

नवी दिल्ली : नूडल्स आणि चिली बेबी कॉर्नपासून फ्राईड राईस आणि मंच्युरियनपर्यंत, बहुतेक आशियाई पदार्थांमध्ये आवर्जून आढळणार्या एका घटकाचे नाव आहे सोया सॉस. या सॉसची चव अप्रतिम आहे आणि तो अनेक पदार्थांचा सुगंध आणि चवदेखील वाढवतो. पण स्वादिष्ट पदार्थांमध्ये सोया सॉस वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. खबरदारी घेण्याचे कारण म्हणजे सॉसचे जास्त प्रमाणात सेवन करणे धोकादायक ठरू शकते. एका रिपोर्टनुसार, सोया सॉसचा ओव्हरडोस एखाद्या व्यक्तीसाठी घातक ठरू शकतो, कारण त्यात मीठ जास्त प्रमाणात असते. तुम्ही एकाचवेळी या सॉसचे जास्त सेवन केल्यास तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते.
सुमारे 2,000 वर्षांपासून आशियाई स्वयंपाकघरात सोया सॉसचा वापर केला जात असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पण क्वचितच कोणीतरी त्याच्या ओव्हरडोसबद्दल चर्चा केली असेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोया सॉसच्या एका चमच्यात सुमारे 800-1,000 मिलिग्राम मीठ असते. या रिपोर्टमध्ये काही लोकांनी जास्त सोया सॉस खाल्ल्यानंतर त्यांना उद्भवलेल्या त्रासदायक प्रसंगांचा उल्लेखही करण्यात आला आहे. 2013 मध्ये एका 19 वर्षांच्या तरुणाने सुमारे दोन पिंट सोया सॉस खाल्ला आणि तो इमर्जन्सी रूममध्ये पोहोचला. एवढंच नाही तर तो तरुण नंतर कोमातही गेला. त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर डेव्हिड जे कार्लबर्ग म्हणाले, "आम्ही त्याला दिलेल्या कोणत्याही स्टिमुलीला त्याने प्रतिसाद दिला नाही. डॉक्टरांनी असा दावा केला की त्या व्यक्तीला हायपरनेट्रेमियाचा त्रास होता.
जेव्हा तुमचे शरीर रक्त आणि ऊतींमधील क्षाराचं प्रमाण नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असतं, तेव्हा ही परिस्थिती उद्भवते. तज्ज्ञांनी सांगितले की ही स्थिती इतकी गंभीर आहे की, त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. रिपोर्टमध्ये मिठाचा लेथल डोस शरीराच्या वजनाच्या 0.75 ग्रॅम प्रति किलोग्रॅम ते 4 ग्रॅम प्रति किलोग्रॅम शरीराच्या वजनाच्या दरम्यान ठेवला आहे. यासाठी हे उदाहरण पाहूयात. समजा, जर 68 किलो वजनाच्या व्यक्तीने एकावेळी 135 ग्रॅम मीठ खाल्ले तर त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, प्रसंगी त्याचा जीव जाण्याची शक्यताही असते.