Memory Booster: मुलांची स्मरणशक्‍ती वाढवायचीय? ‘हे’ करा साेपे घरगुती उपाय

Memory Booster: मुलांची स्मरणशक्‍ती वाढवायचीय? ‘हे’ करा साेपे  घरगुती उपाय

पुढारी ऑनलाईन : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी स्मरणशक्ती महत्त्‍वाची ठरते. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि ती तल्लख बनविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यासाठी काहीजण बाजारात मिळणाऱ्या औषधांचा उपयोग करतात तर काहीजण अन्य घरगुती उपायांचा अवलंब करतात. परंतु स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बाजारातील औषधांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते घेणे गरजेचे आहे. पण याऐवजी आपण घरी देखील अगदी कमी बजेटमध्ये घरगुती उपाय करून स्मरणशक्ती वाढवू शकतो. चला तर जाणून घेवूया स्मरणशक्ती वाढविण्‍यासाठीच्या घरगुती उपायांविषयी…

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिरव्या कोबीच्या पानांची भाजी, हिरवा फ्लॉवर म्हणजेच ब्रोकोली यामध्ये मानवी मेंदूची कार्यक्षमता वाढविण्याची क्षमता असते. या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन के, ल्युटीन, फोलेट आणि बीटा कॅरोटीन यांसारख्या मेंदूला आवश्यक असणारे निरोगी पोषक घटक असतात. त्यामुळे आहारात याचा समावेश करणे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी फायद्याचे ठरते.

 मासे

चरबीयुक्त मासे खाणे हे आपल्या स्मरणशक्तीच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतात. कारण यामध्ये ओमेगा ३ या फॅटी ऍसिडचा मुबलक स्त्रोत असतो. या ओमेगा-३ चा उपयोग स्मरणशक्ती वाढविण्यासाठी होतो, त्यामुळे आठवड्यातून किमान दोनवेळा मासे खाणे फायदेशीर ठरते. ओमेगा 3 हे मानवी मेंदूसाठी तसेच स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचा उपयुक्त आहे. त्यामुळे आहारात सॅलमन, कॉड यांसारख्या चरबीयुक्त मासे खाणे गरजेचे आहे.

अक्रोड

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अनेकवेळा अक्रोड खा, असा सल्ला दिला जातो. हे अगदी खरं आहे, कारण अक्रोड हा प्रोटीन आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असतात. जे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक अ‍ॅसिड (एएलए) नावाचे ओमेगा-३ हे फॅटी अ‍ॅसिड असते. हे मेंदूबरोबरच हृदय आणि मन दोन्हीसाठी उपयुक्त आहे.

ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी

ब्लूबेरीमध्ये विशिष्ट फ्लॅव्होनॉइड रेणू असतात, जे डीएनए नुकसान आणि मेंदूच्या पेशींमध्ये होणाऱ्या हानीचा वेग कमी करतात. ब्लूबेरीमध्ये असलेले अँथोसायनिन हे मेंदूसाठी एक औषध मानले जाते. हे मेंदूला न्यूरॉन संप्रेषण आणि ऊर्जेसाठी ग्लूकोजच्या वापराचे नियमन करण्यास मदत करते.

बदाम

मेंदूच्या आरोग्यासाठी बदाम खूप उपयुक्त असते. बदाममध्ये असणारे अँटीऑक्सिडंट, प्रोटिन्स, व्हिटॅमिन-E हे पोषकघटक मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि सूज कमी करण्यास मदत करतात. बदाम खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. त्यामुळे रात्री बदाम पाण्यात भिजवून ते सकाळी साल काढून खाल्यास फायद्याचे ठरते.

याचबरोबर बीटरूटचा रस, जेवणाआधी साल न काढता सफरचंद खाणे, नियमित गुलकंदाचे सेवन, आवळ्याचा मुरांबा, भोपळ्याची भाजी खाणे, दैनंदिन जीवनात मधाचा वापर, झोपताना एक चमचा पाण्यात उगाळलेलं वेखंड पिल्यानेही स्मरणशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news