गौरव : ‘मयूरभंज’ची नवी ओळख

गौरव : ‘मयूरभंज’ची नवी ओळख
Published on
Updated on

संपूर्ण पृथ्वीवर आजपर्यंत काळा वाघ फक्त एकाच ठिकाणी सापडलाय. ओडिशातल्या मयूरभंज जिल्ह्यातल्या सिम्प्लीपाल अभयारण्यात या वाघाचं अस्तित्व आढळलं आहे. या वाघाप्रमाणेच अफलातून जंगल, धबधबे आणि निसर्ग असलेल्या या मयूरभंज जिल्ह्याला यावर्षीच्या 'टाइम' मॅगझीनच्या टॉप 50 पर्यटनस्थळांत मान मिळालाय.

ही गोष्ट आहे ऑगस्ट 2022 मधली. ओडिशाच्या सिम्प्लीपाल अभयारण्यात काम करणार्‍या वन अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर पोस्ट केली की, अत्यंत दुर्मीळ असा काळा वाघ त्यांना जंगलात दिसला. त्याचा व्हिडीओच त्यांनी सोबत जोडला. बघता बघता ही पोस्ट व्हायरल झाली आणि सिम्प्लीपाल अभयारण्य आणि काळा वाघ हा ग्लोबल चर्चेचा विषय ठरला.

स्युडो-मेलनिस्टिक असं या वाघाचं शास्त्रीय नाव असून, ओडिशातल्या या जंगलातच आजवर त्याचा वावर आढळला आहे. या वाघामुळे प्रसिद्ध झालेलं हे जंगल असलेला जिल्हा मयूरभंज आता 'टाइम' मॅगझीनने जाहीर केलेल्या सर्वोतम 50 पर्यटनस्थळांच्या यादीत समाविष्ट झालाय. त्यामुळे देशाच्या पर्यटनाला चालना मिळेल आणि काळ्या वाघांबद्दल जागृतीही वाढेल.

हे काळ्या रंगाचे वाघ म्हणजे वाघांची नवी जात नाही. या वाघांना मेलनिस्टिक असं नाव त्यांच्या शरीरात असलेल्या मेलनिन या रंगद्रव्यामुळे मिळालं आहे. मेलनिनचं प्रमाण वाढलं की, शरीरातला काळा रंग वाढतो. सजीवांच्या त्वचेचा, केसांचा रंगही मेलनिनमुळे ठरतो. या वाघांमधे इनब्रीडिंगमुळे म्हणजे जवळच्या नात्यात संकर झाल्यानं या मेलनिनच्या प्रमाणात वाढ झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

यामुळे या वाघाच्या अंगावर गडद काळ्या रंगांचे पट्टे असतात. तेही एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्यामुळे वाघाचा मूळ रंग कमी दिसून काळा रंगच जास्त उठावदारपणे दिसतो. या वाघांमधे जनुकीय बदलामुळे रंगबदल झालेले आढळतात. तसंच या वाघांचा आकारही सर्वसाधारण वाघांपेक्षा थोडा लहान असतो. तरीही त्यांच्या या अनोख्या वैशिष्ट्यामुळे हे वाघ अत्यंत दुर्मीळ असे ओळखले जातात.

2022 मधे या वाघांचा व्हिडीओ लोकप्रिय ठरला खरा, पण त्याआधीही काहींना हे वाघ दिसल्याची नोंद आहे. 2020 मध्ये सौमेन वाजपेयी यांनी या वाघाचे फोटो टिपले होते. त्याआधीही 1990 च्या सुमारास हे वाघ दिसल्याची नोंद आढळते. यांची संख्या हातावर मोजण्याएवढीच असावी, असाही एक अंदाज आहे. पण हे वाघ जंगलात स्वतःची जागा राखून आहेत. त्यासाठी ते झाडांवर आपल्या नखांनी खुणा करतात, असं सुशांत नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडीआत स्पष्टपणे दिसतं.

