Farmers strike : शेतकरी उद्या विजय दिवस साजरा करणार

Farmers strike : शेतकरी उद्या विजय दिवस साजरा करणार
Published on
Updated on

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारकडून लेखी आश्‍वासनानंतर गेल्या 378 दिवसांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन (Farmers strike) मागे घेत असल्याची घोषणा करीत शनिवारी 11 डिसेंबरला विजय दिवस साजरा करणार असल्याचे संयुक्‍त किसान मोर्चातर्फे जाहीर करण्यात आले. गुरुवारी पत्रकार परिषदेतून एसकेएमच्या पदाधिकार्‍यांनी शेतकरी आणि देशवासीयांचे आभार मानले.

कृषी मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल यांच्याकडून पाठवण्यात आलेल्या पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती मध्य प्रदेशचे शेतकरी नेते शिवकुमार कक्‍का यांनी दिली. या पत्रानुसार शेतकरी आंदोलकांकडून करण्यात आलेल्या बहुतांश मागण्यांवर चर्चा करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासंबंधी 15 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर यासंबंधीचा आढावा घेण्यात येईल. शेती सुधारणा कायदे आणून देशातील शेतकर्‍यांना संघटित केल्याबद्दल कक्‍का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्याने देशावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशात उद्या, शुक्रवारी आंदोलनाचा विजयोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी नेत्यांकडून सांगण्यात आले. शनिवारी, 11 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जाईल. 11 डिसेंबरला सिंधू तसेच टिकरी बॉर्डरवरील आंदोलनस्थळावरून विजयी मार्च काढण्याची योजना आखण्यात आली आहे. (Farmers strike)

आंदोलन समाप्‍तीनंतर शेतकरी नेते 15 डिसेंबरला अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतील. आंदोलनाच्या यशाचा जल्लोष सर्व धरणेस्थळांवर, टोल नाक्यांवर केला जाणार आहे. आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करताना देशातील डॉक्टर, वकील, समाजमाध्यमे, प्रसिद्धी माध्यमे, कलाकार यांचे शेतकरी नेत्यांनी आभार मानले. आंदोलनाचे श्रेय शहीद शेतकर्‍यांना समर्पित करण्यात आले.

केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आश्‍वासने

एमएसपी हमी समिती स्थापन करण्यात येईल
संयुक्‍त किसान मोर्चाच्या नेत्यांना समितीत समाविष्ट केले जाईल
देशभरात शेतकरी नेत्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार
आंदोलनादरम्यान मृत शेतकर्‍यांना सरकार आर्थिक मदत देणार
भागधारक तसेच एसकेएम सोबत चर्चेनंतरच वीज विधेयक संसदेत आणले जाईल
शेतातील पाचट, तण जाळणार्‍या शेतकर्‍यांवर कारवाई करणार नाही

उद्यापासून घरवापसी

शनिवारपासून सिंधू, गाझीपूर बॉर्डरसह विविध आंदोलनस्थळावरून शेतकर्‍यांची घरवापसी सुरू होईल. त्यानंतर 12 डिसेंबरला शेतकरी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात अरदास करीत आपापल्या घरी पोहोचतील. आजच्या बैठकीत शेतकरी संघटनेचे 200 हून अधिक शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारपासूनच शेतकर्‍यांनी त्यांचे तंबू हटवून साहित्य वाहनांमध्ये टाकायला सुरुवात केल्याचे चित्र दिसत होते.

जानेवारीत आढावा घेणार

जानेवारीत होणार्‍या एसकेएमच्या बैठकीमधून आंदोलनातून शेतकर्‍यांनी काय मिळवले, सरकारने किती मागण्या मान्य केल्या याचा आढावा घेतला जाईल. 15 डिसेंबरला पंजाबमधील सर्वच मोर्च मागे घेतले जातील, असे एसकेएमचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी दिली.

आश्‍वासने न पाळल्यास पुन्हा आंदोलन

आंदोलन स्थगित केले असले, तरी दर महिन्याला केंद्र सरकारने आश्‍वासनांच्या पूर्ततेसाठी काय कार्यवाही केली याचा आढावा संघटनेच्या बैठकीत घेण्यात येईल. केंद्र सरकारच्या मनात आश्‍वासन पूर्ततेसाठी काळेबेरे आहे, असे लक्षात आल्यास पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले जाईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news