

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: सध्याचे सरकार हे फक्त गणपती पाहत फिरत आहे. अद्यापही यांना पालकमंत्री मिळेना, आपण किती दिवस टिकणार याचीही यांना शाश्वती नाही, यांनी सत्तेत आल्यापासून काहीच केलेले नाही. शेतकऱ्यांनी आवाज उठवून मंत्र्याना वाकवले पाहिजे, हे सरकार कांदा, सोयाबीन, कापूस या पिकांना बाजारभाव द्यायला तयार नाही. तर फक्त गणपती पाहत फिरत असून मला शेतकऱ्यांनी दिलेली कांद्याची माळ मी मुख्यमंत्र्याच्या गळ्यात घालणार असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली. कांदा प्रश्नी ओतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व जुन्नर शेतकरी संघटनेच्या जन आक्रोश आंदोलन प्रसंगी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती संजय काळे, शेतकरी नेते तानाजी बेनके,अंबादास हांडे, लक्ष्मण शिंदे, प्रमोद खांडगे यांनीही कांदाप्रश्नी आपल्या भाषणातून आक्रोश केला.
जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी आपल्या भाषणात गायलेली '५० खोके एकदम ओके' ही कविता लक्षवेधी ठरली. कवितेच्या माध्यमातून त्यांनी कांदाप्रश्नी व शेतकऱ्यांच्या शेती मालाच्या बाजारभावा विषयी प्रभावीपणे भूमिका मांडली. कृषी मंत्री व मुख्यमंत्री यांना भेटून शेतकऱ्यांच्या व्यथा सांगणार असल्याचे म्हटले.
माजी सामाजिक आणि न्याय मंत्री धंनजय मुंढे यांनी स्वतः ट्रॅकटर स्टेअरिंगचा ताबा घेत चालक बनून आंदोलन स्थळी कल्याण- नगर महामार्ग काही वेळ रोखून धरला. तत्पूर्वी शेकडो ट्रॅकटर आणि हजारोंच्या संख्येतील शेतकऱ्यांनी ओतूरच्या मुख्य रस्त्यावर उतरून रॅली काढली होती. रॅली माध्यमातून शेतकऱ्यांचा कांदाप्रश्नी असलेला आक्रोश उफाळून आलेला निदर्शनास आला.
ओतूरच्या उपबाजार समितीच्या आवारात पार पडलेल्या सभेत व्यासपीठावर साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, माजी जि.प.सदस्य मोहित ढमाले, अंकुश आमले, तुषार थोरात, माजी पं. स. सभापती विशाल तांबे, ग म प्र शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे, ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे यासह खेड, आंबेगाव ,जुन्नर तालुक्यातील असंख्य पदाधिकारी व राष्ट्रवादी आणि काँग्रेस आय पक्षाचे कार्यकर्ते आणि बहुसंख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता.
जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे एपीआय परशुराम कांबळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.