Pisces : मीन वार्षिक राशिभविष्य 2022 – कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल

Pisces : मीन वार्षिक राशिभविष्य 2022 – कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल
Published on
Updated on

Pisces मीन वार्षिक राशिभविष्य 2022 – कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल

देवाधर्माची, साधूसंतांची, ऋषिमुनींची अत्यंत मनोभावे, उत्कटतेने, श्रद्धेने पूजाअर्चा करणार्‍यांची ही Pisces रास आहे. भावनाप्रधानता व भावुकता ही आपल्या राशीची वैशिष्ट्ये आहेत. विरुद्ध दिशेला तोंड असलेले दोन मासे हे मीन राशीचे प्रतीक आहे. म्हणून ही राशी द्विस्वभाव आहे. परस्परविरोधी माशांची तोंडे असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्‍तींचा स्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा बनलेला असतो. ही द्विस्वभाव राशी असल्यामुळे आशा-निराशा, यश-अपयश व विविध विचारांची उलटसुलट आंदोलने आपल्या मनात सतत सालू असतात. दोन लंबकांमध्ये आपले मन सतत हेलकावे खात असते.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक आहे. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे. दि. 12/04/2022 पूर्वीच्या कालखंडात गुरू बाराव्या स्थानात राहणार असल्यामुळे मीन व्यक्‍तींनी आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने दि. 12/04/2022 पर्यंतचा कालखंड जरी प्रतिकूल असला तरी उर्वरित सर्व वर्ष आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले जाणार आहे. यावर्षी आरोग्याच्या विशेष तक्रारी जाणवणार नाहीत. मात्र, जबाबदारी वाढेल. वेगवेगळ्या जबाबदार्‍या येऊन पडणार आहेत. त्यामुळे काहीवेळा आरोग्यावर ताण येणार आहे. हा गुरू जसे आरोग्य चांगले ठेवणार आहे, तसेच त्याच वेळी कौटुंबिक सौख्यही चांगले लाभणार आहे. मुलामुलींची प्रगती चांगली होणार आहे. काहींच्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. तुमचे व्यक्‍तिमत्त्व एका वेगळ्या उंचीवर जाईल.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 12/04/2022 ते दि. 24/10/2022
वरील कालखंड सामान्यत: आरोग्याच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.
खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने विशेष चांगले आहेत.
दि. 28/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 07/08/2022 ते दि. 30/08/2022
सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे खालील कालखंडात आपण काळजी घ्यावी.
दि. 15/01/2022 ते दि. 12/02/2022

Pisces व्यवसाय व आर्थिक स्थिती

व्यवसाय, उद्योग व आर्थिक स्थिती या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. परंतु; मंगळ या ग्रहाची भ्रमणे आपणाला अनुकूल ठरतील. त्यामुळे गुरूची फारशी अनुकूलता नसतानासुद्धा आर्थिकबाबतीत समाधानकारक वातावरण आपणाला दिसून येईल. व्यवसायात जमा-खर्चाची तोंडमिळवणी करू शकाल. व्यवसायाचा दहाव्या स्थानाचा स्वामी गुरू तोच प्रथमस्थानी आहे. अर्थात, दि. 12/04/2022 नंतर तुमची मानसिक दिशा अनुकूल परिवर्तनाच्या दृष्टीने सुरू राहील. तुम्ही अधिक कार्यक्षमतेने व अधिक तडफेने काम कराल. तुम्ही व्यवसायाकडे परिपूर्णतेने लक्ष द्याल. यावर्षी मीन व्यक्‍तींचे व्यवसाय हेच लक्ष व व्यवसायाची प्रगती हे धोरण राहणार आहे. हा व्यवसाय तुम्ही अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडाल. यावर्षी व्यवसायात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. व्यवसायात नवीन संपर्क साधू शकाल. व्यवसायाचे क्षेत्र व्यापक करू शकाल.

खालील कालखंड आर्थिक लाभासाठी चांगले आहेत.

व्यवसायासाठी आपणाला दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. यावर्षी व्यवसायातील निर्णय चांगले येणार आहेत. तुमची मनःस्थिती चांगली राहणार आहे. आरोग्याची साथ लाभल्यामुळे दि. 12/04/2022 नंतर तुम्ही व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल व त्याचा फायदा होईल.

दि. 01/01/2022 ते दि. 26/02/2022
दि. 24/05/2022 ते दि. 17/06/2022
दि. 26/06/2022 ते दि. 31/08/2022
दि. 24/09/2022 ते दि. 24/10/2022
दि. 11/11/2022 ते दि. 29/12/2022

