छत्रपती शिवरायांनी धर्मांध औरंगजेबास पत्र लिहून सुनावले होते खडे बोल | पुढारी

छत्रपती शिवरायांनी धर्मांध औरंगजेबास पत्र लिहून सुनावले होते खडे बोल

औरंगजेबाने जेव्हा धर्मांधपणा सुरू केला आणि बिगर मुसलमान लोकांवर (मुस्लिमेतर म्हणजे वैदिक, हिंदू, राजपूत, इंग्रज इत्यादी) जिझिया कर लादण्यात आला. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांना समजली तेव्हा शिवरायांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिले आणि याबद्दल खडे बोल सुनावले. 3 एप्रिल 1679 रोजी लिहिलेले हे पत्र.

सांप्रत अमुच्या संगे युद्धप्रसंगानंतर आपले संपत्ती खर्च झाले असता पादशहा-खजिना रिकामा जाहला, याकरिता हिंदू लोकांकडून जजियापट्टीचे द्रव्य उत्पन्न करून पादशाही गरजा त्याच्याआधारे पूर्ण करीत आहां असे ऐकण्यास आले. ही पादशाही निर्माण करणारा (जलालुद्दीन) अकबर बादशहांनी न्यायाने 52 वर्षे राज्य केले. त्यांनी ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम, दोउद पंथीय, काफर, नास्तिक (दहारिया), ब्राह्मण (वैदिक) आणि जैन धर्मगुरू या सर्व धर्म पंथीयांना वैश्विक हितसंबंध जोपासणारे प्रशंसनीय असे धोरण अवलंबले होते. त्यांच्या या अशा सहिष्णू हृदयाचे ध्येय एकच होते ते म्हणजे सर्व लोकांना आनंदी ठेवून त्यांचे रक्षण करणे होय. त्यामुळेच त्यांची कीर्ती जगतगुरू या नावाने पसरली.

पुढे नूरउद्दीन जहागीर बादशाह यांनी 22 वर्षे पादशाही तक्त चालवले व चांगल्या कर्माने स्वर्गात पोहोचले. शाहजहान बादशाह यांनी 32 वर्षे बादशाहत करून उपरात राहिले. आयुष्य चांगलेपणात घालून निरंतर कीर्ती मिळवली. यावरून कळते की, जो पुरुष जिवंत असताना लौकिकवान झाला, त्याच्या मागे त्याची कीर्ती झाली आणि त्यास अचल लक्ष्मी प्राप्त जाहली सदर लिहिलेल्या पादशहाचा प्रताप व पराक्रम असा त्यांनी दस्तूर व वहिवाटी केली. त्यांचे रक्षण करण्यास आलमगीर (औरंगजेब) फिकीरबंद झाले. हे सर्व बादशहाही जजियापट्टी घेण्यास समर्थ होते. परंतु, लहान-थोर सर्वजण आपले धर्म जपतात व सर्व ईश्वराचे पाईक आहोत, असे जाणून कोणावरही जुलूम करावा हे मनात आणले नाही. त्यांची ही उपकाराची कीर्ती अजूनही आहे व हरएक लहान-मोठ्याच्या तोंडी त्यांची स्तुती असून, आशीर्वादही आहेत. जशी नियत तशी त्याची बरकत. लोकांचे कल्याण करण्यावरच या बादशहांची दृष्टी होती.

हल्ली आपल्या कारकिर्दीत कित्येक किल्ले व मुलूख गेले व बाकी राहिलेले जात आहेत. कारण ते खराबी करण्याविषयी कमतर नाही. जे रयत लोक खराब आहेत. हरएक महालाचे उत्पन्न लाखास एक हजार येणे कठीण असे जाहले. बादशहा व बादशहाजादे यांच्या घरी दारिद्य्राचा वास जाहला. तेव्हा पदरचे मनसबदार व उमराव यांची अवस्था कळतच आहे. सारांश शिपाई लोक हैराण, सौदागर पुकारा करतात, मुसलमान रडतात, हिंदू लोक मनात जळतात आणि कित्येक लोकांस पोटास मिळत नाही, असे आहे. तेव्हा राज्य चालविणे कसे? त्यांच्यावर जजियापट्टीचा उपद्रव तो या प्रकारचा आहे. तो पूर्व-पश्चिमेपावेतो जाहीर जाहला आहे की, हिंदुस्तानचा पातशहा फकीर, ब्राह्मण, शेवडे, जोगी, संन्यासी, वैरागी व अनाथ, गरीब थकलेले, पडलेले असे एकंदर लोकांपासून जजिया घेतात व यातच पुरुषार्थ आहे असे समजतात आणि तैमुर पातशाहाचे नाव बुडवितात, असे जाहले आहे.

अस्मानी किताब म्हणजे कुराण. ती ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली ती ईश्वर सर्व जगाचा किंवा मुसलमानांचा आहे. वाईट अथवा चांगले असो, दोन्हीही ईश्वराचे निर्मित आहेत. कोठे मस्जिद आहे, त्याचे स्मरण करून बांग देतात. कोठे देवालय (मंदिर) आहे, तेथे घंटा वाजवतात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे म्हणजे आपल्या धर्मापासून सुटणे (खर्‍या शिकवणुकीपासून दूर जाणे) व ईश्वराने लिहिलेले अमान्य करण्यासारखे आहे. न्याय मार्गाने पाहता जजियापट्टीचा कायदा केवळ गैर पेशजी आहे. सुलतान अहमद गुजराथी हा असाच गैरचालीने वागला. त्यानंतर तो लवकरच बुडाला. त्यास त्या वृद्धापकाळी असे बद्ध होणे हे पराक्रमास अगदी योग्य नाही. याविषयी दृष्टांत जुलूम ज्यावर झाला, त्याने खेद करून हायहाय म्हणून मुखाने धूर काढल्यास त्या धुराने तो जळून जाईल.

तरीसुद्धा हिंदू लोकांस पीडा करण्यातच धर्म आहे, असे आपल्या मनामध्ये आल्यास आधी राजा जयसिंग यांच्यापासून जजिया कर घ्यावा म्हणजे इकडूनही मिळण्यास कठीण नाही. उपरांत सेवेसी हजर आहे. परंतु, जे गरीब, अनाथ व मुंग्या-चिलट्यांसारखे आहेत त्यास उपसर्ग करण्यात काहीच मोठेपणा नाही. पदरची मंडळीही पाहता अग्नी तृणाने झाकतात, याचेही आश्चर्य वाटते.

– संदर्भ : शिवकालीन पत्रासार संग्रह (खंड 3)

Back to top button