जगणं शिकवणारा माणूस; ‘माणसं’ जिवंत करणारा लेखक | पुढारी

जगणं शिकवणारा माणूस; 'माणसं' जिवंत करणारा लेखक

नंदकुमार लटके, पुढारी ऑनलाईन : “मी सर्वत्र बर्‍यापैकी एसटीतूनच फिरतो. मला एसटीचा प्रवास आवडतो. येथेही माझा आवडता छंद ‘ओरिगामी’ सुरु असते. त्‍यामुळे एसटीत माझ्‍यासमोर बसलेले रडणारं पोरगं आईला बिलगत मी करत असलेली ओरिगामी पाहतं बसतं. काही क्षणात त्‍याच रडणं गायबं होतं”, अनिल अवचट अप्रत्‍यक्षपणे जगणं किती सहज आणि सोपे आहे हे सांगत होते. ते आपल्या जगण्‍यातील अनुभव सांगत गेले आणि सर्वसामान्‍यांशी सहज संवाद साधणारा हा ‘माणूस’ किती जगावेगळा आहे, हे उलगडत गेले. आज सकाळी अनिल अवचट गेले आणि या स्‍मृतीला पुन्‍हा उजाळा मिळाला.

अनिल अवचट ३ www.pudharinews

वंचित, शोषितांच्‍या प्रश्‍नांचे संशोधनवृत्तीने चिंतन करणारे समाजसेवक, अत्‍यंत सोप्‍या भाषेत जगणं शिकवणारे लेखक, विविध छंदांमधून जगणं किती आनंददायी होऊ शकते याची शिकवण देणारे मार्गदर्शक आणि व्‍यसनमुक्‍तीसाठी प्रामणिक प्रयत्‍न करणारे डॉक्‍टर डॉ. अनिल अवचट यांना आज महाराष्‍ट्र मुकला. महान व्‍यक्‍तिमत्‍व हे साधं असतं, या सुविचाराची आठवण अनिल अवचट यांच्‍याकडे पाहिलं की येत असे. एक व्‍यक्‍ती विविध क्षेत्रांमध्‍ये किती प्रभावीपणे आपलं अस्‍तित्‍व सिद्‍ध करु शकते, हे अवचटांनी आपल्‍या कृती आणि लिखाणातून सिद्‍ध केले.

अनिल अवचट यांनी पुण्‍यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी घेतली. मात्र संवेदनशील अवचट यांचे मन वैद्‍यकीय क्षेत्रात रमलं नाही. डॉक्‍टरांसाठी रुग्‍णाचे शरीर हे एक यंत्र असतं. खूप भावनिक होऊन तुम्‍ही रुग्‍णांवर उपचारच करु शकत नाही, त्‍यामुळे आपलं मन वैद्‍यकीय क्षेत्रात रमणार नाही, हे त्‍यांनी ओळखलं. जे आवडतं ते प्रमाणिकपणे करायचं, असं ठरवून ते सामाजिक चळवळीमध्‍ये सक्रीय झाले.

सामाजिक क्षेत्रातील कार्य असो की, मुक्‍त पत्रकार म्‍हणून कोणत्‍याही प्रश्‍नाला भिडताना त्‍यांची संशोधनवृती ही आदर्शवत ठरली. माणसं, वाघ्‍या मुरळी, कोंडमारा, मजूर, वेश्‍या, प्रश्‍न आणि प्रश्‍न या पुस्‍तकांतून ही संशोधनवृती आपल्‍याला दिसते. त्‍यांनी आपल्‍या लिखाणातून भटक्‍या जमाती आणि वंचित घटकांचे प्रश्‍न अत्‍यंत संवेदनशीलपणे मांडले. ‘गर्द’मधून त्‍यांनी व्‍यसनाची भयावहता स्‍पष्‍ट केली. अनिल अवचट यांचं साधं आणि सोप्‍या भाषेतील लिखाण थेट मनाला भिडणारं ठरलं. लिखाणात कोणताही अभिनिवेश नाही, जे पाहिलं ते थेट लिहिलं, त्‍यांचा जगण्‍यातील आणि लिखाणातील प्रामाणिकपणा तरुण पिढीसाठी आदर्शवत ठरला. त्‍यांना वाचत एक पिढी लिहिती झाली. त्‍यांनीही हेच सांगतलं की, “सोपं आणि प्रभावी लिहायचं? तर मग अनिल अवचट यांच लिखाण वाचा.”

अनिल अवचट यांच्‍या पत्‍नी डॉ. अनिता अवचट यांनी मुक्‍तागंण व्‍यसनमुक्‍ती केंद्र उभारले. १९९७ मध्‍ये अनिता अवचट याचं निधन झाले. यानंतर त्‍यांनी मुलगी मुक्‍ता आणि इतर सहकार्‍यांबरोबर व्‍यसनमुक्‍तीची चळवळ फक्त सुरुच ठेवली नाही, तर
व्‍यसनमुक्‍तीसाठी मुक्‍तागंणच्‍या माध्‍यमातून मोठे कार्य उभे केले. ‘मुक्‍तांगणची गोष्‍ट’मधून त्‍यांनी ते मांडलं.

अनिल अवचट १ www.pudharinews

सोपं आणि आनंद आयुष्‍य जगण्‍यासाठी एक तरी छंद असावा, हे अवचटांनी तरुणाईला शिकवलं. जपानी ओरिगामी (कागदाला विशिष्‍ट पद्‍धतीने आणि क्रमाने घड्या घालून सुंदर वस्‍तू तयार करणे) छंद त्‍यांनी केवळ जोपासला नाही, तर महाराष्‍ट्रात ओरोगामी म्‍हणजे अनिल अवचट, असं समीकरण तयार झालं होतं.

अनिल अवचट यांनी सर्वसामान्‍य, कष्‍टकरी, वंचितांचं जगणं आपल्‍या साहित्‍यातून मांडलं. जगणं किती सोपं आहे, त्‍याला तेवढ्याच संवेदनशीलपणे कसं पहावं, याची शिकवण त्‍यांनी आपल्‍या जगण्‍यातून दिली. आता यापुढेही त्‍यांच हेच लिखाण साधं सोपं जगताना पडलेल्या प्रश्‍नांना कसं सामारं जावं, याची शिकवण कायम देत राहतील.

Back to top button