

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सुविख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक म्हणून आपले नाव अजरामर करणार्या गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या नावाने बारामतीत उभ्या असलेल्या ग. दि. मा. सभागृहात आज (शनिवार, दि. 27 मे) 'गीतरामायण' हा भव्य-दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके हा कार्यक्रम सादर करणार आहेत. दै.'पुढारी' आयोजित या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी बारामतीकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत 2003 मध्ये ग. दि. मा. सभागृह उभे राहिले. या वास्तूत आजवर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांनी आवर्जून हजेरी लावत कार्यक्रम सादर केले आहेत. बारामतीकरांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. येथे शनिवारी 'पुढारी' आयोजित व धूतपापेश्वर प्रस्तुत तसेच पॉवर्ड बाय श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर-बारामती आणि सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि. व अक्कुडाज दूधकांडी यांच्या वतीने 'गीतरामायण' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे वाल्मीकी ग. दि. माडगूळकर विरचित आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांनी स्वरसाज चढविलेला 'गीतरामायण' हा बहारदार कार्यक्रम बारामतीकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. विद्या प्रतिष्ठानच्या ग. दि. मा. सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके हा कार्यक्रम सादर करतील. त्यासाठी निःशुल्क प्रवेशिका वाटप गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे.
बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यातील रसिकांनी प्रवेशिका घेण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक रंगतदार होणार आहे. ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांचे सादरीकरण ऐकण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. हा कार्यक्रम रसिकांच्या दृष्टीने पर्वणीच ठरणार आहे. कार्यक्रमाला अधिकाधिक रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या निर्धारित वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर सभागृहात उपस्थित राहावे. प्रथम येणार्यास बैठकीसाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.