श्रावण मास : सणांचा श्‍वास

श्रावण मास : सणांचा श्‍वास
Published on
Updated on

माणसाच्या रूक्ष आणि साचेबंद जीवनात विरंगुळ्याचे, सुखा समाधानाचे काही क्षण यावेत यासाठी सण-उत्सवांची योजना झालेली असावी, असे निश्‍चितपणे वाटते. असे आनंदाचे आणि हर्षोल्हासाचे क्षण गरीब माणसांनाही उपभोगता यावेत यासाठी सणसमारंभांची सांगड धार्मिक विधींशी सणंशी व्रतांशी आणि असामान्य (इतिहासातील आणि पुराणातील) पुण्यस्मरणाशी घालण्यात आलेली आहे. अनेक लोककथा, दंतकथा अशा सण-उत्सवांशी निगडीत आहेत. श्रावणमासातील सण हे मानवी जीवनावर धार्मिक व आध्यात्मिक संस्कार करणारे हे नक्‍कीच.

सर्वसामान्य माणूस पोटासाठी कष्ट उपसत असतो. अशा लोकांच्या मनात काही सुप्‍त आशा आकांक्षा असतात. नटणं, मुरडणं ह्याची स्त्रियांना हौस व रूबाबदार नि आकर्षक दिसण्यासाठी प्रत्येक पुरुषांनाही आवड असते. घर शोभिवंत असावे, रूचकर पदार्थ खाण्यास असे सामान्यातल्या सामान्य माणसांनाही वाटत असते. या इच्छा आकांक्षा कधीतरी पुर्‍या व्हाव्यात यासाठी सण-उत्सव-समारंभ यांची व्यवस्था आपल्या धर्मकृत्यात केली असावी. सणाच्या निमित्ताने घराची स्वच्छता, रंगरंगोळी असे स्वच्छता अभियान सुरू राहते. सुशोभनामागे लोकांना सौंदर्यदृष्टी प्राप्‍त व्हावी, त्यांची अभिरुची वाढावी असाही हेतू असण्याची शक्यता आहे. रसिकता जोपासावी लागते तसेच तिचे संवर्धनही करावे लागते. शिवाय धार्मिक दृष्टीकोन पाळण्याची शिकवण श्रावणातही सण-उत्सव देत असतात.

दुसरा मुद्दा म्हणजे आपला देश कृषिप्रधान आहे.येथील रहिवाशांच्या अस्तित्वाचा, आचारविचारांचा मूळ आधार शेती.शेती आणि धर्म म्हणजे धर्मावर अधिष्टित तत्वज्ञान. या दोन खांबावर भारतीय संस्कृती, साहित्य, कला उभी आहे हे स्तंभ भरपूर मजबूत आहेत. कितीही आणि कसेही ओझे सांभाळण्यास व पेलण्यास त्या शक्‍ती व सामर्थ्य यावेत म्हणून सण उत्सवाची योजकता करण्याची कल्पकता पूर्वजांनी दाखविलेली आहे. धार्मिक कल्पनांमुळे मानवी जीवनात मांगल्य, पावित्र्य आणि उल्हास निर्माण होऊ शकतो. सणांच्या निमित्ताने त्याशी निगडीत असलेली लोकगीते फार मोलाचा मनाचा उल्हास वाढवितात. भक्‍तीच्या गीतांना स्वरांचा नाद सुगंध आणि भावनांचे मांगल्य याचीच जोड असते. श्रावणमासात पूजा अर्चा करण्यासाठी गीतांचा आधार घेणे स्त्रियांना सोयीस्कर असतात. स्त्रिया संसारात दैनंदिन कर्तव्याबरोबरच सण व मार्गदर्शकाची भूमिका घेतात. अशावेळी सगुण मार्गाचा अवलंब करतात आणि देवळात आणि घरातील देवघरात इतर स्त्रियांसमवेत भक्‍तिभावात घालवतात. विशेषतः श्रावणमासात तर अगदी आवर्जून.
भक्‍तीगीतांमधून देवाची सगुण उपासना करणे. घडते ते श्रावणमासात विशेषतः स्त्रिया त्यात मग्‍न राहतात.