नोकरी

नोकरीच्या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. बरेचसे प्रतिकूल आहे. ज्या व्यक्‍ती नव्याने नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्या दृष्टीने देखील चांगले आहे. मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांचे व थोरामोठ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. तुमच्या कर्तृत्त्वाला वाव मिळेल. नोकरीतील तुम्ही आपली स्वप्ने पूर्ण करू शकाल. दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात थोडेसे स्वास्थ्य लाभेल. विशेषत: नोकरीतील कटकटी कमी होतील. कामाचा ताण कमी होईल. परंतु; नोकरीमध्ये बढती किंवा चांगले वातावरण या गोष्टी कमी प्रमाणात राहतील. नोकरीमध्ये फार मोठ्या यशाची अपेक्षा करणे योग्य होणार नाही. नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. फक्‍त आपणाला स्वास्थ्य लाभेल आणि नोकरीमध्ये आपले प्रभुत्व व कर्तृत्त्व सिद्ध होईल. नोकरीतील व्यक्‍तींना ज्या अपेक्षा करावयाच्या आहेत, त्या अपेक्षा दि. 12/04/2022 नंतरच कराव्या लागतील. यावर्षी नोकरीमध्ये प्रत्यक्ष बढतीपेक्षा इतरांना मार्गदर्शन करण्याचे कार्य तुमच्याकडे येईल. नोकरीमध्ये तुमच्या विचारांची व व्यक्‍तिमत्त्वाची दखल घेतली जाईल. नोकरीतील काही व्यक्‍तींना यावर्षी वेगवेगळ्या संधी लाभतील. नियोजन व नवीन सुधारणा, व्यवसायाची प्रगती व विकास यासंदर्भात आपला सल्‍ला घेतला जाईल. ज्या ठिकाणी विशेष बौद्धिक कार्य आहे, अशा संस्थेमध्ये किंवा विविध संशोधन संस्थेमध्ये नियोजनामध्ये आपल्याला सहभागी करून घेतले जाईल.

खालील कालखंड मीन राशीच्या व्यक्‍तींना नोकरीच्या दृष्टीने चांगले आहेत.

दि. 01/01/2022 ते दि. 11/02/2022
दि. 15/04/2022 ते दि. 14/05/2022
दि. 01/07/2022 ते दि. 31/07/2022
दि. 21/08/2022 ते दि. 24/10/2022
दि. 11/11/2022 ते दि. 31/12/2022

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी, गुंतवणूक यासाठी हे वर्ष चांगले आहे. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड मीन राशीच्या व्यक्‍तींना विशेष अनुकूल आहे. यावर्षी मीन राशीच्या व्यक्‍तींना प्रॉपर्टीचे योग चांगले येतील. दि. 12/04/2022 पूर्वीचा व 12/04/2022 नंतरचा असे दोन्ही गुरू प्रॉपर्टीला अनुकूल ठरतील. यावर्षी नेमके काय करायचे, हे आपल्या लक्षात येईल. आपल्याला हव्या त्या ठिकाणी व योग्य ठिकाणी प्रॉपर्टीसाठी, फ्लॅटसाठी जागा मिळेल. यावर्षी कोणत्याही क्षेत्रातील आपला निर्णय चुकणार नाही. गुरूची भाग्यस्थानावर दृष्टी असल्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तसेच प्रॉपर्टीमध्येही संधी लाभणार आहे. गुंतवणुकीलाही हे वर्ष चांगले आहे.
खालील कालखंड प्रॉपर्टीसाठी अनुकूल आहेत.

दि. 02/07/2022 ते दि. 31/07/2022
दि. 20/08/2022 ते दि. 26/10/2022
दि. 13/11/2022 ते दि. 29/12/2022

संततिसौख्य

संततिसौख्याच्या दृष्टीने, मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. संततिसौख्य, मुलामुलींचे शाळा प्रवेशाचे प्रश्‍न, परीक्षेतील निकालाचे प्रश्‍न, नोकरी, व्यवसायाच्या समस्या, एकूण प्रगती या दृष्टीने हे वर्ष चांगले जाणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने कार्यरत राहावे लागणार आहे. आपल्याला या वर्षाचे नियोजन करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आपले अंदाज चुकणार नाहीत याची काळजी घ्यावी. दि. 12/04/2022 नंतर मुलामुलींचे शाळा, कॉलेजचे प्रश्‍न मार्गी लागतील. परीक्षेचे निकाल अनुकूल लागतील. शाळा, कॉलेज प्रवेशाचे प्रश्‍न मार्गी लागतील. मुलामुलींची प्रगती योग्य दिशेने होईल. दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड अत्यंत चांगला आहे. मुलामुलींचे सर्व प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.
खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने चांगले आहेत.

दि. 27/02/2022 ते दि. 01/04/2022
दि. 28/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 31/07/2022
दि. 20/08/2022 ते दि. 26/10/2022
दि. 13/11/2022 ते दि. 17/12/2022

वैवाहिक सौख्य

विवाहेच्छूंचे विवाह होण्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. या कालखंडात पती-पत्नींना एकमेकांचे सौख्य लाभेल. जोडदाराचा सल्‍ला लाभदायक ठरेल. जोडीदाराची कामामध्ये मदत होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधू शकाल. मीन राशीच्या विवाहेच्छू मुलामुलींचे विवाह होणे व जमणे या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड अनुकूल आहे. दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा विवाह होण्याच्या दृष्टीने अनुकूल नाही. दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवन व कौटुंबिक सौख्य, आरोग्य या सर्व दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड मीन राशीच्या व्यक्‍तींना अनुकूल ठरणार आहे.

