार केला आहे. त्याचसोबत वर्तमानकाळाचा आणि भविष्याचा कसा वेध घेतला आहे, हे वरील उल्लेखावरून दिसते. भारताची विशालता आणि विविधता ध्यानात घेऊन शिक्षणातील मातृभाषेचे महत्त्व या धोरणात जाणले आहे. भारतीय भाषांचा आदर इतका, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने इंग्रजीसोबत सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. त्यामध्ये मराठी भाषेचा समावेश आहे. जिज्ञासूंनी मराठी भाषेतून मांडलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जरूर वाचावे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे वेगळेपण आहे. ते जगभरातील मोठ्या सत्तांच्या प्रमुखांशी जितक्या सहजतेने बोलतात, तितकेच ते भारताच्या एखाद्या आदिवासी पाड्यातील बांधवांशी सहज संवाद साधतात. जगभरातील नवनव्या प्रवाहांची त्यांना जाणीव असते आणि त्याचवेळी त्या नव्या शोधांचा उपयोग भारतातील जनतेसाठी करण्यावर त्यांचा भर असतो. पंतप्रधान मोदी यांनी माहिती तंत्रज्ञानाचा गरीब कल्याणासाठी किती प्रभावी वापर केला आहे आणि गरिबांना मिळणार्‍या सरकारी मदतीमधील एजंट कसा हटविला आहे, हे पाहिले की मन थक्क होते. देशाच्या शैक्षणिक धोरणाबाबतीतही मोदी यांची हीच दृष्टी प्रत्ययाला येते. आपल्याला जगासोबत राहायचे आहे. आपल्याला आपल्या देशातील सामान्य विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याच्या संधी उपलब्ध करायच्या आहेत. आपल्याला प्रगत देश बनायचे आहे. त्याचवेळी आपल्याला आपल्या समृद्ध वारशाचा आणि ज्ञानपरंपरेचा वारसाही जपायचा आहे. कारण, आपल्याला जगातील एक प्रगत, समृद्ध आणि आधुनिक देश बनताना भारतीय म्हणून असलेली आपली ओळखही टिकवायची आहे.

'केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार। शास्त्रग्रंथविलोकत, मनुजा चातुर्य येतसे फार॥' हे कवी मोरोपंतांचे शब्द आहेत. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांची जडणघडण दोन्ही पद्धतीने झालेली आहे. त्यांना वाचनाची आवड आहे, त्यांनी कविता लिहिल्या आहेत व त्यातून त्यांची वैचारिक घडण झाली आहे. त्याचवेळी त्यांनी भारताचा अनेक वर्षे उभा-आडवा प्रवास डोळसपणे केल्यामुळे त्यांची जडणघडण झाली आहे. ते 1980 च्या दशकात गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून राजकारणात कार्यरत झाले. पण, त्याआधी त्यांनी अनेक दशके भारताचा प्रवास केलेला आहे. देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातून त्यांचे भ्रमण झाले आहे. सामान्य माणसांसोबत त्यांच्याच पद्धतीने मोदी यांनी प्रवास केला आहे. त्यामुळे कवी मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे मोदी यांना आपल्या देशाचे सूक्ष्म ज्ञान मिळाले आहे. त्याचा चांगला परिणाम आता त्यांच्या सरकार म्हणून कामात दिसतो. देशाचे शैक्षणिक धोरण ठरविताना एकाच वेळी जगातील आधुनिक प्रवाहांचे भान ठेवायचे आणि आपल्या समृद्ध ज्ञानपरंपरेची जाण ठेवायची हा सुरेख संगम दिसतो, त्याचे कारण मोदी यांचे नेतृत्व आहे.

विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीमुळे आधुनिक जगात झपाट्याने बदल होत आहेत. आता ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेचा प्रभाव वाढत आहे. आगामी काळात तो आणखी वाढत जाईल. आयटी क्षेत्र हे ज्ञानावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेचे ठळक उदाहरण आहे. याबाबतीतही नवीन संशोधन ज्याच्याकडे तो बाजी मारेल, असे घडते. मग तो देश असो की व्यक्ती असो, ज्याच्याकडे संशोधन आणि नावीन्यता त्याचे वर्चस्व, अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतीत काळाची पावले ओळखून देशात संशोधनावर भर दिला आहे. त्यांनी 2019 साली इंडियन सायन्स काँग्रेसचे उद्घाटन करताना सांगितले की, लालबहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' ही घोषणा दिली. श्रद्धेय अटलजींनी त्याला 'जय विज्ञान' अशी जोड दिली. आता वेळ आली आहे, की आपण एक पाऊल पुढे जावे आणि त्यामध्ये जय अनुसंधान (संशोधन) अशी जोड द्यावी.

मोदी यांनी संशोधनावर भर देताना त्यांच्या खास पद्धतीनुसार देशभरातील दूरदूरच्या गावांतील सामान्य कुटुंबातील मुलांनाही बालवयात संशोधनाची दिशा मिळेल आणि त्यांना विज्ञानाची गोडी लागेल, यासाठी काम सुरू केले. मोदी सरकारने 'अटल टिंकरिंग लॅब' नावाची योजना सुरू केली आहे. त्याच्या माध्यमातून शालेय पातळीवर विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी देण्यासाठी सरकार मदत करते. विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनास प्रोत्साहन देणे, हा या योजनेचा उद्देश आहे. सध्या देशामध्ये दहा हजार शाळांमध्ये अशा अटल टिंकरिंग लॅब सुरू झाल्या आहेत. यातूनच गावागावांतून नवे शास्त्रज्ञ घडतील, ते संशोधन करून नवे ज्ञान निर्माण करतील आणि देशाला ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत पुढे नेतील, अशीअपेक्षा आहे.

नव्या काळाची पावले ओळखून आपल्या शिक्षण क्षेत्रात बदल करण्याने आणि संशोधनावर भर देण्यामुळेच भारत जगात ज्ञानाच्या क्षेत्रातअग्रेसर ठरू शकतो. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला योग्यदिशा दिली आहे. त्या दिशेने प्रभावी कृती कार्यक्रमही सुरू केला आहे.त्यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी देशभर साजरा होत आहे. राज्यातीलउच्च शिक्षण क्षेत्राच्या वतीने आणि माझ्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो.

(लेखक हे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आहेत.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news