ग्रहवेध : शनिचा मकर राशी प्रवेश स्थैर्य देणारा | पुढारी

ग्रहवेध : शनिचा मकर राशी प्रवेश स्थैर्य देणारा

पं. अभिजित कश्यप, होरामार्तंड

नवग्रहात शनि हा बलाढ्य ग्रह मानला जातो. हिंदू शास्त्राप्रमाणे शनि ग्रह कर्माधिपती आहे. तो मानवाच्या पूर्व कर्माप्रमाणे फळ देतो, असे मानले जाते. मानवी जीवनात शनिची प्रभावी फळे मिळतात, असा अनुभव आहे. असा हा बलाढ्य शनि ग्रह बुधवार दि.13 जुलै रोजी दुपारी 3 वाजून 54 मिनिटांनी कुंभ राशीतून वक्रगत्या मकर राशीत प्रवेश करीत आहे. मकर या स्वराशीत शनिचा प्रवेश होत आहे. सर्वसाधारणपणे मकर राशीतील शनिचे भ्रमण हे स्थैर्य देणारे आहे.

शनि हा कठोर परीक्षा घेणारा ग्रह असल्याचे ज्योतिष शास्त्रात म्हटले जाते. शनिच्या साडेसातीत व्यक्‍तीची तावून सुलाखून परीक्षा होते. परंतु अशा कठोर परीक्षेनंतर शनि भरभरून चांगली फळे देतो, असेही ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. शनिचा अंमल हा प्रामुख्याने कष्टकरी, श्रमजीवी वर्गावर असतो. उद्योग व्यवसाय, कारखाने, लोखंड, स्टील व्यवसाय, याबरोबर खाद्यतेल व्यवसायावर शनिचा प्रभाव असतो; त्यादृष्टीने मकरेतील शनिची फळे अनुभवास येतात.

कारखानदार वर्गाला मकरेतील शनिची शुभफळे मिळण्याचे योग आहेत. श्रमजीवी आणि कष्टकरी वर्गाला काही सुखद अनुभव येण्याची शक्यता आहे. लोखंड आणि स्टील व्यवसाय, बांधकाम क्षेत्र यांना अनुकूल संधी मिळण्याची शक्यता आहे. खाद्यतेल व्यवसायातही अनुकूल घडामोडी होऊ शकतील. मकर ही भूमीतत्वाची राशी आहे. त्यामुळे मकर राशीतील शनि शेतकरी वर्गाला दिलासा देऊ शकेल. 23 आक्टोंबरला शनि मार्गी होत आहे. त्यानंतर सार्वजनिक जीवनात आणि राजकीय क्षेत्रात अनुकूल आणि उत्साहवर्धक घडामोडी होण्याचे योग आहेत. 28 सप्टेंबर रोजी शनि-मंगळ त्रिकोण होत आहे. तो अनेक चांगल्या घटनांना चालना देऊ शकणारा आहे.

एकूण शनिचा मकर राशीतील प्रवेश सर्वसाधारणपणे शुभ असा आहे. धनु, मकर आणि कुंभ राशी या राशींना सध्या साडेसाती आहे. मात्र शनि स्वगृहीचा असल्याने तुलनेने फार त्रास होण्याची शक्यता नाही. श्री शनि देवाला शनिवारी तेल वाहावे, शनिवारी उपास करावा, यातून साडेसातीची तीव्रता कमी होऊ शकते. मेष, सिंह आणि वृश्‍चिक राशीला हा शनी अनुकूल आहे. वृषभ, कन्या आणि मीन राशीला काही चांगली फळे मिळू शकतील. धनु राशीला स्थावर आणि गुंतवणुकीला काही प्रमाणात यश मिळू शकेल. मिथुन, कर्क यांना मध्यम फळे मिळतील. तूळ राशीला चतुर्थात शनी असल्याने आणि राशीवर शनिची दहावी दृष्टी असल्याने काही त्रास होण्याची शक्यता आहे. कुंभ राशीला व्यय स्थानातील शनी काही प्रमाणात त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

Back to top button