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीनेखालील कालखंड अनुकूल आहेत.

दि. 01/01/2022 ते दि. 05/03/2022
दि. 28/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 01/06/2022 ते दि. 31/07/2022
दि. 21/08/2022 ते दि. 24/10/2022
दि. 11/11/2022 ते दि. 29/12/2022

प्रवास

प्रवास, तीर्थयात्रा, सहली, परदेश प्रवास या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष अत्यंत चांगले आहे. या वर्षी तीर्थयात्रेचे योग येणार आहेत. काहींना परदेश प्रवासाचे योग येतील. विशेषत: विद्यार्थ्यांना परदेश प्रवासाकरिता हे वर्ष अत्यंत चांगले आहे. या वर्षी काहींना प्रवासाच्या अनेक वेळा संधी येतील. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रवासी कंपन्यांनाही हे वर्ष चांगले आहे. मीन राशीच्या व्यक्‍तींना मुळात धार्मिक कार्याची आवड असते. त्यामुळे यावर्षी तीर्थयात्रेच्या संधी निश्‍चित येतील. यावर्षी धार्मिक कार्यामध्ये व वैचारिक दृष्टीमुळे प्रवासामध्ये अनुभवाची समृद्धी येईल.

खालील कालखंड प्रवासाच्यादृष्टीने चांगले आहेत.

27/04/2022 ते दि. 23/05/2022
18/06/2022 ते दि. 31/08/2022
05/09/2022 ते दि. 26/10/2022
13/11/2022 ते दि. 30/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद,मानमान्यता

प्रतिष्ठा, मानसन्मान, अधिकार या दृष्टीने मीन राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष सर्वसामान्य आहे. हाती घेतलेल्या कामात यश लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर दबदबा राहील. तुमच्या कामाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने तुम्हाला अनेकांची साथ लाभेल. विशेषत: दि. 12/04/2022 चा कालखंड हा बराचसा प्रतिकूल आहे. त्यामुळे मीन राशीच्या व्यक्‍तींना सार्वजनिक कामात, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात मानसन्मान, प्रतिष्ठा मिळण्याच्या दृष्टीने खालील कालखंड अनुकूल ठरतील.

खालील कालखंड प्रतिष्ठा, मानसन्मान या दृष्टीने प्रगतीचे आहेत.

दि. 17/01/2022 ते दि. 25/02/2022
दि. 14/04/2022 ते दि. 14/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 16/08/2022
दि. 17/09/2022 ते दि. 17/10/2022
दि. 16/11/2022 ते दि. 16/12/2022

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड मीन राशीच्या व्यक्‍तींना अत्यंत उत्साहवर्धक असा आहे. उत्साह वाढेल, उमेद वाढेल, नवी दिशा दिसेल, नवा मार्ग दिसेल. आरोग्य, मानसिक स्थिती चांगली असल्यामुळे व गुरू या ग्रहाची अपेक्षित साथ असल्यामुळे सुसंधीच्या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड आपणाला चांगला जाणार आहे. हे वर्ष आपल्या जीवनाला अनपेक्षित कलाटणी देणारे आहे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा व अनुभवाच्या कक्षा रुंदावणार आहेत. खर्‍या अर्थाने मानसिक उन्नती, परिवर्तन यावर्षी अनुकूल दृष्टीने होणार आहे. दि. 12/04/2022 नंतरचे तुमचे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने पडणार आहे. जीवनातील एक नवे पर्व असे हे वर्ष आहे. बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्‍तींना व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी व आपल्या कार्यात उंचीचे शिखर गाठण्यासाठी हे वर्ष खूपच चांगले आहे. एक नोंद करून ठेवण्यासारखे असे हे वर्ष आहे.

खालील कालखंड सुसंधी,प्रसिद्धीच्या दृष्टीने अनुकूल जातील.

दि. 27/04/2022 ते दि. 23/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 26/10/2022
दि. 12/11/2022 ते दि. 29/12/2022

सारांश
मीन राशीच्या व्यक्‍तींना या वर्षातील बराचसा कालखंड म्हणजे दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा आरोग्य, कौटुंबिक सौख्य, वैवाहिक सौख्य, सार्वजनिक कामात संधी, तुमच्या कार्यक्षेत्रात प्रसिद्धी या गोष्टी होऊ शकतील. यावर्षी तुम्ही नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यात यश लाभेल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. वैचारिक व बौद्धिक क्षेत्रात अनुकूल मानसिक परिवर्तनाची शक्यता आहे. प्रत्यक्ष आर्थिक लाभापेक्षा किंवा नोकरीत बढती इ. गोष्टीपेक्षा आरोग्य, मानसिक सौख्य, कौटुंबिक सौख्य, मानसिक शांतता या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. काहींची या वर्षात आध्यात्मिक प्रगती होईल. ज्यांना धार्मिक कार्यात विशेष आवड आहे, त्यांना हे वर्ष विशेष चांगले जाणार आहे.
– प्राचार्य रमणलाल शहा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news