

बोटा, पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्याच्या पठार भागात गेली चार महिन्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. यात सोयाबीन, टोमॅटो, बाजरी, झेंडू आदी शेतकर्यांचे शेतीमाल पाण्यात बुडाले आहे. अशातच झालेल्या अतिवृष्टीने घारगाव गावांतर्गत असलेल्या कान्होरेमळा येथील शेतकरी सुनील शंकर डोंगरे यांची शेतातील विहीर डोळ्यांदेखत जमीनदोस्त झाल्याची घटना रविवार (दि. 16) रोजी सायंकाळी घडली आहे.
सुनील शंकर डोंगरे हे आपल्या कुटुंबासोबत कान्होरे मळा परिसरात राहत असून, तेथे त्यांची शेती आहे. शेतीत एकशे दहा फूट खोल विहीर होती. या विहिरीचे त्यांनी साठ फुटांपर्यंत सिमेंट काँक्रिटमध्ये पक्के बांधकाम केलेले होते. परंतु अतिवृष्टीने ही विहीर डोळ्या देखत जमीनदोस्त झालेली पाहून शेतकर्याला दुःख अनावर झाले आहे.
पठार भागात गेली चार महिन्यांपासून होत असलेल्या अतिवृतीने पठार भागातील ओढे नाले भरुन वाहू लागले आहेत. सर्वत्र शेतीमध्ये पाणीच पाणी झालेले आहे. त्यामुळे शेतजमिनीला पाझर फुटले आहे. शेतजमिनी उपळू लागल्या आहेत. जमिनीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
विहिरीही पाण्याने काठोकाठ भरल्या असल्याने त्यातच या शेतकर्यांची विहीर जमीनदोस्त झाली असल्याने या शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापूर्वी देखील पठार भागात अनेक विहिरी अचानक जमीनदोस्त झाल्या आहेत. वेळोवेळी शेतकर्यांच्या विहिरींचे पंचनामे झाले. परंतु त्यांना विहिरींची नुकसान भरपाई मिळाली नाही.