हे वाघ अत्यंत दुर्मीळ असल्यानं ते दरवेळी दिसायलाच हवेत, असा कुणाचाच आग्रह असू नये. निसर्गाची ती अनोखी गोष्ट निसर्गातच सुरक्षित राहायला हवी. पण निसर्गाचं हे आश्चर्य जपणारा मयूरभंज जिल्हाच पर्यटनाच्या द़ृष्टीनं महत्त्वाचा आहे. तो पाहायला सर्वांनी यायला हवं. म्हणूनच 'टाइम' मासिकानं मयूरभंज जिल्ह्यालाच पर्यटनाच्या टॉप 50 यादीत निवडलंय.

या यादीत लडाख आणि मयूरभंज अशा दोन जागांना यंदा स्थान मिळालंय. लडाखबद्दल अनेकांना माहिती आहे. पण मयूरभंज हे तसं तुलनेनं नवं नाव यानिमित्तानं लोकप्रिय होणार आहे. सिम्प्लीपाल राष्ट्रीय उद्यान हे अत्यंत काळजीपूर्वक जपलेलं अभयारण्य असून, इथं फक्त दिवसाला 60 गाड्यांनाच आतमधे प्रवेश दिला जातो. हे हिरवंगार जंगल निसर्गातले अनेक दुर्मीळ प्राणी तसंच नामशेष होणार्‍या वनस्पतींसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच स्थलांतरित पक्ष्यांचं नंदनवन म्हणूनही ओळखलं जातं.

मयूरभंज जिल्ह्याची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे मयूरभंज छाहू हा नृत्यप्रकार. युनेस्कोनं अमूर्त वारसायादीत या नृत्याला स्थान दिलं असून, पर्यटनाच्या द़ृष्टीने तेही एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे. जाते. त्यामुळे मयूरभंजचं छाहू नृत्य हे वेगळं ठरतं.

मयूरभंज हा ओडिशामधला सर्वात मोठा जिल्हा असून, ब्रिटिश काळातही तिथं राजेशाही होती. त्यामुळे तिथली निसर्गसंपदा आणि खनिजं मोठ्या प्रमाणावर सुरक्षित राहिली, असंही सांगितलं जातं. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या याच मयूरभंज जिल्ह्यातल्या आहेत. मयूरभंज जिल्हा धातुशिल्पं, सबई गवतापासून केलेलं विणकाम, डोक्रा हे अनोखं धातुकाम यासाठीही प्रसिद्ध आहे. तसंच आदिवासी समूहांच्या मोठ्या संख्येमुळे इथं अनेक नैसर्गिक औषधं, वनस्पती आणि पारंपरिक ज्ञानाचा संग्रह आहे. युनेस्कोने आणि 'टाइम' मासिकानं केलेल्या नामांकनामुळे हे सगळं ज्ञान जागतिक पातळीवर पोचू शकेल, असा विश्वास इथल्या प्रशासनाला वाटतो आहे.

आज मयूरभंजची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचली आहे. हे जरी खरं असलं तरी अद्यापही राष्ट्रीय पर्यटनाच्या लोकप्रियतेमधे या जिल्ह्याची ओळख लोकांना झालेली नाही. आता मयूरभंज अधिकाधिक लोकापर्यंत पोचणार असेल, त्याची काळजीही अधिक घ्यावी लागेल. तिथल्या पर्यटनस्थळांचा विकास करताना जोशीमठासारखं तिथं काँक्रीटचं जंगल उभं राहणार नाही, याची दक्षता बाळगावी लागेल.

तसंच तिथं पर्यटकांची संख्या जशी आतापर्यंत मर्यादित ठेवली गेली आहे. ती वाढवताना किती वाढवायची, कशी वाढवायची याचंही नियोजन करावं लागेल. शेवटी जगात काळे वाघ फक्त मयूरभंजमधेच आहेत. त्यांना जपण्याची जबाबदारी कुणीही विसरून चालणार नाही.

सम्यक पवार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news