

पारगाव, पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वळती परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शिरूर तालुक्यातील जांबुत येथील पूजा नरवडे या तरुणीचा बिबट्याने बळी घेतला. त्यानंतर या परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. याचा परिणाम आता शेती व्यवसायावर झाला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर यायला तयार नाहीत. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत.
वळती गाव बिबट्या प्रवण क्षेत्रात आहे. या परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर कायमच या भागात असतो. शेतकरी, मेंढपाळांच्या शेळ्या- मेंढ्या इतर जनावरांवर बिबट्याकडून सतत हल्ले होत असतात. त्याचबरोबर काही शेतमजूर, महिलांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. जांबुत येथील घटनेमुळे बिबट्याप्रवण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वच भागात बिबट्याची भीती निर्माण झाली आहे.
वळती परिसरातील लोंढे मळ्यात चार दिवसांपूर्वी एकाच वेळी चार बिबटे ओंकार लोंढे या तरुणाला दिसले. त्यानंतर दुसर्याच दिवशी लोखंडे वस्तीत मेंढपाळ भीमाजी लोखंडे यांच्या शेळ्या- मेंढ्यांच्या वाड्यात शिरून एका बोकडाला बिबट्याने ठार केले. या परिसरात आता बिबटे अधिक संख्येने दिसू लागले आहेत. या परिसरात सध्या शेती कामे वेगात सुरू आहेत. दिवाळीच्या वेळी या परिसरात परजिल्ह्यातून शेतमजूर शेती कामांसाठी दाखल होतात. परंतु, बिबट्यामुळे मजुरांमध्येदेखील घबराटीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्यामुळे एकीकडे नागरिक घाबरले असताना वनविभाग मात्र सुस्त आहे. या विभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना केली जात नाही. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे उपलब्ध केले जात नाहीत, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे.
बिबट्याच्या वाढत्या भीतीमुळे शेती कामांवर विपरित परिणाम झाला आहे. रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे अवघड बनले आहे. त्यामुळे महावितरणने शेतकर्यांना दिवसा वीज द्यावी, असे पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांनी सांगितले.
वळती वनपरिमंडळ कार्यक्षेत्रात बिबट्याचा निश्चितच वावर आहे. परंतु, लगेचच त्या ठिकाणी पिंजरा लावण्यासाठी परवानगी मिळत नाही. पिंजरा लावण्यासाठीची परवानगी मिळविण्याची प्रक्रिया अवघड आहे. नागरिक, शेतकरी, मेंढपाळांनी आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. या परिसरात पुन्हा गावोगावी, वाडी-वस्त्यांवर जाऊन वनविभागाच्या वतीने जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये शेतकर्यांच्या वनविभागाकडून असणार्या अपेक्षा तसेच वनविभागाला येणार्या अडचणी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
– प्रदीप कासारे, वन परिमंडळ अधिकारी, वळती