काँग्रेस ची एकूण अवस्था कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशीच झाली आहे. तसे नसते तर पंजाबमध्ये पक्षाची पकड चांगली असताना आणि विरोधात कोणी समर्थ प्रतिस्पर्धी नसताना, पक्षाची अशी दुर्दशा ऐन निवडणुकीच्या तोंडावर होण्याचे काहीही कारण नव्हते. सहा महिन्यांपूर्वी किसान आंदोलनाचा आडोसा घेऊनच काँग्रेसने छान मोर्चेबांधणी केली होती. त्याच सुमारास अकालींनी भाजपची साथ सोडली व आपलीच अवस्था अधिक बिकट करून घेतली. त्यातच आम आदमी पक्षापाशी कोणी खंबीर नेता नसल्यामुळे तोही काँग्रेस पक्षाला आव्हान देऊ शकेल असा स्पर्धक राहिला नाही. भाजप तर अकालींनी हात व साथ सोडल्याने पंजाबात पुरता अनाथ बालकासारखा पक्ष बनला आहे. त्यामुळे पाच वर्षे सत्ता राबवलेली असतानाची नाराजीही काँग्रेसला भोवणार नव्हती. इतकी पोषक परिस्थिती असताना जणू काँग्रेस श्रेष्ठींचीच पक्षाला दृष्ट लागली आणि त्यांनी स्वपक्षाच्याच विजयाला अपशकून करण्याची भूमिका घेतली. नवज्योतसिंग सिद्धू या उपर्याला थेट लोकप्रिय मुख्यमंत्र्यांसमोर अडथळे उभे करण्याचे काम सोपवले आणि आता तोच अमरिंदरसिंग व पक्षश्रेष्ठी अशा दोघांसाठी गळफास बनला आहे. कारण, सिद्धू आणि त्यांनी काँग्रेसमध्ये आपल्या सोबत आणलेले इतर लोक; काँग्रेससाठी समस्यांचा डोंगर उभा करीत आहेत. त्यांना रोखू शकेल असा कोणी खमक्या ज्येष्ठ नेताही श्रेष्ठींच्या हाताशी उरलेला नाही. वर्षभर आधी बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा म्हणून पत्र लिहून एकप्रकारे असहकार पुकारला होता. त्यांची समजूत घालून त्यांना पुन्हा कार्यरत करण्याची इच्छाही सोनिया वा राहुल यांनी दाखवली नाही. जर गुलाम नबी आझाद वा आनंद शर्मा यासारखे ज्येष्ठ आता पक्षाच्या दिमतीला असते, तर वेगळे दृश्य बघायला मिळाले असते. किमान अहमद पटेल तरी हवे होते, असेच सोनिया गांधींना वाटत असेल. कारण, तेच सोनियांसाठी मागल्या दोन दशकांत सातत्याने संकटमोचक म्हणून काम करीत होते. त्यांनी ही समस्या चुटकीसरशी निकाली काढली असती; पण आधीच संकटमोचक नाही आणि त्यात संकटांचा डोंगर उभा करणारी भूमिका राहुल-प्रियंका सातत्याने घेत असतात. त्याचा परिणाम किती भीषण होऊ शकणार आहे, त्याची कोणाला कल्पनाही नसावी. पूर्ण देशात अवघी तीन राज्ये अशी आहेत, जिथे अजून काँग्रेस स्वयंभू असून, आपल्या एकट्याच्या बळावर निदान तिथे सत्ता संपादन करण्याइतकी पक्षाची क्षमता आहे; पण तिथेही पक्षांतर्गत बेबनावाने पक्ष दुबळा झाला आहे वा दुबळा केला जात आहे. सिद्धू हे त्यापैकीच एक पात्र. अमरिंदर यांना आव्हान देता देता सिद्धू यांनी आता श्रेष्ठींवरही तोफा डागण्यापर्यंत मजल मारली आहे. आपल्याला कळसूत्री बाहुलीप्रमाणे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायचे नाही. तसा कोणी प्रयत्न केला तर आपण सगळाच विध्वंस करू, ही सिद्धूची धमकी वेगळे काय सांगते आहे?
जे बदल आपल्याला करायचे आहेत, त्यात कोणी आडवा आला तर 'इटसे इट बजा दुंगा' असे सिद्धू कोणाला म्हणत आहेत? कळसूत्री बाहुलीप्रमाणे त्यांना कोण वागवीत आहे? पहिल्या दिवसापासून प्रदेशाध्यक्ष म्हणून सिद्धू यांनी आपल्याला हवे तसे पदाधिकारी नेमले, त्यात काँग्रेसच्या परंपरा वा ज्येष्ठता, अनुभव यांचाही विचार केला गेलेला नाही. परगट सिंग वा तत्सम बाहेरच्या लोकांचाच प्रदेश काँग्रेसमध्ये भरणा केला असून, मुख्यमंत्र्यांशी त्यांचा पहिल्या दिवसापासून उभा दावा चालला आहे. पाच वर्षांत काँग्रेस पक्षाने व सरकारने दिलेले कुठलेही वचन आश्वासन पूर्ण केलेले नाही. अशीच टकळी वाजवून सिद्धू कोणासाठी प्रचार करीत आहेत? ज्या पक्षाने, सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत व अपेक्षाभंग केला, त्याला लोक पुन्हा सत्तेत संधी देतील काय? सिद्धूंचा प्रचार अमरिंदरसिंग यांच्या विरोधातला असला तरी व्यवहारात तो काँग्रेस सरकार विरोधातला ठरत असून, मतदाराला पक्षापासून सावध करण्याचाच हेतू त्यातून दिसतो आहे. त्यामुळे आता त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले अन्य काँग्रेस नेते व आमदारही भयभीत झाले असून, त्यांना निवडणुकीतला पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच आपला अमरिंदर सिंग यांच्यावरचा राग व्यक्त करायला सिद्धूंच्या पाठीशी उभे राहिलेले बहुतांश आमदार नेते घाबरले आहेत. मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाला परतले आहेत. याविषयी सिद्धूंना सावध करण्यासाठी पुढे झालेले हरीष रावत पंजाब काँग्रेससाठी प्रभारी असून, सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्या गळी मारण्याचे काम त्यांनीच केले होते; पण आता त्यांनीही हात झटकले आहेत. सिद्धूंना रोखावे कसे वा कोणी, या प्रश्नाचे उत्तर सोनियांना सापडू शकलेले नाही. तर राहुल त्याबाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ असावेत असेच दिसते. थोडक्यात, पक्षीय पातळीवर काँग्रेसने पंजाबमधील सत्तेवर पाणी सोडण्याची मनोमन तयारी केलेली दिसते; अन्यथा पक्षाचेच श्राद्ध घालायला नवज्योत सिद्धू निघाले आहेत! गतवर्षी राजस्थानात सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा उभारला, तरी पक्षाच्या हिताला बाधा येऊ नये इतकी काळजी घेतली होती; पण तो पेच सोडवताना जितका आटापिटा सोनिया-प्रियंका यांच्याकडून झाला, त्याचा मागमूस पंजाबमध्ये दिसलेला नाही. काँग्रेसने उद्या त्या राज्यातली सत्ता गमावली, तर तो काँग्रेसनेच काँग्रेसचा केलेला पराभव असेल.