9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान... | पुढारी

9 ऑगस्ट क्रांती दिन विशेष : ऑगस्ट क्रांती लढ्यातील कोल्हापूरचे योगदान...

‘चले जाव, भारत छोडो’ असा इशारा महात्मा गांधी यांनी इंग्रजांना 8 ऑगस्ट 1942 रोजी दिला. यामुळे संपूर्ण देशभर ब्रिटिश सत्तेविरोधात प्रचंड लाट उसळली. अहिंसेबरोबरच क्रांतिकारकांनी सशस्त्र लढा सुरू केला. देशभर या लढ्याचा वणवा पेटला. ‘स्वातंत्र्य’ बाणा जपणार्‍या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रभर हा लढा क्षणार्धात पोहोचला. ‘शाहूनगरी’ कोल्हापूर याला अपवाद नव्हते. कोल्हापुरात एकापाठोपाठ एक क्रांतिकारी कारवाया झाल्या. आज, 9 ऑगस्ट म्हणजे ‘ऑगस्ट क्रांति दिन’ यानिमित्ताने कोल्हापूरच्या ऑगस्ट क्रांती लढ्यावर टाकलेला प्रकाशझोत.

जिल्हाभर क्रांतिकारी कारवाया 9 ऑगस्ट 1942 ला शाहू मिलवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चावर लाठीमार झाला. यात श्रीनिवास यादव जखमी झाले. यानंतर बंदी आदेश झुगारून रविवार वेस (बिंदू चौक) येथे सभा सुरू झाली. या सभेवर ब्रिटिश पोलिसांकडून गोळीबार झाला. यात बिंदू कुलकर्णी ठार झाले. 13 डिसेंबरला कूर येथील नदीवरील पूल बॉम्बस्फोट करून उडविला. हातकणंगले, रुकडी, जयसिंगपूर रेल्वेस्थानक जाळण्यात आले.

इंग्रजांना बनवले ‘एप्रिल फूल’

1 एप्रिल 1943 ला शंकरराव माने, शामराव पटवर्धन, यशवंत कुलकर्णी यांनी शालिनी पॅलेस येथील बर्मा ऑफिसच्या सरकारी खजिन्याची लूट केली. इतकेच नव्हे तर वेशांतर करून मोहीम फत्ते केल्यानंतर इंग्रजांना ‘एप्रिल फूल’चा संदेशही दिला.

विल्सनचा पुतळा फोडला

कोल्हापूर शहराच्या मुख्य चौकातील विल्सन या इंग्रज अधिकार्‍याचा संगमरवरी पुतळा निवृत्ती आडूरकर, गजानन भुसारी, सिदलिंगा हाविरे, जयाबाई हाविरे, शाहीर दत्तोबा तांबट, जयाबाई हाविरे यांनी डांबर ओतून विद्रूप केला. मात्र, इंग्रजांनी रॉकेलचा वापर करून डांबर काढून पुतळा पूर्ववत केल्याने क्रांतिकारकांचा प्रयत्न फोल ठरला. काही दिवसांनी 21 सप्टेंबर 1945 रोजी पहाटे पुतळा सफाईच्या बहाण्याने क्रांतिकारकांनी बादलीतील पाण्यात हातोडा ठेवून त्याच्या सहाय्याने पुतळ्याच्या नाक, कान व मानेवर घाव घालून तो फोडण्यात आला. याबद्दल शामराव पाटील, माधवराव घाटगे, पांडुरंग पोवार, नारायणराव घोरपडे यांच्यावर खटला भरण्यात आला. ‘विल्सन नोज कट’ या नावाने हा खटला पुढे अनेक वर्षे सुरू होता.

गावचावड्यांवर तिरंगे फडकविले

कोल्हापुरात ‘भारत छोडो’ लढ्याअंतर्गत 18 ऑक्टोबर 1942 ला रत्नाप्पाण्णा कुंभार, माधवराव बागल, बंडाप्पा घुगरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक लढ्यासाठी एकवटले. जेलभरो आंदोलन करण्यात आले. गावचावड्यांवर तिरंगा फडकवून गावकामगार पाटलांना गांधी टोपी घालणे, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हा, असे आव्हान करणारी पत्रके वाटणे असे लढ्याचे स्वरूप होते.

– सागर यादव

Back to top button