

पिकांना आपण जेवढे अधिक पाणी देऊ तेवढी पिके तरारतील, अशी सामान्यतः शेतकर्यांची धारणा असते. परंतु हे वास्तव नाही. पिकांना जेवढी गरज असते, तेवढेच पाणी देणे इष्ट ठरते. रोपांना गरजेपेक्षा अधिक घातलेले पाणी जमिनीत खूप खोलवर जाते आणि रोपांची मुळे तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. गरजेपेक्षा अधिक पाण्याची वाफही होऊन उडून जाते. रब्बी पिकांच्या बाबतीत सिंचनाच्या दोन तृतीयांश पाणी कच्च्या पाटातून येत असताना जमिनीत शोषले जाऊन नष्ट होते. केवळ एक तृतीयांश पाणीच रोपांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे जर सिंचन योग्य वेळेत केले गेले तर सीमित पाण्याचा योग्य उपयोग होतो.
अधिक सिंचन केल्यामुळे अनेक प्रकारे नुकसान होते. सिंचन वेळेवर केल्यास लाभ होतात; पण गरजेपेक्षा जास्त पाणी दिले गेल्यास रोपांना आवश्यक असणारी पोषक द्रव्ये जमिनीत मुरून खोलवर जातात. ही द्रव्ये रोपांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळेच रोपे पिवळी पडू लागतात. ज्या ठिकाणी पाटाने पाणी दिले जाते, तेथे वारंवार हे द़ृश्य पाहायला मिळते. अधिक सिंचन केल्यामुळे मातीत हवेचा संचारही कमी होतो. त्यामुळे रोपांची वाढ खुंटते. जमिनीतील क्षार अती प्रमाणात पाणी दिल्यामुळे वाढतात. त्यामुळे जमीन क्षारपड होण्याचा धोका वाढतो. अधिक ओलावा असल्यामुळे जमिनीत रोपांच्या मुळांचे क्षेत्र घटते. त्यामुळेच रोपांना पुरेशा प्रमाणात जमिनीतील पोषक तत्त्वे शोषून घेता येत नाहीत.
रब्बी हंगामातील गहू हे प्रमुख पीक आहे. याच पिकाला अधिक सिंचनाचा लाभ होऊ शकतो. देशी उन्नत जातींचा गहू किंवा गव्हाचे सुधारित वाण लावल्यास पाण्याची आवश्यकता 20 ते30 सेंटी मीटर एवढी असते. या जातींमध्ये पाण्याच्या उपयोगाच्या दृष्टीने तीन अवस्था असतात. पेरणीनंतर 30 दिवसांचे पीक झाल्यानंतरची अवस्था, पुष्पावस्था म्हणजे पेरणीनंतर 50 ते 55 दिवसांनंतरची अवस्था आणि दुधिया अवस्था म्हणजे पेरणीनंतर 95 दिवस पूर्ण झाल्यानंतरची अवस्था अशा या तीन अवस्था आहेत. या तीन अवस्थेत पाणी दिल्यास पिकाचे उत्पादन वाढते. प्रत्येक सिंचनावेळी 8 सेंटी मीटर पाणी दिले जाणे आवश्यक आहे. बुटक्या गव्हाच्या प्रारंभिक अवस्थेपासूनच पाण्याची आवश्यकता अधिक असते. क्राऊन रूट आणि आणि झखडा मुळे येण्याच्या वेळी पाणी द्यावे लागते.
पेरणीनंतर 15-16 दिवसांपर्यंत रोपे बियांमधील सुरक्षित अन्नावर अवलंबून असतात आणि त्यातूनच आपले अन्न शोषत राहतात. परंतु त्यानंतर बीजामधील संचित अन्न संपू लागते आणि तेव्हा हळूहळू जमिनीतून पोषक द्रव्ये शोषली जाऊ लागतात. ही मुळे सुमारे एक सेंटी मीटर खोलवर गेलेली असतात, त्यावेळी जमिनीचा पृष्ठभाग ओला असणे आवश्यक असते. अशा वेळी पेरणीनंतर 20 ते 21 दिवसांनी कमी प्रमाणात सिंचन करणे आवश्यक असते. शिखर मुळांपासूनच रोपांच्या कोंबांचा विस्तार होतो, हे शेतकर्यांना माहीत असायला हवे. त्यामुळे रोपांमध्ये केशर जास्त प्रमाणात दिसते. त्यामुळेच अधिक उत्पादन मिळते. झखडा मुळे रोपाला आधार देण्यासाठी प्रामुख्याने असतात. त्यामुळे पेरणीच्या वेळी जमिनीत कोणत्याही परिस्थितीत ओलावा असणे आवश्यक आहे. बुटक्या गव्हाच्या जातींच्या शेतात मशागत करतानाच योग्य निगा राखल्यास चांगले अंकुरण होते. या जातींना एकंदर 40 ते 50 सेंटी मीटर पाण्याची आवश्यकता असते आणि प्रत्येक सिंचनाच्या वेळी 6 ते 7 सेंटी मीटर पाणी देणे गरजेचे असते.