सण आणि उत्सवातून नवचैतन्य

आनंद आणि उल्हास यांचा अमृत वर्षाव करीत येणारे निरनिराळे सण आणि उत्सव माणसाला नवचैतन्य देऊन जीवनात येणार्‍या निरनिराळ्या प्रसंगांना सहजपणे सामोरे जाण्याचा आत्मविश्‍वास देऊन जातात. म्हणूनच श्रावण महिन्याची व त्यानिमित्ताने येणार्‍या सण उत्सवाची सुरुवात करणार्‍या दिवसांची माणूस आतुरतेने वाट पाहतो. सण आणि उत्सव साजरे करताना माणसाची उत्सवप्रियता उफाळून येते. धार्मिक भावना मनात ध्यानात तनात उदभवतात. किर्तन, प्रवचन, भजन, नामस्मरणाची ओढ वाटू लागते. तसेच त्याच्या सौंदर्यदृष्टीला आणि कलाप्रियतेला भरपूर वाव मिळत असल्याने सुप्‍त कलागुण विकसित होतात. याच बरोबरीने दुसरे महत्त्वाचे अंग असते ते म्हणजे परंपरागत संस्कार व पूर्वापार चालत आलेल्या रूढी. या सणांना आणि उत्सवांना व त्यातून होणार्‍या हर्षोल्हासाला जी एक धीर गंभीर भक्‍कम अशी पार्श्‍वभूमी असते व ती असते धर्माची. अमूक एका सणाचे महत्त्व काय? यामागचे कारण काय आहे? काय विचार आहे? तो साजरा करायचा म्हणजे काय करायचे? कोणते विधी पार पाडायचे? कोणता आचार धर्म पाळायचा याबाबत पूर्वजांनी काही सांगून ठेवले आहे. काही मार्ग आखून दिलेले असतात. त्यामागे त्यांची भावना असते. ते समजून घेऊन मोठ्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने चालू पिढीने सण साजरे करावेत.

श्रद्धा असावी व अंधश्रद्धा नसावी. भक्‍ती असावी. स्तोम नसावे. उपास असावा पण क्‍लेश नसावेत. पूजा अर्चा असावी पण कर्म कर्तव्य सोडून त्यात दंग होणे नसावे. अमंगल अरिष्ट दूर पळावे आणि आपल्याला सुख समाधानाचा लाभ होईल म्हणून देवदेवतांची मनापासून पूजा अर्चा करणे आजच्या ग्लोबल जगात व आधुनिक युगात आवश्यक आहे. मात्र त्याचे स्तोम वा त्याच्या आहारी जाणे नकोच नको असेच धर्मविधी सांगतात. भक्‍तीगीतेही. तसाच अर्थ ध्वनित करतात.

भावना व विचारसरणी अशी सच्ची पवित्र असल्यावर आचारधर्म माणसाकडून अगत्यपूर्वक पाळला जातो तेच तर श्रावणसणाचे व पुढे येणार्‍या चार्तुमासातील व्रत वैकल्येचे फलित होय. हे आचार माणसाच्या अंगवळणी पडून जातात. त्यामुळेच आपले मूळ धर्माचरण केले जाण्याचे संस्कार कुठेही गेलो तरी पाळले जातात. एरव्हीच्या जीवनात कितीही धावपळ असली किंवा शास्त्रीय दृष्टीकोन व बुद्धीवाद यांची कास आपण धरलेली असली व असावी. तरी त्यातही आचारधर्माला सात्विकता तात्विकता व आपल्या धर्माची आचारसंहिता पाळायला शिकवणारे सण व उत्सव याच्या साजरेपणाला मोलाचे स्थान आहे.

भारतीय लोकजीवनाचा सण आणि उत्सव हा जणू गाभा म्हणायला हवा. जीवनातला फार मोठा आनंद व अर्थ सामावलेला आहे. जणू मोकर्‍याचा सुगंध किंवा गुलाबाचा मृदूमुलायमपणा या गोष्टी वाचून ज्याप्रमाणे मोगर्‍याला मोकरेपण किंवा गुलाबाला गुलाबपण उरणार नाही. त्याप्रमाणे रोमारोमात भिनलेल्या सण उत्सवाशिवाय भारतीय जीवन सुने ठरेल. श्रावण महिना हा सणांचा राजा. भारतीय संस्कृतीत त्या महिन्यापासून सण उत्सवाचे साजरेपण दणक्यात सुरू होते. हा सण वर्षा ऋतुचा व तो म्हणजे चैतन्य, सौंदर्य, समृद्धीचा मूर्तीमंत वसा. त्याचीच प्रचिती श्रावण सणांच्या निमित्ताने येत राहते. तसे तर श्रावण सौंदर्य माणसांना खुलवतो फुलवतो व त्या काळात येणारे सण धर्मपालन, हर्षोत्सव आणि चैतन्याचा अनुभव देणारे आहेत.

डॉ. लीला पाटील
कोल्‍हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news