जागतिक अवयव दान विशेष : मृत्यूनंतरही मिळू शकते 8 जणांना जीवदान..!

जागतिक अवयव दान विशेष : मृत्यूनंतरही मिळू शकते 8 जणांना जीवदान..!

अवयवसुद्धा दान करता येतात आणि त्यापासून अनेकांचे जीव वाचू शकतात, याची माहिती अनेकांना नव्हती. पण, केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रूग्णालयाने हा समज खोडून काढला आहे.

उत्तर कर्नाटकात 2018 साली पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण करण्यात आल्यानंतर लोकांत, 'अरे बापरे', अशीच भावना होती. पण, नंतर ही बाब सामान्य झाली. आता गेल्याच जुलै महिन्यात धारवाडच्या रूग्णालयात उपचार घेणारी 17 वर्षीय युवती ब्रेन डेड झाली होती. त्यामुळे तिचे हृदय धारवाडहून ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून बेळगावला आणण्यात आले आणि केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रूग्णालयातील युवकाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. ही घटना ताजी आहे. आतापर्यंत बेळगावात मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) प्रत्यारोपित करणे म्हणजे चर्चेचा विषय होता.

अवयव दान करताना जात, धर्म, संपत्ती असा कुठलाही अडसर येत नाही. अपघात किंवा कोणत्याही संदर्भात तीव्र जखमी होऊन ब्रेन डेड झाले, तर त्या व्यक्तीच्या अवयवांपासून इतरांना जीवदान मिळू शकते. म्हणूनच अवयव दानाबाबत जागरूक असणे आवश्यक आहे. मानवतेच्या दृष्टीने त्यासाठी अशा व्यक्तीच्या कुटुंबाने पुढाकार घेणे गरजेचे असते. दात्यांच्या मानवतेमुळेच आणखी एका जीवाला जीवदान मिळू शकते.

देशातील नॅशनल ऑर्गन अ‍ॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (नोटो)च्या अहवालानुसार दरवर्षी 5 लाख लोकांनी अवयव दान करणे आवश्यक आहे. आपल्या देशात रोज 1 लाख 60 हजार जणांना मूत्रपिंडांची आवश्यकता असते. पण, त्यापैकी केवळ 6 हजार जणांनाच दात्यांकडून मूत्रपिंड मिळते. वर्षाला 50 हजार लोकांना हृदय प्रत्यारोपणाची प्रतीक्षा असते. पण केवळ 10 ते 15 लोकांमध्येच हृदय प्रत्यारोपित होते. 1 लाखापैकी केवळ 15 हजार लोकांवर डोळ्यांचे प्रत्यारोपण होते.

जगात अमेरीकेत सर्वाधिक अवयव दान होते. त्यानंतर चीनमध्ये तर आपला देश तिसर्‍या स्थानावर आहे. आपल्याकडे 2013 मध्ये 4,990 आणि 2019 मध्ये 12,745 जणांनी अवयव दान केले आहे. कोरोना काळात हे प्रमाण 30 टक्क्याने कमी झाले होते. आता त्यात सुधारणा होत असल्याचे दिसून येते. अपघात किंवा कोणत्याही घटनेत गंभीर जखमी होऊन ब्रेन डेड झाला तरच अवयव दान करता येते. हृदय, यकृत, मूत्रपिंड, त्वचा, अस्थीमज्जा, श्‍वासकोष यासह 8 हून अधिक अवयव दान करता
येतात. त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण करता येऊ शकते.

केएलईत महिनाभरात 4 हृदयांचे प्रत्यारोपण
केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रूग्णालयात केवळ एका महिन्यात 4 हृदयांचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. आतापर्यंत 58 मूत्रपिंड, 75 डोळे आणि 24 लोकांवर अलोग्राफ करण्यात आले आहे. अत्याधुनिक रूग्णवाहिकेतून ग्रीन कॉरिडोरच्या माध्यमातून विविध अवयव प्रत्यारोपित करण्यात आले आहे. अवयव दान करण्यासाठी कोणत्याही स्थानिक रूग्णालयात अर्ज दाखल करता येऊ शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news