दोनदा सिंचन करण्याची सोय उपलब्ध असेल तर पहिले सिंचन पेरणीनंतर 20 ते 21 दिवसांनंतर प्रारंभिक मुळे तयार होण्याच्या अवस्थेत करावे आणि दुसरे सिंचन फुले येण्याच्या अवस्थेत करावे. जर तीनदा सिंचन करणे शक्य असेल तर पहिल्यांदा पेरणीनंतर 20 ते 21 दिवसांनी पाणी द्यावे. दुसरे पाणी रोपांना गाठी येण्याच्या अवस्थेत म्हणजे पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी करावे आणि तिसरे सिंचन फुले आल्यानंतर करावे. ज्या ठिकाणी चार वेळा सिंचन करण्याची सुविधा उपलब्ध असेल, त्या ठिकाणी पहिले सिंचन पेरणीनंतर 21 दिवसांनी म्हणजे शिखर मुळे फुटण्याच्या वेळी, दुसरे पेरणीनंतर 40 ते 45 दिवसांनी म्हणजे कल्ले तयार होण्याच्या वेळी, तिसरे सिंचन पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी म्हणजे गाठी तयार होण्याच्या वेळी, तर चौथे सिंचन फुले येण्याच्या वेळी करावे.
चौथे आणि पाचवे सिंचन फारसे लाभदायक ठरत नाही. जेव्हा मातीतील पाण्याचा संचय करण्याची शक्ती संपुष्टात येईल, तेव्हाच चौथे आणि पाचवे सिंचन करणे योग्य असते. मध्यम आणि निम्न जमिनीत अशा प्रकारच्या सिंचनाची गरज भासते. दाण्यात दूध भरण्याच्या वेळी पाचवे सिंचन करावे. जर वातावरणातील तापमान वेगाने वाढत चालल्याचे दिसून येत असेल, तर सहावे सिंचन करावे. जर दाण्यात दूध तयार होण्याची अवस्था टळून गेली असेल आणि दाणे कठोर होण्याची अवस्था सुरू असेल, तर सिंचन केले नाही तरी चालते. प्रयोगांती काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, सहा वेळा सिंचन केल्यास बुटक्या गव्हाच्या कोणत्याही प्रजातीचे उत्पादन चांगले मिळते. परंतु जर सहा वेळा सिंचन करणे शक्य नसेल तर वर दिल्याप्रमाणे तीन अवस्थांमध्ये पिकाला पाणी देणे चांगले. गव्हाच्या अन्य प्रजातींमध्ये 5 वेळा सिंचन प्रत्येकी 15 दिवसांच्या अंतराने करणे चांगले. पहिले सिंचन 15 दिवसांनी करावे.
त्यानंतरच्या प्रत्येक सिंचनात 9 ते 10 दिवसांचे अंतर राखावे. दाण्यांचा विकास होत असताना बाष्पीभवन वेगाने होत असल्यास पाणी द्यावे. कारण शेतात ओलावा टिकवून ठेवणे आवश्यक असते. ओलावा कमी पडल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते. परिणामी दाणे आकुंचन पावतात. त्यामुळे उशिरा पेरलेल्या गव्हाला पहिले पाणी कमी दिवसांच्या अंतराने देणे गरजेचे आहे. रब्बी गव्हाच्या बाबतीत अतिरिक्त पाणी देणे टाळून पिकाचे चांगले उत्पादन घेता येते. केवळ अधिक पाणी दिले म्हणून अधिक पीक येते हा गैरसमज आहे.
– शैलेश धारकर