15 ऑगस्ट 2021 रोजी काबूलचा पाडाव झाला आणि जगभरातील शांतताप्रिय व लोकशाहीवादी लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. जगातील एकमेव लष्करी महासत्तेने अफगाणिस्तानातून माघार घेण्याचे निश्चित केल्यानंतर तालिबानचे वर्चस्व वाढणे व काबूलमधील सरकारमध्ये तालिबानी नेत्यांचा सहभाग होणे अपेक्षितच होते. मात्र, अफगाण सरकार व सैन्य याप्रकारे नांगी टाकेल, यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही. अमेरिकेच्या नेतृत्वातील बहुराष्ट्रीय सैन्य आणि त्यांच्यासह भारतासारख्या देशाने प्रशिक्षित केलेले अफगाण राष्ट्रीय सैन्य यांनी तालिबानपुढे हात टेकल्याने या धर्मांध संघटनेची अफगाणिस्तानवर निरंकुश सत्ता प्रस्थापित होण्यात कोणताही अडसर उरलेला नाही, असे चित्र उभे राहिले आहे.
संपूर्ण जागतिक लोकशाहीवादी समूह नैराश्याच्या अंधारात असताना, अफगाणिस्तानातीलच पंजशीर प्रांतातील लढवय्यांनी इस्लामिक कट्टरतावादाविरुद्धच्या लढाईत आशेचा किरण जागवला आहे. अफगाणिस्तानच्या मध्य-वायव्य भागात असलेल्या पंजशीर या छोट्याशा प्रांताने तालिबानचे वर्चस्व स्वीकारण्यास नकार दिला आहे. यातून भूतकाळाप्रमाणे भविष्यातदेखील पंजशीर हे तालिबान-विरोधी गटांचे आधारस्थान होऊ शकते, अशी आशा जागरूक झाली आहे. ताजिक वंशाचे बहुमत असलेल्या या प्रांताच्या भौगोलिक रचनेमुळे बाह्य आक्रमकांना या प्रांताला काबीज करण्यात यश आलेले नाही.
अफगाणी लोककथांनुसार प्राचीन काळात पंजशीरच्या लढवय्यांनी सिकंदरवरसुद्धा मात केली होती. त्यांच्या या लढाऊ व स्वाभिमानी वृत्तीमुळे हा प्रदेश पंजशीर म्हणजे पाच सिंहांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, अशी समजूत आहे. इथून वाहणार्या नदीचे नावही पंजशीर आहे आणि त्यावरून या प्रांताचे नाव ठरले असावे, असे गृहितक आहे. महाभारतात उल्लेखलेली पंचमीर नदी हीच असल्याचेही अनेकांचे मत आहे आणि पुढे पंचमीरचा अपभ्रंश पंचशीर झाला असावा, अशीही एक समजूत आहे. अशा या पंचशीर प्रांतात प्रवेशासाठी सोव्हिएत संघाच्या सहाय्याने बांधण्यात आलेला 3 किलोमीटरचा बोगदा हा एकमेव सोयीचा मार्ग आहे; अन्यथा काबूलपासून अवघ्या 145 किलोमीटरवर असलेल्या या प्रांतापर्यंत पोहोचण्यासाठी अडीच ते तीन दिवसांचा प्रवास करावा लागतो.
या कारणाने पंजशीरमध्ये प्रवेश करत पुरवठ्याचे मार्ग सुरू ठेवणे दुरापास्त आहे, ज्यामुळे बाहेरील गटांना या प्रांतावर सहजासहजी वर्चस्व राखता येत नाही.
सन 1980 च्या दशकात अफगाणिस्तानात विविध मुजाहिद्दीन गट सोव्हिएत संघाच्या सैन्याने केलेल्या हस्तक्षेपाविरुद्ध लढत होते. त्यांच्यापैकीच एक गट हा अहमद शाह मसूद या पंजशीरच्या नेत्याचा होता. मसूद यांच्या गटाचा साम्यवादी विचारधारेला विरोध होता; मात्र इतर मुजाहिदी गटांच्या तुलनेत हा गट कट्टर नव्हता. यामागे दोन कारणे महत्त्वाची होती. एक तर पंजशीर खोर्यात बहुसंख्येने असलेल्या ताजिक वंशियांचे तत्कालीन सोव्हिएत संघाचा भाग असलेल्या ताजिकिस्तानातील ताजिक लोकांशी जवळचे संबंध होते.
साम्यवादी प्रभावामुळे ताजिक लोकांमध्ये इस्लामिक कट्टरतावादाचा प्रवेश झाला नव्हता आणि त्यामुळे पंजशीरमधील ताजिक मुस्लिमांचे अरबीकरण झाले नव्हते. दुसरे कारण म्हणजे, अहमद शाह मसूद काबूल विद्यापीठाचे पदवीधर होते आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी ते फ्रान्सलादेखील राहून आले होते. साहजिकच, उदारमतवादी फ्रेंच विचारसरणीचा मसूद यांच्यावर प्रभाव होता. सोव्हिएत संघाच्या सैन्याविरुद्ध लढताना मसूद यांनी अमेरिकेचे व पाकिस्तानचे सहकार्य अवश्य घेतले होते; मात्र आपल्या लोकांमध्ये जिहादची सौदी अरेबियाकडून होणारी लागवड पसरणार नाही याची काळजीसुद्धा घेतली होती. सन 1985 मध्ये अहमद शाह मसूद यांच्या नेतृत्वात पंजशीरने सोव्हिएत संघाविरुद्ध दिलेल्या कडव्या प्रतिकाराने ताजिक लोकांचा हा गट जागतिक प्रकाशझोतात आला.
पंजशीरवर सोव्हिएत सैन्याच्या मदतीने वर्चस्व प्रस्थापित करण्याचा काबूलच्या साम्यवादी सरकारचा प्रयत्न होता, जो मसूद यांच्या नेतृत्वामुळे फोल ठरला. सन 1990 मध्ये सोव्हिएत सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तानात सुरू झालेल्या मुजाहिदी गटांच्या गृहयुद्धात मसूदने कडव्या इस्लामिक गटांच्या विरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. सन 1992 मध्ये काबूलमध्ये गुलबुद्दीन हिकमतयार व इतर मुजाहिदी गटांनी प्रवेश करत अवघ्या अफगाणिस्तानवर सत्तास्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, पंजशीरचे खोरे त्यांना पुरून उरले होते. याच काळात अहमद शाह मसूद यांना भारत व रशियाने मदत करण्यास सुरुवात केली होती. सन 1996 मध्ये तालिबानने मुजाहिदी गटांना हुसकावून लावत काबूल व अफगाणिस्तानच्या बहुतांशी प्रांतांवर सत्ता प्रस्थापित केली. मात्र, वायव्य भागात तालिबानला स्वत:चा प्रभाव निर्माण करता आला नाही; कारण अहमद शाह मसूद यांचे पंचशीर खोरे त्यांच्यासुद्धा विरोधात उभे ठाकले.
मसूद यांनी उत्तर व वायव्येकडील तालिबानी नसलेल्या सर्व गटांना एकत्र आणत अफगाणिस्तानसाठी सरकार स्थापन केले. आता भारत व रशियासह इराण, अमेरिका व इतर अनेक देश मसूद यांनी एकत्र आणलेल्या गटाला समर्थन देऊ लागले होते.
जागतिकस्तरावर अफगाणिस्तानचे सरकार म्हणून मसूद यांच्या सरकारलाच मान्यता होती. काबूलमधील तालिबानी सरकारला फक्त पाकिस्तान, सौदी अरेबिया व यूएईचीच मान्यता होती. सन 2001 मध्ये अमेरिकेवर दहशतवादी हल्ला करण्याच्या अवघे 2 दिवस आधी, म्हणजे 9 सप्टेंबर रोजी, अहमद शाह मसूद यांना सशस्त्र हल्ल्यात ठार मारण्यात आले. अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन-लादेन यानेच ट्युनिशियातील जिहादींच्या हस्ते मसूद यांची हत्या केली, असे मानण्यात येत आहे. मात्र, मसूद यांच्या हत्येने ना पंजशीरचा लढवय्येपणा संपुष्टात आला, ना त्यांचा इस्लामिक मवाळवाद तालिबानला शरण गेला.
याची जाहीर प्रचिती 18 ऑगस्ट 2021 रोजी आली, जेव्हा अहमद शाह मसूद यांचा अहमद मसूद या नावानेच ओळखल्या जाणार्या पुत्राने अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा 'द वॉशिंग्टन पोस्ट' या दैनिकात लेख लिहीत तालिबानविरुद्ध एल्गार पुकारला. अहमद मसूद यांनी स्पष्ट लिहिले आहे की, पंजशीरची तालिबानशी दोन हात करायची तयारी आहे. अफगाणिस्तानच्या इतर भागातून तालिबानविरोधी लढवय्ये आणि अफगाण राष्ट्रीय सैन्याचे अनेक सैनिक त्यांच्या शस्त्रास्त्रांसह पंजशीर खोर्यात पोहोचत आहेत. मात्र, एवढे पुरेसे नाही आणि जागतिक समुदायाच्या मदतीशिवाय तालिबानला फार काळ रोखून धरणे शक्य होणार नाही.
32 वर्षीय मसूद लिहितात की, अफगाणिस्तानात लोकशाही, महिला स्वातंत्र्य व अल्पसंख्याकांची सुरक्षा यावर द़ृढविश्वास असलेले लोक पुरेशा संख्येने आहेत आणि ते सातत्याने उग्रवादी विचारांच्या विरुद्ध लढत आहेत. आज त्यांची भिस्त जागतिक समुदाय, विशेषतः लोकशाहीवादी देश, यांच्या भूमिकेवर विसंबून आहे. पंजशीरचे दुसरे नेते आणि अफगाणिस्तानचे प्रथम उपाध्यक्ष उमीरुल्लाह सालेह यांनी म्हटले आहे की, त्यांचा लढा फक्त त्यांच्या प्रांतासाठी नाही, तर अफगाणिस्तानात मानवी हक्कांच्या रक्षणार्थ व मुक्त समाजासाठी आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशातून पलायन केल्यानंतर अफगाणी राज्यघटनेनुसार सालेह कार्यकारी राष्ट्राध्यक्ष आहेत.
मसूद आणि सालेह यांचे नेतृत्व जिगरबाज असले, तरी आज जागतिक समुदाय तालिबानविरुद्ध उभ्या ठाकलेल्या पंजशीर प्रांताकडे दुर्लक्ष करतो आहे. परिणामी, मसूद यांनी तालिबानशी बोलणीची तयारी दर्शवली आहे.1990 च्या दशकात अहमद शाह मसूद यांच्या नदर्न अलायन्सला भारत, इराण, रशिया व अमेरिकेसह मध्य आशियातील राष्ट्रांचा पाठिंबा आणि मदत होती. आज ताजिकिस्तान वगळता यापैकी कोणत्याच देशाने तालिबानला मान्यता देणार नाही, असे ठामपणे म्हटलेले नाही. उलट, अमेरिका, रशिया, चीन व इराणने तालिबानशी संधान साधले आहे. अफगाणिस्तानातील गदारोळाबाबत जागतिक समुदायाने अवलंबलेल्या नाकर्तेपणामुळे पंजशीरचे शेर त्यांची अखेरची लढाई लढत आहेत.